साता-याच्या मातीत रुजलेलं एक रोप… बघता बघता अभिनयाचा वटवृक्ष झाला आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर आभाळ भरून बहरला. १९७८ साली प्रायोगिक रंगभूमीवरून मराठी एकांकिका, नाटक याद्वारे सुरू झालेला हा प्रवास पुढे जाऊन मराठी, हिंदी चित्रपट सृष्टी समृद्ध करीत दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेत जाऊन पोहोचला आणि स्थिरावला. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड ह्या सर्व भाषांमध्ये मुशाफिरी करत साडेचारशेहून अधिक चित्रपट या अवलियाने केले. झाड जरी आभाळाला जाऊन टेकलं तरी त्याची मातीतली मुळं घट्ट असतात. ती ते कधीच सोडत नाही. उलट झाड जेवढं वाढतं, बहरतं, उंच जातं तेवढी त्याची मूळं जमिनीत खोलवर रुजतात, अजून घट्ट होत जातात. तसा झाडाचा हा स्थायीभाव ज्यांच्या प्रत्येक वाक्यातून, कृतीतून आपल्याला ठायी ठायी दिसतो, जाणवतो असं व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘सयाजी शिंदे‘!
माझी फक्त माझ्याशी स्पर्धा आहे. माझ्या पंखात जेवढं बळ आहे, तेवढी भरारी मला घ्यायची आहे. ती भरारी घेण्यासाठी जेवढे जमतील तेवढे, प्रयत्न मला करायचे आहेत आणि जेवढं जमेल तेवढं मला पुढे जायचं आहे; असं ठरवून आयुष्याची आणि अभिनय क्षेत्रातील वाटचाल त्यांनी सुरू केली. यश, किर्ती, पैसा, समृद्धी सर्व बाजूंनी सिद्ध असताना, एक आगळावेगळा; पुन्हा आपल्या मातीशी जोडणारा वृक्ष संवर्धनाचा उपक्रम सयाजी शिंदे यांनी हाती घेतला आणि अविरत सुरू असलेल्या या सगळ्याचा मागोवा म्हणून ही खास मुलाखत किरात वाचकांसाठी…
माझ्या आयुष्यात आई आणि जमिन यांच्यामुळे मी आज आपल्यासमोर इतकं बोलू शकतोय, लिहू शकतोय. तुम्ही म्हणाल, हे असं सर्वांच्याच बाबतीत असतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निग पॉईंट वेगवेगळाच असतो. तसा तो माझ्याही आयुष्यात आला. गावात सातवीपर्यंत शाळा. परीक्षा झाल्यावर कार्यक्रमाच्या निमित्ताने मावशीकडे गेलो होतो, घरी पुन्हा येऊन गुरं-ढोरंच सांभाळायची, हेच आजूबाजूला पाहिले असल्याने माझंही वेगळं असं काही ध्येय तेव्हा नव्हतंच. मी सातवी पास झाल्याचं मावशीला पत्रं आलं. साहजिकच आता पुढे काय करणार असा प्रश्न उपस्थित झाल्यावर आई म्हणाली, ‘तुझ्या गावात शिक्षणासाठी ठेवून घे सयाजीला‘ आणि म्हणून माझं सातवीच्या पुढे नववीपर्यंत मावशीकडे तर दहावी पुरंदर तालुक्यातील ‘वीर‘ या गावी बहिणीच्या घरी राहून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर डी.एड. केलं. दरम्यान, आमची जमीन धरणात गेली आणि मला वॉचमनची नोकरी मिळाली. मला वेगळं काही करायचं असं सारखं खुणावत होतं, म्हणून मी रात्री वॉचमनची नोकरी करीत पहारा देत असताना दिवसा पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्याचवेळी माझी गाठ सुनील कुलकर्णी या नाटकवेड्याशी झाली आणि माझं क्षेत्र मला खुणावू लागलं.
आम्ही गावातील एखाद्या मोठ्या झाडाखाली किवा पारावर नाटक करत असू. नाटकाच्या तालमी घेत असू. या सावलीनं मला माझं जगण्याचं जणू प्रयोजनच दिलं. एकदा कॉलेजचे प्रा. शंकर पाटील यांच्या घरी ‘के. नारायण काळे‘ यांचं अभिनय साधना (अँन एक्टर्स प्रिपेयरर्स या पुस्तकाचा अनुवाद) हे पुस्तक पाहिलं. त्यानंतर जवळपास चार वर्ष ‘अभिनय साधना‘ आणि ‘भूमिकाशिल्प‘ या दोन पुस्तकांची अक्षरशः पारायणं केली. पुस्तक वाचताना एकदा एक महत्त्वाचं वाटायचं तर दुस-या वेळेला दुसरं आणि तिस-यांदा वाचताना तिसरच; त्यामुळे त्या पुस्तकाच्या माझ्या माझ्या अशा नोट्स काढल्या. डोक्यात ते पुस्तक भिनवलं. या पुस्तकांनीच मला आत्मविश्वास दिला.
अभिनयाच्या क्षेत्रात आपल्याला एक गॉडफादर असावा असं सर्वांनाच वाटतं. मात्र माझ्याबाबतीत घरामागील डोंगर हा कायमच माझ्यासाठी गॉडफादर बनून राहिला आहे. या डोंगरावरच मी नाटकाचे उतारेच्या उतारे पाठ केले आहेत. त्या डोंगरावर संवाद म्हणताना मला तो डोंगर म्हणजे एक रंगभूमी वाटायची आणि अख्खा गाव म्हणजे माझ्यासाठी प्रेक्षक असायचे. म्हणूनच कदाचित डोंगराएवढ्या उंचीवर जाऊन मी माझी नाटकाची तालीम करीत असल्यामुळे नंतर कधी उंची गाठण्यासाठी मी धावत राहिलो नाही. धावलो ते फक्त काम करण्यासाठीच. माझा मित्र अरविंद जगताप याने लिहिलेल्या कवितेच्या ओळी कायम मला ती प्रेरणा देतात आणि माझ्या अस्तित्वाचं जणू प्रयोजनच सांगतात.
सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात.
झाड हमखास फूल देतं, फळ देतं, पान देतं, पक्ष्यांसाठी उघडं रान देतं,
श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्या गोष्टी देतं झाड.
आईच्या मायेन फक्त झाडच करते आपले लाड, झाड आहे औषध, झाड आहे देव,
पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा झाडे लावून ठेव, कारण झाड आहे, तर आपली वाढ आहे…
या कवितेच्या ओळी झाड आणि माणसाच्या जीवनाचा परस्परसंबंध मांडतात. याच आशयाने मला झाडाचा लळा लागला. वृक्ष आपल्या जीवनाचे खरे सोबती आहेत. त्यांच्यामुळे जीवन जगणे सुकर होते. वृक्षांशिवाय जगणे अशक्य आहे. म्हणून प्रत्येक माणसाने झाड लावावं, ते जपावं अन् वाढवावं. या झाडांच्या बाबतीत मला कायम कुतूहल राहीलं आहे. अनेक गावांतून वड, पिंपळ, चिंच मी पाहिले आहेत. माझ्या गावातील चिंचेच्या झाडाच्या पारावर बसून कित्येकदा आम्ही मुलांनी कल्ला केलेला आहे. एक दिवस सहज मी बाबांना विचारलं,
‘आबा, हे चिंचेचं झाड कधीपासून इथे आहे ?‘
ते म्हणाले, ‘‘मलाही माहीत नाही, माझ्याही जन्माच्या आधीपासून ते इथेच आहे.‘‘
मनात विचार आला, किती पिढ्या पाहिल्या असतील या झाडानं! कित्ती पक्षांचं सासर-माहेर असेल हे झाड…कित्ती जणांच्या जन्म मृत्युचा, सुखदुःखाचा साक्षीदार राहिलं असेल हे झाड!
२०१५ मध्ये माझ्या मनात एक विचार घेऊन आमचा प्रवास सुरू झाला. आपण ९ महिने पोटात असताना निःस्वार्थपणे सर्व काही देणारी आईच असते. एकदा आपण या जगाच्या संपर्कात आलो, की आपल्या आईनंतर फक्त एक वृक्ष आहे जो आपल्याला प्राणवायू, अन्न, पाणी, माती, सावली आणि बरंच काही निःस्वार्थपणे देतो. या पृथ्वीवर वृक्ष हा एकमेव सजिव आहे जो वृक्ष लागवड करणा-याला आणि तोडणायालाही आपलं सर्वस्व देतो आणि यातूनच हा विचार २०१६ मध्ये ‘दिवडी‘ येथे उभारलेल्या पहिल्या ‘देवराई‘ने अंमलात आला. तेथून हजारो लोक स्वेच्छेने आमच्या मिशनमध्ये सामील झाले. सध्या आमच्याकडे २९ देवराई, २ वृक्ष बँक, जैव-विविधता उद्यानं, फुलपाखरं उद्यान आणि रॉकगार्डन्स आहेत. ज्याद्वारे आम्ही हजारो लोकांच्या मनात वृक्षारोपण आणि संवर्धनाचा विचार यशस्वीपणे जोडला आहे. सह्याद्री देवराईची महाराष्ट्रात २९ हून अधिक ठिकाणी उपस्थिती आहे आणि आम्ही ६.५ लाख अधिक देशी झाडांची यशस्वीपणे लागवड केली आहे. भारतीय देशी प्रजातीच्या वृक्षांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीनं आमचं प्राधान्य राहिलं आहे. त्यामध्ये ९५ टक्के झाडं ही फळं-फुलं, सावली देणारी, औषधी अशा विविध प्रकारची असून स्थानिक प्रदेशातील आहेत. यामध्ये १४१ प्रकारची झाडं, वेली आहेत. या कामी आमच्यासोबत रघुनाथ ढोले, शेखर गायकवाड, एस.आर.यादव सर, सी.बी.साळुंके सर श्रीकांत इंगळहळ्ळीकर, सुहास वायंगणकर, मिलिंद गिरधारी, प्रशांत गिरे, बाळासाहेब पानसरे, प्रकाश काळे, विजय निंबाळकर यांसारखी अनेक मंडळी आहेत. ते कुठल्या भागात कोणती झाडं लावायची याचा अभ्यास करून देशी झाडांची निवड करतात. माती परीक्षण करून लागवड करतात. कमी उंचीची, जास्त उंचीची यानुसार त्या विभागाला किवा गावाला होणारा फायदा याचा विचार करून लागवड करण्याचं आम्ही नियोजन करतो.
सामाजिक भान ठेवून कार्य करणा-यांमध्ये आणि टिव्ही माध्यमामुळे प्रसिद्धी मिळालेल्या आणि परिचित असलेल्या कलाकारांमध्ये माझ्यासोबतच नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, आमिर खान अशी अनेक मंडळी आहेत. आपल्या जीवनाशी निगडित असलेल्या मूलभूत प्रश्नांसाठी स्वतःचे प्रोफेशन सांभाळत ते झोकून देऊन काम करत आहेत. असं असलं तरी अशी कितीतरी लोक जी आजही प्रकाश झोतात नाहीत. पण त्यांच काम एखाद्या आधारवडाइतकं किंवा अगदी हिरो इतकंच नोंद घेण्याएवढं आहे. पण ही माणसं कायमच प्रसिद्धीपासून अलिप्त राहतात. आमच्या चेह-याचा एकच फायदा की, त्यानिमित्ताने तरुणाई वर्ग जो आमचा चाहता असतो, तो ही या निमित्ताने या उपक्रमाशी जोडला जातो. खरं जीवन म्हणजे काय हे समजून न घेता एका आभासी दुनियेत जगण्याला प्रवृत्त करणारी कितीतरी व्यवधानं आपल्या आजूबाजूला असतात. हे आमचं काम लोकांपर्यंत जेव्हा या युवाईच्या माध्यमातून पोहचतं. तेव्हा एक मानसिक समाधान निश्चित मिळतं. अर्थात हा अनुभव सर्वच ठिकाणी नाही येत. काही अनुभव असेही आहेत, की एखाद्या ठिकाणी झाडं लावूया म्हटल्यावर विरोध होतो. मात्र जे लोक आमच्यासोबत आहेत त्यांना घेऊन आम्ही आमचं काम सुरूच ठेवतो आणि काळ उत्तर देत असतोच. आमची कृती दाखवून देते आणि मग विरोधही मावळतो. कारण झाडांचं अस्तित्व मतपरिवर्तन करायला, वातावरण उल्हासित करायला पुरेसं ठरतं. तिथे आम्ही एनर्जी वाया घालवायला जात नाही. ‘आरे‘ मध्ये होणाया वृक्षतोडीबाबत आम्ही एक नर्सरी तयार केली, मात्र तेथे तुम्ही करताय ना? मग तुम्हीच करा. अशा मानसिकतेतून ती नर्सरी तशीच राहिली. विकासकामासाठी होणारी वृक्षतोड थांबविण्यास गेलो, की खूप अडचणी येतात, त्यापेक्षा त्यांना त्यांच काम करू द्या, आपण आपलं झाडं लावायचं काम करूयात, ते इतकं मोठं व्हावं की त्यांच्या तोडीपुढं आपली लागवड असेल, आपल्या देशात झाडं, पर्यावरण याला खूप कमी लेखलं जातं. अनेक देशांत मी पाहिलं आहे, की पर्यावरण आणि सृष्टीला महत्त्वाचं स्थान देऊन त्याची जपणूक केली जाते. रस्त्यावरून जाणा-या प्राण्यांना जागा न दिल्यास गुन्हा होतो, तर आपल्याकडे आपला फॉरेस्ट ऑफिसरच विचारतो, ‘बोला..! कुठलं मटण पाहिजे?‘ याला काय म्हणायचं?
