चरित्रकार वीणाताई

     आपण वाचतो, त्यातली काही पुस्तकं आपल्या लक्षात राहतात.. पण त्यातही आपल्या मनाच्या कप्प्यात आयुष्यभरासाठी मुक्काम करतात अशी काही मोजकीच… वीणाताई गवाणकरयांचं लेखन कायमच आपल्याला ही अनुभूती देतं. त्यांच्या चरित्रातील व्यक्ती ह्या आपल्याला आपल्याशा करतात. कारण, वीणाताईंनी त्यांच्या लेखनातून त्या व्यक्ती जीवंतपणे उभ्या केलेल्या आहेत. इतक्या अभ्यासपूर्ण आणि ताकदीने लिहिलेल्या डॉ. आयडा स्कडर‘,  ‘इंटिमेंट डेथ‘(अनुवादित), ‘एक होता कार्व्हर‘, ‘गोल्डा-एक अशांत वादळ‘, ‘डॉ. खानखोजे‘, ‘भगीरथाचे वारस‘, ‘रॉबी डिसिल्वा‘, ‘सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स‘, ‘रोझलिंड फ्रँकलिन‘, लीझ माईट्न‘, ‘शाश्वती‘, ‘डॉ. सलीम अलीइत्यादी आणि अलिकडेच प्रसिद्ध झालेले अवघा देहचि वृक्ष जाहलाअशा पुस्तकांतून आपलं एक प्रकारे वैचारिक संवर्धनच झालेलं जाणवतं. म्हणजे ही पुस्तकं वाचताना आपल्या लक्षात येतं की, कार्व्हरमध्ये समाजसंवर्धन, रेमंड डिटमर्ससमध्ये पर्यावरणसंवर्धन, अवघा देहचिमध्ये वृक्षसंवर्धन, भगीरथमधून पाणीसंवर्धन!

     या चरित्रात्मक व्यक्तींचं वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्तिचं जीवन सरळ साधं, सोपं असं कधीच नव्हतं. सातत्याने त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार येत होते, मनोभंग होत होते, अपमान होत होते. तरीही या व्यक्ती कधीही आपल्या विचारांपासून, कार्यापासून ढळल्या नाहीत. कोणी दखल घेवो अगर न घेवो, ती प्रत्येक व्यक्ती सातत्याने कार्यमग्न राहिली. प्रदीर्घ काळानंतर त्यांचं कार्य आपल्यासमोर येतं, तेव्हा त्या व्यक्ती राहात नाहीत, तर त्या एक अधिष्ठान होतात. आणि अशी अधिष्ठानं, अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या अवतीभोवती असल्यानेच समाजाचा योग्य तो समतोल साधलेला आपल्याला दिसून येतो. हा समतोल मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वीणाताईंनी केलं आहे. मराठी वाचकांवर एक होता कार्व्हरचं एक प्रकारचं गारुड राहिलंय. त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकांचा हा प्रवास खास किरात वाचकांसाठी….

       वीणा गवाणकर म्हणजे चरित्रकार ही ओळख. अखंड काम करत, स्वतःचं समाधान होत नाही तोवर त्या गोष्टीचा शोध घेऊन व्यक्तिचित्रण लिहिणा­या वीणाताई यांच्याशी गप्पा मारायला मिळणार म्हणून आम्ही उत्सुक होतो. साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेल्या मृदुभाषी वीणाताईंना विचारलं, आपण सर्व चरित्रात्मक पुस्तकं लिहिलीत; तर याच व्यक्तींवर लिहावं असं का वाटलं? कारण लेखन क्षेत्राकडे आपण अपघातानेच वळलात असाही किस्सा आम्ही ऐकलेला आहे, त्याविषयीही थोडंसं सांगाल?

