धम्मचक्र प्रवर्तन – एक सामाजिक व धार्मिक क्रांती!

          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सन १९५६चे बौद्ध धर्मातील धर्मांतर समजून घेण्यासाठी भारतीय हिंदू समाजशास्त्राचा आणि धर्म शास्त्राचा, आधुनिक ज्ञान शाखांच्या प्रकाशात अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी मानवतेच्या मुल्यांबद्दल अंत ःकरणात खोलवर आदरभाव असणे जरुरीचे आहे. धर्मांतरची चळवळ समजून घेण्यासाठी आंबेडकरी साहित्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर हा भारतीय समाजाला राजकीय लोकशाही पेलण्याचे सामर्थ्य सामाजिक स्तरावर कसे येईल या दृष्टीने व दिशेने केलेला एक अभूतपूर्व प्रयोग होता, त्यासाठी त्यांच्या बुद्ध अँड हिज धम्मया ग्रंथातील वैचारिक मांडणी समजून घेणे गरजेचे आहे.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली बौध्द धम्माची संकल्पना ही त्यांच्या प्रतिभेची विसाव्या शतकातील मानव जातीला लाभलेली एक अमूल्य देणगी आहे. बुद्ध धम्माची संकल्पना मांडून त्यांनी माणसाच्या स्वतःतील बदलात स्वतःला घडविण्याच्या प्रक्रियेत आणि समाजाच्या पुर्नरचनेत बदल घडवून आणावायचा होता. त्यांच्या मते धम्म हा धर्माप्रमाणे केवळ या जगाची चर्चा करत नाही. त्याच्या मुळाचे स्पष्टीकरण करत बसत नाही तर, धम्म या जगाची पुर्नरचना करू इच्छितो. दुर्बलांना सबळ बनविणे आणि पिळवणुकीचे समूळ उच्चाटन करणे हे खरे धम्म कार्य आहे, ते पार पाडण्यासाठी एका सामाजिक नितीची केवळ उभारणी न करता, त्या नितीला पावित्र्य बहाल केले पाहिजे व त्याचा मूळ हेतू दुर्बलांना माणुसपण प्राप्त करून देणे हाच असू शकतो. त्यांनी धम्म चक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने ज्या नितीचा पाया घालण्याचा विचार केला ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही लोकशाहीच्या मूल्यांना पोषक व प्रेरक शक्ती होती.

    विसाव्या शतकाच्या सुरुवातीस डॉ. आंबेडकरांना हिंदू धार्मियांकडून व एकूणच समाज व्यवस्थेकडून जो त्रास झाला त्यामुळे त्यांनी तब्बल दोन दशके बौद्ध धम्माबाबत चिंतन केले आणि आपल्या लाखो अनुयायांसोबत १४ आक्टोबर १९५६ रोजी विजयादशमी दिनी नागपूर मुक्कामी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

       हिंदू धर्मातील चातुवर्णाच्या अतिरेकांमुळे दलितांना जे गुलामगिरीचे जीण जगावे लागले, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या बद्दलची चाड अस्तगत झाली होती, त्यातूनच त्यांच्या मनामध्ये हिंदू धर्माच्या एकूणच व्यवस्थेबद्दल चीड निर्माण झाल्याने त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. कारण, बौद्ध धर्म हा प्रज्ञा, शील, मैत्री, न्याय इ. वैश्विक मूलभूत तत्वाचा पुरस्कार करणारा लोकशाही प्रधान होता. तो वैज्ञानिक दृष्टीकोनावर व मानवी नैतिकतेवर आधारित असल्यामुळे तोच त्यांना खरा धर्म वाटू लागला.

      बौद्ध धम्म अहिंसेचा पुरस्कर्ता असल्याने तो मानवी संवेदना सामान आदराच्या भावनेला जपणारा होता. भगवान बुद्ध स्वतःला मोक्षदाता न मानता मार्गदाता मानत होते. त्यांच्या तत्त्वप्रणालीमध्ये काल सुसंगत सुधारणा होऊ शकते, तो व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असल्याने कुणावरही लादण्याचा प्रश्नच नव्हता. ह्या सर्व सुसंगत कारणांमुळेच डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर्याद चैतन्याचे धनी होते, त्यामुळेच घटना समितीवर काम करताना त्यांनी एकात्मकतेचा वापर केला. हिंदूंच्या कल्याणार्थ हिंदू कोडं बिल बनवताना प्रज्ञेचा वापर केला. त्यांनी कधीही ब्राह्मणांना विरोध केला नाही तर त्यांचा विरोध ‘‘विकृत ब्राह्मणाला‘‘ होता. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा एकात्मकतेचा वापर केला. पुणे कराराच्यावेळी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांना जो भावनिक, बौद्धिक व सामाजिक त्रास झाला तो सहन करण्याची ताकद त्यांना बुद्धाच्या प्रज्ञेतून मिळाली. एकात्मकतेवर आधारित ज्या मानवी-वैश्विक मूल्यांचा सम्यक अर्थाने भगवान बुद्धांनी प्रसार केला ती मूल्ये डॉ. आंबेडकर त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत जपत राहिले. त्यांनी बौध्द धम्माचा स्वीकार करण्याची कारणमिमांसा सांगताना म्हटले की, त्यांच्या नजरेसमोर वैश्विक नागरिकांचे व्यक्तित्व होते. भगवान बुद्धांचा धम्म पुढे नेण्यासाठी सर्व बौध्द धार्मियांनी भौतिक व पारमार्थिक प्रगती यामध्ये संतुलन साधणे गरजेचे आहे व ती प्रगती साधताना प्रत्येकाने आपल्या समाजाचे व देशाचे हित साधावे असे त्यांना वाटे. त्यांनी बौध्द धम्म प्रज्ञेला जोखण्याच्या कसोटीवर अभ्यासला होता. ते म्हणत ज्या धर्माचा संपूर्ण भर हा प्रज्ञेवर असतो, ज्या धर्माचे अनुयायी प्रज्ञा आत्मसात करतात तोच धर्म वैश्विक होतो.

      डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर हे भगवान बुद्धांच्या तत्त्वावर आधारित असल्यामुळे त्यांनी केलेल्या धर्मांतरामुळे देशाच्या एकात्मकतेला कोणतीही बाधा पोहचलेली नाही. हे ध्यानात घेणे गरजेचे आहे, कारण ज्या धर्माचे उगमस्थान भारतच आहे त्याचेच त्यांनी पुनरुज्जीवन करून देशातील दलितांना स्वातंत्र्य समता, बंधुता व शील या आधारे प्रज्ञेचा मार्ग दाखवत भगवान बुद्धांच्या तू स्वयंदीप हो!चा मंत्र मनामनात जागविला.                                                        संजय तांबे,फोडाघाट, ९४२०२६१८८८

 

Leave a Reply

Close Menu