पर्यावरण संरक्षणाच्या आणि झाडांच्या बाबतीत शहरं खूप मागासलेली आहेत आणि खेडी शहर बनण्यासाठी धडपडत आहेत, त्यांचा जीव शहरांकडे ओढला जात आहे. हे खूप दुर्दैवी आहे. मला प्रश्न पडतो, की मी शहरात का आलो? पण माणूस खूप मिळविण्याच्या मागे धावतो आणि आहे ते नाही, अन् नाही ते आहे असे वाटू लागतं आणि आपलीच आपल्याशी एक स्पर्धा सुरू होते, हा मानवी गुणधर्म आहे. त्याला पावसाळा असला की उन्हाळा हवा असतो आणि उन्हाळा असला की, हिवाळा. हे मी ‘तुंबारा‘मध्ये लिहिलंय, माणसाचं आयुष्य ‘तुंबारा‘च आहे. यामध्ये मला एकचं कळलं ते म्हणजे झाडाइतकं खरं काही नाही आणि आई इतकं खरं कोणी नाही बाकी सगळी नाती खोटी आहेत.
प्लास्टिकमुळे निसर्गाचं नुकसान होत आहे. यासाठी धोरणं आणि आपली मानसिकताच जबाबदार आहेत. कोल्हापूरात मी पाहिलं आहे, पंचगंगा नदीत कोणी कचरा टाकू नये म्हणून एक माणूस नियुक्त केला आहे, तर लोक तेथे चोरून नदीत निर्माल्य टाकतात. देवळातून येणा-या निर्माल्याला विरोध नाही, पण ते निर्माल्य प्लास्टिकमधून टाकलं जातं, आता अशी मानसिकता असेल तर सरकारला दोष देऊन काय उपयोग? यासाठी कायदे इतक्या जबाबदारीनं वापरायला हवेत, की त्याची जाणीव अशा मानसिकतेला होणं गरजेचं आहे, असे लोक पुन्हा म्हणायला मोकळे असतात, ‘काय रावं लोक भ्रष्टाचार सुध्दा सुखानं करू देत नाहीत. नुसती डबल ढोलकी झालीयं.‘ सर्वसामान्य माणूस सुधारला तर ही वेळच येणार नाही. खरं तर अशी वेळ, आणि आपल्यावर येणारा दबाव, यासाठी आपणच जबाबदार आहोत. आपण सकारात्मक विचार करून झाडं लावायचं व्रत सुरू ठेवायचं, यंत्रणेला सुधारण्यात जो वेळ जाणार आहे, तो वेळ कामात घालवायचा, माझा सकारात्मकतेवर विश्वास आहे. ही दुनिया चांगल्या विचारांवरच चालली आहे. याचाच उपयोग करून जास्तीत जास्त झाडं आपण लावत राहायची.