     – ग्रंथपाल असल्यामुळे मी अनेक पुस्तकं वाचत होते. मुळात माझी वाचण्याची आवड, त्यात मला विशेष चरित्रात्मक लेखन अधिक आवडतं. त्यातही नेहमीचा मार्ग सोडून वेगळी पायवाट शोधणारे जे लोक असतात आणि जे वेगळं काही निर्माण करतात अशांचं मला पूर्वीपासूनच एक आकर्षण होतं. त्यामुळे इंग्रजी-मराठी अशा दोन्ही प्रकारच्या भाषांमधील पुस्तकं अधाशासारखी वाचून काढली. जे लोकांना माहीत आहे तेच मी लोकांना सांगणार नाही, हे माझं धोरण होतं. मी काही संशोधनात्मक लिहीत नाही किंवा माझी शोधक पत्रकारिताही नाही. जे मराठीत दिसलं नाही, ते आणावंसं वाटलं. जसं कार्व्हरचं चरित्र. मी वाचलेली पुस्तकं रोज रात्री गोष्टी रूपानं मुलांना सांगत असे. जेव्हा कार्व्हर माझ्या वाचनात आले, तेव्हा त्यांची कथा मी गोष्टी रूपाने मुलांना सांगत होते. ते सांगत असताना माझा मुलगा निम्मी गोष्ट झाली, की झोपून जात असे आणि दुस­या दिवशी सकाळी पुन्हा पहिल्यापासून त्याला ती गोष्टसांगावी लागे. तेव्हा ही गोष्ट तू लिहून का ठेवत नाहीस… म्हणजे मग तुझं आवरेपर्यंत मी त्याला ती गोष्ट वाचून दाखवीन असं माझ्या मुलीने मला सुचवलं. त्यामुळेच ती गोष्ट मी डायरीमध्ये लिहून ठेवू लागले. साडेतीनशे पानांची ती डायरी जवळपास महिन्याभरातच भरून गेली. ती डायरी मी शिक्षकांना वाचायला दिली. तेव्हा त्यांना ती अतिशय आवडल्याचं त्यांनी सांगितलं आणि हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहचायला हवं असंही ते म्हणाले आणि मग याच प्रेरणेतून मी लेखन क्षेत्राकडे वळले.

     आपल्याकडे काहीही नसताना, आजूबाजूला पोषक वातावरण नसतानादेखील ही मंडळी डगमगली नाहीत. आपल्या कार्यात त्यांनी सातत्य ठेवलं. एक प्रकारे स्वतःलाच त्यांनी संवर्धित केलं. समाज, पर्यावरण, वृक्ष, पाणी यांचं संवर्धन, हे सामाजिक मानसिकता बदलण्याचं एक प्रकारचं संवर्धनच असल्याचं मला प्रकर्षाने जाणवलं. आपण आहोत तिथून माणसाला नेहमीच वरच्या दर्जावर जाण्याची, नवीन काहीतरी करून बघण्याची ओढ असते. आपल्याला सांगावसं वाटल्यावर माझ्याकडून लिखाण घडू लागलं.

तुम्ही जी चरित्रं लिहिली त्यात तुम्हांला सगळ्यात जास्त कोणतं आवडलं?

     – माझा हा काही व्यवसाय नाही, पण भारावून जाऊन मी लिखाण केलेलं नाही. जे पटलं, भावलं तेच लिहिलं. मात्र हे करताना ही पुस्तकं मला कोणीही लिहायला सांगितली नव्हती. कारण, पुस्तक लिहिणं हे माझं प्रोफेशन नव्हतं. त्या लिखाणातून मला हवं होतं ते आत्मिक समाधान मिळत होतं.. म्हणून मी लिहीत राहिले. या लेखनावर माझा चरितार्थ मी चालवत नव्हते. त्यामुळे दोन-चार वर्षांत मी लिहिलंच पाहिजे अशी सक्ती माझ्यावर कधीच नव्हती. विशेष म्हणजे जे मराठीत वाचायला मला मिळालं नाही; त्यांच्यावरच मी लिहिलं. प्रथम मी स्वतःला वाचक समजते. ग्रंथपाल असल्याने एखादं चरित्र आवडल्यावर त्याच्याशी निगडित आणखी काही वाचायला मला मिळतं आहे का हे मी त्यातून शोधते. या व्यक्तींवर चांगलं साहित्य मराठीत असायला हवं. यातूनच माझ्याकडून अनेक चरित्रं मराठीतून लिहिली गेली. थोडक्यात प्रत्येक पुस्तक हे माझ्या आवडीतून लिहिलं गेलं. त्यामुळे मला कुठल्याच पुस्तकाच्याबाबतीत अरे बापरे, हे पुस्तक मी का लिहिलं? असं कधीच वाटलं नाही. प्रत्येक पुस्तक लिहिताना दोन-तीन वर्षं कष्ट करावे लागतात; परंतु ते कष्ट मला हवे असतात म्हणूनच घेते. सारी माझीच अपत्य असल्याने अमुक एक आवडलं असं सांगणं कठीण आहे. मात्र, कार्व्हरने मला एक वेगळी ओळख करून दिली आणि पुढे अनेक चरित्रं लिहायला उद्युक्त केलं.

