चला आरोग्य सेवेचा श्रीगणेशा करुया

        देशात स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या वेंगुर्ले नगरीच्या जवळजवळ सर्वच पायाभूत सुविधा पुर्णत्वाकडे जात असताना केवळ आरोग्य सुविधेची असलेली मुलभुत पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला नगरीच्या अस्मितेसाठी काम करणाऱ्या माझा वेंगुर्ला या संस्थेने कोरोना काळात जनतेची उपचारा अभावी होणारी फरफट पाहिल्यानंतर आरोग्य सेवेत काम करण्यासाठी उडी घेतली. पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांना दूरध्वनीद्वारे समुपदेशन व वेंगुर्ला मेडीकल असोसिएशनच्या सहकार्याने उपचारासाठी मोठ्या हिरीरीने काम केले. दुसऱ्या टप्प्यात ऑक्सिजन अभावी होणारी परवड ओळखून माझा वेंगुर्लाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून ऑक्सीजन बँक उभारुन अनेक रुग्णांचे प्राण वाचविले. त्याला वेंगुर्ल्यातील सुजाण नागरिकांनी पाठींबा देत काही प्रमाणात निधी तर वस्तुरुपात मदतही केली. शासनाचे समर्र्पित कोवीड सेंटर सर्व सुविधा असुनही डॉक्टर अभावी रखडले होते. अशावेळी विशेष प्रयत्नांनी खाजगी डॉक्टर उपलब्ध करुन हे कोवीड सेंटर सुरु करण्यात यश मिळविले. कोरोना संकटकाळात सुरु झालेली ही आरोग्याची चळवळ अशीच पुढे नेण्याची गरज ओळखुन “वेंगुर्ल्यात सर्व काही आहे पण वैद्यकीय उपचारांची मात्र वानवा आहे“, आरोग्य व्यवस्थेसाठी ठोस उपाय करण्याचे मंथन सुरु झाले. या कळीच्या मुद्यावर गांभीर्याने काम करण्यासाठी वेंगुर्ला सक्षम अभियान हाती घेण्यात आले. मात्र यासाठी गरज होती इच्छाशक्ती व निधीची.

      अशावेळी केवळ अवाक्याबाहेरच्या गोष्टींवर केवळ चर्चा न करता प्राथमिक टप्प्यात मुलभूत सेवा हाती घेण्याचे धोरण अवलंबून संस्थेने काम सुरु केले. शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. पण त्याची अवस्था ही असून घोटाळा नसून अडचण अशी आहे. सरकारी रुग्णवाहिका ऐन मोक्याच्या वेळी मिळेल याची शाश्‍वती नाही. खाजगी रुग्णवाहिका अनेक दात्यांनी दिल्या पण त्या मारुती व्हॅन सदरातील असल्यामुळे लांब पल्ल्यासाठी त्याच्या येणाऱ्या मर्यादा व आजच्या घडीला मोडकळीस आलेली स्थिती या नगरीच्या आरोग्य व्यवस्थेची परिसीमा गाठणाऱ्या आहेत. अशावेळी मुलभूत गरज म्हणून रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी दात्यांची शोधाशोध सुरु झाली आणि डॉ. अमेय देसाई नावाचा कोकणच्या आरोग्य चळवळीत झोकून देणारा एक देवदूत या चळवळीच्या मागे धावून आला. किरात साप्ताहिकाच्या माध्यमातून वेंगुर्ल्याच्या जडणघडणीत गेली 100 वर्षे मोलाचा वाटा उचलणारी व साक्षीदार असलेली किरात ट्रस्ट या संस्थेने यासाठी हात पुढे करुन सामाजिक दायित्व निधीतून रुग्णवाहिका मिळविण्यासाठी मोठा वाटा उचलला. एजीस फेडरल लाईफ इन्शुरन्स या संस्थेच्या सौजन्याने सदर रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. मी मिळवून देतो तुम्हाला रुग्णवाहिका असं सहज बोलून गेलेला डॉक्टरांचा शब्द अवघ्या तीन महिन्यात खरा ठरला.

      अर्थात रुग्णवाहिका सेवा हेच फक्त ध्येय नसून केवळ एक मूलभूत सुरुवात म्हणून त्याची मुहूर्तमेढ करण्यासाठी येत्या 9 ऑक्टोबर 2022 रोजी या रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण करण्याचे निश्‍चित झाले. त्यासाठी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग पुत्र मा. सुरेश प्रभू यांनी मोठ्या मनाने होकार दिला आणि कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ आले. त्यासोबत डॉ. अमेय देसाई यांनी उषःकाल अभिनव मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली या अद्यायावत हॉस्पिटलच्या सहकार्याने महा आरोग्य शिबीराची आखणी केली आणि या कार्यक्रमाची व्याप्ती वाढली. या शिबीरात हृदयरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, जनरल सर्जन/फिजिशिअन, स्त्री रोग तज्ज्ञ, पेन मॅनेजमेंट व इ.सी.जी. व दुडी इको या सेवा निःशुल्क देण्यात येणार असुन समस्त वेंगुर्लेवासीय तथा सिंधुदुर्ग वासीयांनीही या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

      अर्थात ही फक्त सुरुवात आहे. आरोग्य दृष्ट्या वेंगुर्ला नगरीला सक्षम करण्याचा चंग वेंगुर्ला वासीयांनी बांधला आहे. कुणीतरी करेल अशी आशा बाळगण्यापेक्षा आपणच आपली सोय करावी हा उशीरा का होईना पण शहाणपणाचा विचार करुन या चळवळीची सुरुवात झाली आहे. लवकरच मुंबई व इतर मोठ्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने टेलीमेडीसीन सेंटर उभारण्याचे प्रयोजन प्रत्यक्षात येणार आहे. रुग्णवाहिका लोकार्पण हा आरोग्यसेवेत सक्षम होण्यासाठी केलेले श्री गणेशा आहे. वेंगुर्लेवासीय जनतेने त्यास सहकार्य, सहयोग व पाठींबा देवून एका सकारात्मक चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

      अर्थात रुग्णवाहिका मिळविणे हे जेवढे कठीण होते तेवढेच ती सुरळीत सेवेत ठेवणे हे देखील संस्थेपुढे मोठे आव्हान आहे. अशावेळी अत्यंत माफक दरात ही सेवा जनतेस उपलब्ध करुन देतानाही कायमस्वरुपी चालक व देखभाल खर्च चालविणे हे मोठे जिकरीचे असते. अशावेळी आपल्या हयात नसलेल्या प्रिय जनांच्या नावाने प्रत्येक महिन्यासाठी एक प्रायोजक हुडकून किमान खर्चाची व्यवस्था करणे. तसेच अती गरीब रुग्णांसाठी मोफत सेवा देणे याही उद्दिष्टांसाठी संस्थेस निधीची गरज असून वेंगुर्लेवासीय  जनता यासाठी निश्‍चित हात देईल अशी संस्थेस आशा आहे. या उपक्रमाचे स्वतंत्र खाते उघडून ही रक्कम या खात्यात केवळ याच उद्देशासाठी खर्च केली जाणार आहे. तसेच या निधीचा योग्य लेखा संबंधितांना दिला जाणार आहे.

– श्री. मोहन होडावडेकर, समन्वयक वेंगुर्ला सक्षम अभियान

मोबा. 9423884516

Leave a Reply

Close Menu