मी पाचवी सहावीत असेन. जळण आणायला डोंगरावर जावं लागायचं, तेव्हा तिथल्या झाडांवर मी मारलेल्या ठोका आणि त्या झाडाची थरथर…तेव्हा पहिल्यांदा जाणवली. ती थरथर अस्वस्थ करत राहिली आणि ती थरथर त्या वयात एका कवितेत अवतरली. त्या झाडावरचा प्रत्येक घाव… त्या घावाचा काळीज चिरत जाणारा आवाज…त्या झाडाचं हतबल होऊन पडणं…त्याला घरी आणणं… त्याला वाळवणं… त्याला जाळणं… त्याची राख होणं.. हे सारं मला मानवी जगण्याहून वेगळं वाटत नव्हतं. तिथे जन्म होता… जगण्यासाठीचा संघर्ष होता… मरणयात्रा होती… अंत्ययात्रा होती… आणि ते सारं त्या कवितेत अवतरलं. आज माझ्याजवळ ती कविता नाही; पण त्या कवितेतल्या प्रतिमांनी झाडांचं जिवंत असणं माझ्या मनःपटलावर कायमचं कोरलं. त्या कवितेत उतरलेलं ते रखरखतं आयुष्य आणि त्या विषयीचा तो घणाघाती नाद अजूनही मेंदूत नोंदवला गेला आहे, ज्यातून मला नवं बी रुजवण्याची प्रेरणा सतत मिळते.
झाडं मला तपश्चर्येला बसलेले ऋषी वाटतात. त्यांचं मरण मला स्वस्थ बसू देत नाही. त्या अस्वस्थतेतूनच मी ‘तुंबारा‘ हे नाटक लिहिलं. ‘तुंबारा‘ हे मुक्त छंदातलं काव्यनाट्य होतं. या नाटकातही माणसाच्या उत्क्रांतीचा प्रवास मांडताना निसर्गाचं महत्त्व मला स्पष्ट करायचं होतं. माणूस आधी प्राणी होता. त्यानं झाडं तोडली आणि घरं बांधली. एकेका टप्प्यावर तो विकासाच्या नावावर झाडांच्या कत्तली करत राहिला आणि या विकासानंतर पुन्हा त्याला रानात जावंसं वाटू लागलं आणि तो म्हणू लागला,
आता रानात जाऊया…
आता डोंगरात जाऊया….
तिथे एक कोंब…..
दोन कोंब…. कोंबच कोंब…
एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ…
खरखरीत मायाळू कडा,
त्याला झाडाचा पडलाय वेढा….
दगडाचं झाड विशाल,
त्यावर झाडाची एक मशाल…
तर अशा पद्धतीनं संपूर्ण मानव जातीला सारं सोडून हे कोंब रुजवावे लागणार आहेत. तोच आपल्या अस्तित्वाचा संघर्ष असणार आहे. अशा संकल्पनेवर आधारित ते नाटक होतं; पण हे नाटकही पुरेसं वाटत नव्हतं. त्यातून माझी स्वतःपुरतीच एक चळवळ सुरू झाली.
आता सभोवताली पाहिलं तर मूळची मोठमोठी झाडं आता नष्ट झाली आहेत. हे म्हणजे आपण महापुरुषांना मारुन टाकण्यासारखंच आहे. एवढी वर्षं माणसानं झाडं तोडून घरं बांधली आहेत. आता माणसाला बिल्डिंग तोडून झाडं लावायची वेळ आली आहे. म्हणून मी म्हटलं, आधी आपण आपल्या गावात झाडं लावू. कारण आमच्या गावातलीच झाडं आता कमी झाली आहेत. आपल्याकडून, आपल्या पिढीकडून मोठी चूक झाली आहे हे माझ्या लक्षात आलं. एेंशी-शंभर रुपयांसाठी शंभर-दोनशे वर्षांपूर्वीची झाडं तोडली गेली. या सगळ्या गोष्टी लक्षात यायला मलाही पन्नासएक वर्षं गेलीच ना.. दुस-याला काही सांगण्यापेक्षा स्वतःपासूनच सुरुवात करावी, म्हणून मी माझ्या गावातच झाडं लावायला सुरुवात केली. बीड, माण अशा भागात जिथे बिलकूल पाऊस पडत नाही, तिथे झाडं लावली. झाडांचे वाढदिवस करायचं ठरवलं. मुलांच्या वाढदिवसावर आपण खूप खर्च करतो. आता मोठ्यांचे वाढदिवस करायचं ठरवलं. कसं ते सांगतो – माझ्या आईचा ९२वा वाढदिवस मी केला. झाडाच्या बियांनी तिची तुला केली. तिच्या वजनाएवढ्या बिया आम्ही महाराष्ट्रभर लावणार आहोत. श्रीमंतीची व्याख्या मुळात बदलली पाहिजे. ज्यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत, बंगले आहेत ते श्रीमंत नाहीत. आपण ऑक्सिजन किती घेऊ शकतो तो खरा श्रीमंत. श्रीमंती ही संकल्पना माझी आहे. म्हणून एक रोपवाटिका केली, त्याला ‘सह्याद्री वृक्षबँक‘ असं नाव दिलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात वृक्षबँक असायला हवी. शाळेतली मुलं घ्यायची. त्यांच्याकडून झाडांचं डिपॉझिट तयार करून घ्यायचं. पैशांमध्ये जशी वाढ होते तशी झाडांमध्ये झालेली वाढ पाहून कुणालाही आनंदच होईल. ‘सह्याद्री वृक्षबँक‘ ही संकल्पना लोकांमध्ये रुजवावी असं वाटतंय. त्या पद्धतीनं पहिलाच प्रयोग सुरू आहे. त्यातूनच वृक्षसंमेलनाची कल्पना पुढे आली आहे. बीड, पालवण इथं शासन आणि सह्याद्री देवराई आम्ही मिळून साधारण एक लाख झाडं लावतो आहोत. गेली चार वर्षं काम सुरू आहे. आम्ही आतापर्यंत झाडांचे तीन वाढदिवस केले. एक ‘रॉकगार्डन‘ तयार केलं आहे. तिथे एक वृक्षसंमेलन करायचं ठरवलं. त्याप्रमाणे वडाला अध्यक्षस्थानी ठेवलं होतं. बीड येथील माझे मित्र सिद्धार्थ सोनवणे या प्राणीमित्रानं जखमी गरूडाला बरं केलं. या गरूडाला नैसर्गिक अधिवासात सोडत आम्ही या वृक्ष संमेलनाची सांगता केली.
महाराष्ट्रात ‘सहयाद्री देवराई‘च्या सहका-यांच्या योगदानाने महाराष्ट्रात वृक्ष लागवड वाढत आहे. त्याचबरोबर वनविभागाचा सहभागही वाढत आहे. संस्थेच्यावतीने आमचा पुण्यात ‘देवराई‘ करण्याचा मानस आहे. त्यासाठी सीड बँकही आम्ही करणार आहोत‘. अरविंद जगताप यांची ‘मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ, झाडाचे गुण घेऊ, झाडाचे गुण गाऊ!‘ ही कविता मला फार आवडते. या चळवळीचा भाग म्हणून ९ ऑक्टोबर रोजी पुण्यात ‘सह्याद्री देवराई‘ संस्थेतर्फे ‘वृक्ष संवाद २०२२‘ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यशस्वी वृक्ष लागवड करणा-यांचा, ‘सह्याद्री देवराई‘ संस्थेच्या कृतिशील सदस्यांचा आणि सी.एस.आर.फंडाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीला मदत करणा-यांचा सत्कार केला. देशी वृक्षांच्या बियांची थैली भेट म्हणून सर्वांना दिली. माझ्यासोबत पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, लेखक अरविंद जगताप, डॉ. चंद्रकांत साळुंखे, सतीश आवटे यांनी या संवादातून उपस्थितांना मार्गदर्शन केलं श्रीकांत इंगळहळ्ळीकर, धनंजय शेडबाळे, विजय निंबाळकर, मधुकर फल्ले यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी या वृक्षसंवादला उपस्थित होते. यावेळी मंचावरील कुंडीतील झाडाला अध्यक्षपदाचा मान देऊन कर्यक्रमाला सुरुवात केली. तसेच www.sahyadridevrai.org या संकेतस्थळाचे उद्घाटन केलं. शाळांमधून जसा जन्मदाखला दिल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही तसा देशी बियांची मागणी किंवा रोपांची मागणी करून त्याचे प्रदर्शन शाळेत भरवायचे आणि त्या रोपांची लागवड त्या त्या मुलांकडून करवून घ्यायची. त्याचे वेगळे मार्क मुलांना द्यायचे. त्याची मुलांमधून चर्चा झाली तर त्या मुलांनाही आपण लावलेलं झाड मोठं होताना पाहता, अनुभवता येईल. यातूनच वृक्ष संवर्धनाचं बीज त्यांच्या मनातही रुजेल.
तुळजाभवानी, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिरामधून अभिषेक केल्यानंतर प्रसाद म्हणून वृक्ष प्रसाद ही संकल्पना आम्ही मांडली आहे. बाप्पाचा हा वृक्षप्रसाद भक्तांनी आपल्या परिसरात लावून त्याच्या फळाच्या, फुलांच्या स्वरूपातील प्रसाद आयुष्यभर जपावा अशी त्यांची धारणा आहे. ‘आंब्याच्या नावानं चांगभलं, वडाच्या नावानं चांगभलं‘ असंच आम्ही म्हणतो. कारण, झाडं हीच खरंतर आपल्यासाठी देव आहेत. मी त्यांना ‘सेलिब्रिटी झाडं‘ असंच म्हणतो. या सेलिब्रिटी झाडाकडूनच आपल्याला श्वास, फळ, फुलं मिळतात. ही झाड खरी आपली जीवनदायिनी आहे. ख-या अर्थानं सातत्यानं ते आपल्याला प्रसाद देतात.
जगात एकच भाषा खरी असते, ती म्हणजे आईची भाषा. विचार व्यक्त करायचं ते साधन आहे. मी मराठीचा विद्यार्थी आहे. दुसया भाषेत काम करतानाही आधी ते सगळं मी मराठीत लिहून काढतो. मी जे तेलगू बोलू लागलो, ते सातारी तेलगू झालं. जगातली कुठल्याही भाषेत मी काम करत असलो, तरी मी ते मराठीत करून घेतो. सिनेसृष्टीत येण्याआधी मी स्वतःला प्रश्न विचारला होता की, मला अभिनेता का व्हायचं आहे? त्यातून पुढचा मार्ग सापडला. त्यानुसार तयारी करायला लागलो. सुरुवातीला दररोज एक पुस्तक वाचायचो. माझं एकच म्हणणं असतं की, आपल्याला जी गोष्ट करायला आवडते ती पूर्ण श्रद्धेनं करायची. मी कधीही ऑडीशन दिल्या नाहीत. कलाकारानं ऑडीशन देणं हे मला कधीच पटलं नाही. कलाकारानं समृद्ध व्हायचं, जास्तीतजास्त शिकत राहायचं. तुमचा अभ्यास किती पक्का आहे, हे यातून दिसून येतं. मी माझ्यापरीनं अभ्यास केला होता, म्हणून दडपण जाणवलं नाही. एखादी भूमिका साकारताना त्याची तयारी खूप करतो. मी रोज सकाळी पाच-साडेपाचला उठतो. योगा करतो. चित्रीकरण करत असतो, तेव्हा वेळापत्रक ठरलेलं असतं. पण इतर वेळी फार पळापळ होते. अशा वेळी झाडं लावण्यासाठी जी मंडळी मेहनत घेत असतात, त्यांच्याकडून मला ऊर्जा मिळते.
ह्या सगळ्याचं तात्पर्य असं की, माझा असा ठाम विश्वास आहे, की जेवढं तुम्ही मातीच्या, निसर्गाच्या जवळ जाल तेवढंच तुम्हांला मरणही नैसर्गिक येईल. माझ्या मते आज ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.
वाचकहो, सुरुवातीला मनात असं पक्कं होतं की नेहमीच्या प्रश्नोत्तराच्या धाटणीने मुलाखत घ्यायची आणि आपल्या समोर ठेवायची. पण सयाजी शिंदे हे काय रसायन आहे ते त्यांनी बोलायला सुरुवात केल्यावर कळलं. तहानलेला जीव जसा पाणी प्यायलावर तृप्त होतो..शांत होतो तसाच काहीसा अनुभव हा अवलिया ऐकताना आपल्याला जाणवतो. त्यामुळे विचार केला, की हा अखंड ऊर्जास्त्रोत आपल्या समोर ठेवताना थेट ठेऊया… मध्ये आपली लुडबुड नको. कारण कसं आहे, येणाया सगळ्या पिढ्यांना सावली मिळावी म्हणून झटत असलेले सयाजी शिंदे हे आपल्या विचारानं आणि कृतीनं स्वतःच एक आधारवड झालेत. या ‘आधारवडा‘ची सावली अनुभवायची असेल तर स्वतःच झाडाच्या सावलीत बसावं लागतं. दुस-याचा अनुभव वाचून भागत नाही. अशा ह्या आधारवडाला ‘किरात‘ परिवाराकडून मानाचा मुजरा!!
मुलाखत शब्दांकन –
सीमा मराठे, वेंगुर्ला
९६८९९०२३६७ / ९४०३३६४७६४
वृक्षसंवर्धन याविषयी – सह्याद्री देवराई संपर्क
Email : info@sahyadridevrai.org
Phone – 7715953222
Website – www. sahyadridevrai.org