अनेक वर्षं कष्ट घेऊन तुम्ही ते पुस्तक लिहिता हे तुमच्या ताकदीच्या लेखनातून आम्हां वाचकांना वाचताना नेहमीच जाणवतं. एखाद्या व्यक्तीचं चरित्र वाचल्यानंतर त्या चरित्रात अनेक कंगोरे दिसतात, अशावेळी तुम्ही त्यांचं संशोधन कशा पद्धतीने करत होतात? आता सोशल मीडिया, गुगल, नेट वगैरे सर्व हातात आहेत, परंतु तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने संदर्भ मिळवत होतात?

     – वीणाताई म्हणाल्या, खरं सांगायचं तर पुस्तक लिहिण्याची मेथडोलॉजी माझ्याकडे नाही.  जेव्हा मी कार्व्हरलिहिलं तेव्हा त्यासाठी पुस्तकातून संदर्भ शोधून ते लिहिलं होतं. आयडा स्कडरच्या बाबतीत तिचं जिथे कार्यक्षेत्रं होतं, त्या मद्रासजवळील काठपाडीच्या ठिकाणी मी सहा दिवस राहिले होते. त्या काळात तेथील लोकांच्या मुलाखती, वर्तमानपत्राची कात्रणं, व्हिडिओ क्लिप्स, फोटो या सर्वांमधून गोषवारा शोधण्याचा प्रयत्न केला. सलीम अलीयांच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं.

     २००२-०३ नंतर वायफाय, इंटरनेट उपलब्ध झालं असलं तरी इतर पुस्तकं, कात्रणं, मुलाखती, सहवास लाभलेल्या व्यक्ती यांचा आधार घ्यावा लागतच होता. वसईसारख्या ठिकाणी वाचनालयदेखील संपन्न नव्हतं. त्यामुळे अभ्यासासाठी मला दिवसभर मुंबईत जावं लागायचं. कुठल्याही ध्येयाप्रती जाण्यासाठी शोध घ्यावाच लागतो. दुसरी बाजू तपासायची असेल तर समकालीन व्यक्तींचे चरित्र, लेख, साहित्य शोधावं लागतं. मुलाखतीमधून सुद्धा अनेक गोष्टी समोर यायच्या. त्यातून व्यक्तींना भेटणं आणि समजून घेणं हेही फार महत्त्वाचं असल्यानं त्यातून त्या व्यक्तीबाबतचे अनेक कंगोरे उलगडत जायचे. कार्व्हरच्या बाबतीत लिहिताना केवळ कार्व्हर यांच्या चरित्रावरून हे पुस्तक लिहिलं गेलं नाहीये; तर त्यासाठी त्यावेळच्या काळ्या लोकांची गुलामगिरी म्हणजे काय? त्यांची धडपड काय होती? हे समजून घ्यावं लागलं होतं. मग नुसती गुलामगिरी होती म्हणजे काय होते? गुलामगिरीतून मुक्त होणं म्हणजे नेमकं काय? हे समजून घेणं आवश्यक वाटलं. भारतीयांनी अशी गुलामगिरी अनुभवलेली नाही. तर ती आपण वाचून समजून घ्यायला हवी यासाठी सखोल वाचन केल्याशिवाय ते आपल्याला समजत नाही. खानखोजींचे वाचताना त्यांची कुठेच माहिती उपलब्ध नव्हती. इतर लोकांच्या चरित्रातून ती शोधावी लागली. गदर म्हणजे काय? यासाठी गदरचा इतिहास शोधावा लागला. शंभर पानी पुस्तक लिहिताना हजार ते दीड हजार पानं वाचावीच लागतात. त्यासाठी अवांतर वाचन हा एक महत्त्वाचा भाग आहे.

     वीणाताईंची निरीक्षण शक्ती, मेहनत, बारीक गोष्टींचा विचार हे त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत होते. टेलिफोनिक गप्पा असल्या तरी त्या समोर बसून गप्पा करताहेत असंच वाटत होतं.

ताई, निसर्ग साहित्यसंमेलनाचं आपण अध्यक्षपद भूषवलं होतं, निसर्ग साहित्य समृद्ध व्हावं याबद्दल आपल्याला काय वाटतं?

     असा प्रश्न विचारल्यावर वीणाताई गोड हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘तो त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. माझे वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र किवा भूगोल हे विषय नाहीत. मराठी घेऊन मी बी.ए. झाले. वाचन हा माझा आवडता छंद. पाणी प्रश्न, वृक्ष लागवड असं पर्यावरणाशी, निसर्गाविषयी संबंधित काम केलेल्या व्यक्तिंना ललित भाषेत, चरित्राच्या रूपातून मी पुढे आणलं. या घडलेल्या ख­या आयुष्यातील गोष्टी असल्या कारणानं ती चरित्रं वाचकांना आपल्या जीवनाचा एक भाग वाटतात. एखादी गोष्ट सैद्धान्तिकदृष्ट्या सांगण्यापेक्षा कोणीतरी हे केलं आणि त्यांनी केलेलं हे जेव्हा दिसून येतं, त्याची चरित्रातून मांडणी केल्यानंतर स्वाभाविकपणे लोक ती चरित्रं वाचतात आणि दादही देतात. खरं तर मी वनस्पतींवर काही लिहिलं नाही, इतकंच काय मी केवळ पर्यावणावरही लिहू शकत नाही. कारण माझं अभ्यासाचं ते क्षेत्र नाही. शास्त्रीय माहिती देणारे जे लोक त्या त्या क्षेत्रात काम करतात, त्यांनी वेगळं काही काम करून लोकांचं लक्ष त्या विषयाकडे वळवलंय अशा माणसांची चरित्रं मला सर्वांसमोर आणावीशी वाटली. निसर्ग-पर्यावरण यात रुची निर्माण करणारं ललित साहित्य मी लिहिल्यामुळे त्या आयोजकांनी मला निसर्ग-साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं असावं.

तुमच्या चरित्रात्मक पुस्तकांबद्दल, त्यातील व्यक्तींबद्दल काय सांगाल?

     माझ्या चरित्रातल्या व्यक्तींच्या ज्या यशाच्या कथा आहेत किंवा मी जे लिहिलंय ते त्यांनी वर्षानुवर्षं काम केलेलं होतं. एक दोन वर्षांत त्यांनी हिरवा डोंगर केलेला नव्हता; तर जवळजवळ ५० वर्षं त्यावर त्यांनी मेहनत घेतलेली होती. त्यात सातत्य होतं. या सातत्यामध्ये त्यांनी यश-अपयश दोन्हीही अनुभवलेलं होतं. लोकांचा उपहास सहन केलेला होता किवा अनेकवेळा सामाजिक विरोधसुद्धा सहन केलेला होता. तेव्हा या सगळ्यात टिकून राहून स्वतःच्या तत्त्वांशी, विचारांशी ते प्रामाणिक राहिले आणि त्यातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं हे त्यांच्याविषयी वाचल्यानंतर मला समजलं. लिझ माईटनरहिच्या बाबतीत हिटलरच्या जर्मनीला प्रयत्न करूनही तिचे पायाभूत संशोधन दडपता आले नाही. अशा एका अणुशास्त्रज्ञ स्त्रीची ही चरित्र कहाणी. पंधरा वेळा नामांकन होऊनही तिला नोबेल पुरस्कार मिळाला नाही. वंशद्वेष आणि आत्यंतिक राष्ट्रवादाचा ती बळी ठरली. इतकंच नाही तर तिच्या शोधाचं श्रेयदेखील हिरावलं गेलं. तरीही तिचा असलेला ठसा कोणालाही मिटवता आलेला नाही. ही जी जिद्द आहे, हे प्रयत्न आहेत ते खरंच इतके प्रेरणादायी आहेत, की मग आपल्या लक्षात येतं, की यांच्याइतकं आपल्याला काहीच सहन करावं लागलं नाही किंवा काही भोगावंही लागलेलं नाही. काही नसताना या व्यक्तींनी इतकी उत्तुंग भरारी घेतलीय, तर सर्व असताना आपण कशाची तक्रार करतोय? जितका वेळ आपल्याला मिळाला आहे तितकाच याही व्यक्तींना मिळाला होता, त्यांनी खरंतर आपल्याला त्यांच्या या वाटचालीतून खरं जगणं शिकवलं. जे आपल्याही जगण्याशी निगडित आहे.

     माझी पुस्तकं म्हणजे प्रबंध नाहीत. माझ्यादृष्टीने सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या ओळखी मी पुस्तकरूपातून करून दिल्या आहेत आणि मुख्य म्हणजे आपण जे बोलतोय, लिहितोय ते कुणाला तरी आवडतेय यातच मला समाधान मिळतं.

     वयाच्या ८०व्या वर्षीही तुमचा अभ्यास सुरूच आहे हे तुमच्या लेखनातून आम्हांला अनुभवायला मिळतंय. त्यात एक ध्यास असतो, जो दिसून येतो. तुम्ही कायमच नवीन आणि जुन्याची सांगड घालत असता. अशावेळी तुम्ही स्वतःला कसं जपता आणि स्वतःला कशाप्रकारे संवर्धित करून लिहिता? कारण लेखन ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी एकांत लागतो. असं म्हणताच वीणाताई म्हणाल्या, लिहिण्यासाठी मुख्य वाचन लागतं. या क्षेत्रात म्हणाल, तर एखादी व्यक्ती आपल्याशी बोलते, आपण तिला ओळखतो म्हणजे त्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी आपल्याला माहीत असतात असं नाही. अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर कार्व्हरने मला यश दिलं. पण त्यातच मी अडकून पडले नाही. जर का मी त्याच यशात अडकून पडले असते तर माझ्याकडून नवीन काहीच लिहून झालं नसतं. मागचं मागे ठेवून नवीन शोधत राहिलं पाहिजे.

     सुरुवातीला कार्व्हरविषयीचा मी लिहिलेला लेख माणूसया दिवाळी अंकात छापून आला तेव्हा याचं आपल्या हातून पुस्तक होईल, ते लोकांना कितपत आवडेल, त्याच्या एक-दोन आवृत्या निघतील कदाचित; एवढंच मनात होतं. मात्र त्याच्या लागोपाठ दरवर्षी आवृत्ती निघायला लागल्यावर, अरेच्चा! असंही असतं? याचं मलाच नवल वाटलं. मात्र त्यातून आत्मविश्वास वाढला. आपण जे लिहिलं आहे किंवा आपण ज्या पद्धतीने लिहीत आहोत ते वाचणारा एक वाचकवर्ग कुठेतरी आहे, ही भावना नक्कीच सुखावह होती आणि आहे. ही लेखनाची पद्धत मी बदलू शकत नाही, कारण मला भाषिक प्रयोग करायचे नव्हते. मी जे मांडलं ती भाषा मला सुदैवाने येते आणि ती लोकांनाही आवडते. या माझ्या भाषेत गेले अनेक वर्षं मी जे वाचत होते, त्या भाषेचे माझ्यावर झालेले हे संस्कार आहेत. त्यात अशीही काही पुस्तकं माझ्या वाचनात आली आणि त्यातून कसं कंटाळवाणं लिहू नये तेही कळलं. मला जे सांगायचं आहे, त्यासाठी मी माझी भाषा साधी, सरळ, सोपी ठेवली. मला क्लिष्ट समजत नाही आणि लिहिताही येत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे जसं मी बोलते तसंच लिहिते. तुम्ही भाषा जर कृत्रिमपणे वापरायला लागलात तर पुस्तकही कृत्रिम होतं. माझ्या कुटुंबाने माझ्या लेखनासाठी, अभ्यासासाठी चांगलं पोषक वातावरण दिलं. त्यामुळे मी मनानं आजही तरुण आहे. सातत्याने नाविन्याच्या शोधात राहिल्यामुळे, अनेकांचं कष्टपद जीवन ऐकल्यानं, वाचल्यानं आपण किती सुखात आहोत, याची जाणीव होते आणि त्यातून आपोआप स्वतःला संवर्धित केलं जातं.

डिजिटल युगातील आजच्या नवोदित लेखकांना तुम्ही एक लेखक म्हणून काय मार्गदर्शन कराल?

     यावर त्या म्हणाल्या, खरं म्हणाल तर मी डिजिटल युगाची अत्यंत ऋणी आहे. अलिकडे भावी पिढीमध्ये फीअर ऑफ मिसिंग आऊटचा जो फोमोतयार झाला आहे, त्यात ही पिढी अडकली आहे. सगळं मिळवायला हवंच्या नादात त्यांची एक प्रकारची घाई असते. आता पुष्कळ नवोदित मला पुस्तक वाचायला पाठवतात, तेव्हा त्यांना मी आवर्जून सांगते, की तुम्ही जे लिहिलं आहे ते शांतपणे वाचा, कुणाला तरी वाचायला द्या. त्या पुस्तकाच्या लेआऊटबरोबरीनेच त्यातील भाषेकडे लक्ष द्या. तुम्ही जे लिहिलं आहे ते नुसतं घाईघाईत न छापता पुन्हा पुन्हा वाचा. थोड्या अवधीनंतर पुन्हा वाचलंत तर तुमच्या चुका तुम्हांला कळतील. अगदी मुद्रणदोष वगैरे… ह्या तांत्रिक बाजू आपण बाजूला ठेवल्या तरी आपण जे लिहितोय त्यात एका वाक्याचा पुढच्या वाक्याशी काही संबंध आहे का हेही पडताळा. स्वतः संपादक बनून लेखनसंस्कार करण्याचा प्रयत्न करा.

     दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षण पाहिजे, तुमची सजगता पाहिजे, मी म्हणत आहे याला दुसरी बाजू आहे का? उद्या दुस-यांनी कोणीतरी काही आक्षेप घेतला तर अशावेळी आपली माहिती चुकीची नाही ना याचा सर्व बाजूंनी विचार करून मगच ते छापलं पाहिजे. यासाठी मला अवांतर वाचन वाढवायला हवं. म्हणजे या सर्व सावधगिरीने करायच्या गोष्टी आहेत. घाईने किंवा एकच बाजू समजून घेऊन होत नाही. यासाठी सखोल अभ्यास, वाचन आणि सतत जागरूकता पाहिजे. अभ्यास जर आपल्याला खात्रीपूर्वक मांडायचा असेल तर तो तज्ज्ञांकडून तपासून देखील घेतला पाहिजे. एखादी गोष्ट पाहून ती आत्मसात करा आणि मग ती लोकांना सांगा. यामुळे ती लोकांच्या अंतःकरणावर कोरली जाते. पुस्तक आपल्या नावावर असावं असं वाटणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत, संयम आणि वेळ लागतो. घाई करून चालत नाही असं मला वाटतं. आता तर आजूबाजूला विषय खूपच आहेत. ज्याला ज्या विषयात गम्य आहे, आवड आहे त्यांनी ते लिहावं. डिजिटल युगाचा आपण कुठल्या नजरेनं आणि कसा वापर करतो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. मला डिजिटल युग हे वरदान वाटतं. आणि मी त्याचा माझ्या अभ्यासासाठी पुरेपूर वापरही करून घेते.

     ‘एक होता कार्व्हरयाबद्दल खूप ऐकायला मिळते तशीच तुमची अन्य पुस्तकंही रंजक आहेत. संवर्धन हा आमच्या अंकाचा विषय आहे आणि तुमचे अवघा देहचि वृक्ष जाहला..यातही संवर्धन आहे… तेव्हा या पुस्तकाबाबतचा प्रवास वाचायला वाचकांना नक्कीच आवडेल.

     – हे पुस्तक माझ्या मनात तीस वर्षांपूर्वी होते. म्हणजे मी तेव्हा पन्नाशीत होते. तरुण होते. पुण्याच्या संस्थेनं माझ्याकडे लेख मागितला होता. निसर्गसेवकया दिवाळी अंकासाठी रिचर्ड बेकर यांच्या कार्याचा उल्लेख करीत तो लेख मी लिहिला. यासाठी पुस्तकातून संदर्भ मिळवित तो विषय मी शोधून काढला. नि मला खूप आवडला. त्यामुळे मला शाळेत किंवा अन्य कुठे बोलायला बोलावले की मी त्यांच्याविषयी आवर्जून माहिती देत होते. अतुल देऊळगावकर यांच्या ग्रेटाची हाक ऐकू येतेया पुस्तकाच्या प्रकाशनवेळी पुन्हा मी रिचर्ड बेकरयांची गोष्ट सांगितली. शंभर वर्षांपूर्वी हा माणूस वृक्षसंवर्धनाची चळवळ जगभरात रुजविण्यासाठी प्रयत्न करत होता. १०० वर्षं याच्यासारखी व्यक्ती हाका मारत असूनही आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतोय. नंतर लोकांनी मला विचारलं हा बेकरकोण? तेव्हा मला जाणवलं की, अरेच्चा!

      हा लोकांना माहितीच नाहीये. त्याबद्दल लिहावं. म्हणजे ३० वर्षं डोक्यात असूनही मी त्यांच्याबद्दल लिहिलं नव्हतं. कारण, ब-याच वेळा मनात असूनही आपण लिहितोच असं नाही. तेव्हाची परिस्थिती आजही बदललेली नाही. १९२२मध्ये तो जे प्रयत्न करत होता तोच प्रयत्न २०२२मध्येही सुरू आहे. तीच समस्या आहे, हे जाणवल्यानंतर या पुस्तकासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं वाटलं आणि मग मी ते कोरोनाच्या पहिल्या लाटेत लिहिलं. यासाठी लंडनच्या मैत्रिणींनी मला पुस्तकं पुरविली. त्यावेळेला पोस्ट ऑफिस बंद, बाकी अन्य सुविधाही आणि  ट्रान्सपोर्टच्यासेवाही बंद. त्यामुळे या मैत्रिणीने अक्षरशः पानच्या पानं व्हाट्सअॅपवर पाठवली. मुलाने त्या पानांच्या प्रिंट काढून, स्पायरल बायडिंग करून ती पानं माझ्याकडे सुपूर्द केली. डिजिटल युगाचा या पुस्तकाच्या वेळी मी प्रचंड उपयोग करून घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाचा मला हा असा उपयोग झाला आणि त्यातून अवघा देहचि वृक्ष जाहलाहे पुस्तक आकाराला आले.

     अजून कुठल्या नवीन पुस्तकाविषयी तुमचं काम सुरू आहे का असं विचारताच वीणा ताईंनी मारिया मोंटेसरीचा माझा अभ्यास सुरू आहे, असं सांगितलं.

     खरंच वीणाताईंचा हा प्रवास ऐकताना आम्ही भारावून गेलो होतो. कारण त्यांची मेहनत, चिकाटी, शोधक वृत्ती, ध्यास, वाचकांना वेगळं काही तरी देण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी लागणारा सखोल अभ्यास त्या प्रत्येक पुस्तकासाठी तळमळीने करतात. हे सर्व गुण आमच्यासारख्या नवोदितांनी आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. अनेकांची चरित्रं लिहिणा­या वीणाताईंबद्दल आम्हांला लिहायला मिळालं हे आमचं भाग्यच. आवडत्या गोष्टी करायला वयाची सीमा नसते हे त्यांच्याशी गप्पा मारताना सतत जाणवत होतं. वयाच्या ८०व्या वर्षी सतत कार्यमग्न असणा­या वीणाताईंशी मारलेल्या गप्पांमधून त्यांचं व्यक्तिमत्त्व आम्हांला समृद्ध करत होतं. हा त्यांचा प्रवास वाचकांनाही असाच समृद्ध करेल, याची आम्हांला खात्री वाटते. त्यांची ही चरित्रं वेळ असेल तेव्हा आवर्जून वाचा. दिवाळीच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

                 

मुलाखत शब्दांकन –

क्रांती गोडबोले-पाटील, डोंबिवली * ९१३६००२०६४

सीमा मराठे, वेंगुर्ला – ९६८९९०२३६७ / ९४०३३६४७६४

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu