वायंगणीतील माती सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखले

वेंगुर्ला-मालवण सागरी महामार्गावरील वायंगणी गणेश मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला भारतीय खाण मंत्रालयाच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण तथा राज्य एकक महाराष्ट्र पुणे यांच्याकडून मशिनद्वारे सुरू असलेले मातीचे नमुने गोळा करण्याचे काम जागृत नागरिकांनी रोखले.

    या खोदकामासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारे सूचित केलेले नव्हते, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. निवडणूकीच्या धामधुमीत सिधुदुर्गातील काही गावांमध्ये अशाप्रकारे भूगर्भातील मातीचे नमुने गोळा करून खाण मंत्रालयाला नेमके काय साध्य करायचे आहे? असा संतप्त सवाल या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

    सागरी महामार्गाने जात असताना सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांच्या ही गोष्ट नजरेत आली. त्यांनी थांबून तेथील कर्मचा­यांना अशा प्रकारच्या मशिनद्वारे नेमके कोणते काम सुरू आहे याची विचारणा केली. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणांतर्गत भूगर्भातील मातीचे नमुने गोळ करत असल्याचे उत्तर त्यांनी तांडेल यांना दिले. मात्र, यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतल्याचे पुरावे त्यांच्याकडे नव्हते.

    केवळ जिल्हाधिका­यांना पत्र देऊन भूगर्भातील मातीचे नमुने गोळा करण्याचे हे काम बिनधास्तपणे सुरू आहे. या सर्वेक्षणला आक्षेप घेऊन तांडेल यांनी वायंगणी सरपंच अभी दुतोंडकर व उपसरपंच रविद्र धोंड यांना बोलावून घेत वस्तुस्थिती जाणून घेतली. सदर आस्थापनेकडून वायंगणी गावातील भूगर्भीय मातीचे नमुने घेण्याबाबत कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायतीला सूचित केलेले नाही. कदाचित खाण मंत्रालयाचा येथील खजिन्याचा शोध घेऊन भविष्यात येथे मायनिग लादण्याचा डाव असेल. त्यामुळे या सर्वेक्षणाला जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी आनंद दाभोलकर, प्रविण राजापूरकर, रविद्र पंडित उपस्थित होते.

    लवकरच याबाबत ग्रामपंचयतीत ठराव घेऊन गावाला विश्वासात घेतल्याशिवाय गावात कोणतेही सर्वेक्षण होऊ देणार नाही असे सरपंच दुतोंडकर यांनी स्पष्ट केले. तर जिल्हाधिक­यांची भेट घेऊन याबाबत तक्रार नोंदवणार असल्याचे योगेश तांडेल यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu