सहज संवाद

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही गोष्ट अनुभवावयाची असेल, प्रत्यक्ष जाणून घ्यायची असेल यासाठी तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या सहवासात एक दिवस काढावा लागेल, अत्यंत साधी राहणी, शांत आणि संयमी स्वभाव. साधा लांब हाताचा शर्ट पॅन्ट, साधी चप्पल अशा पेहराव्यात त्यांचा वावर असतो. हे व्यक्तिमत्व साहित्य वर्तुळात इतके उत्तुंग आहे की, त्यांच्यासमोर गेल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श केल्याशिवाय कुणालाच समाधान लाभत नाही.

     दिवाळी अंकासाठी चंद्रकुमार नलगे यांच्याकडून एखाद्या विषयावर लेखन घेण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील केर्लेयेथील त्यांच्या घरी पोहोचलो. घर अत्यंत साधे, चौकशी करता ते आपल्या पेट्रोल पंपावर असल्याचे समजले. एकीकडे पन्हाळगड आणि दुसरीकडे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबाचे देवस्थान याच्या मध्यावर वाघबीळ येथे त्यांचा पेट्रोलपंप त्याठिकाणी पोहोचल्यानंतर कार्यालयात गेलो. दुपारचा दीड वाजला होता. कार्यालयात जमिनीवर बसून नलगे सर जेवण घेत होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नलगे यांनी शेतात बैठक मारून शेतकरी ज्याप्रमाणे जेवण घेतो त्याच पद्धतीने त्यांची बसण्याची पद्धत मला आश्चर्यात टाकून गेली. ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्यांच्या नव्वद वर्ष वयाएवढी त्यांची पुस्तक निर्मिती आहे अशा साहित्यिकाचे निवासस्थान असो, बैठकीची जागा असो, एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव सार्वत्रिक स्वरूपात येत असल्यामुळे नलगे सरांच्या साधेपणाचे कौतुक तर वाटलेच. परंतु त्यांनी आपणहून स्वीकारलेली ही जीवनशैली आहे असे त्यांच्या संवादातून समजून आले. ते हळूहळू जेवत होते. मी त्यांच्याशी संवाद करत होतो.

     आपल्या लेखन प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळातील झालेल्या चळवळीचा आणि महात्मा गांधींच्या विचारांचा जसा माझ्यावर प्रभाव आहे. त्याचपद्धतीने लेखन प्रवासात संत गाडगेबाबा यांचा आदर्श माझ्यासमोर राहिला आहे. प्राथमिक शाळेत असतानाच संत गाडगेबाबांच्याबरोबर स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांचे किर्तन, प्रवचन ऐकून माझ्या विचाराची बैठक पक्की झाली. माझ्या लेखनाचा प्रारंभ करण्यासाठी संत गाडगेबाबा हाच माझा आदर्श राहिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल.

        मराठी सातवीत असताना माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. नववीमध्ये असताना प्रकाशित झालेल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. महाविद्यालयीन जीवनात दुस­या वर्षाला असताना अंगाईचित्रपटाची कथा लिहिली. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. सांगायचा मुद्दा म्हणजे अगदी विद्यार्थीदशेपासून संत गाडगेबाबा यांच्या विचाराने आम्ही प्रभावित झालो आणि लेखनाचा माझा प्रवास सुरू झाला.

साहित्य क्षेत्रात आला नसता तर कोण झाला असता?

     या प्रश्नांवर ते म्हणाले, कुणीच झालो नसतो. घरची शेती, वडील शेतकरी, मी शाळेत जायला त्यांचा विरोध. शाळेत चुकून गेलो तर खूप मार पडायचा, परंतु माझी जिद्द कायम होती. आईचे मला पाठबळ होते. त्यामुळेच मी शिक्षण घेत होतो. वडीलांचा विरोध होत असतानाही शिक्षण सुरू होते. शिकुन मुले बिघडतात असा त्याकाळात एक समज होता. त्यामुळेच वडीलांचासुद्धा मला शाळेत जाण्याला विरोध होता. परंतु, ज्यावेळी माझी पुस्तके प्रकाशित होऊ लागली, त्यावेळी वडीलांना कळून चुकले की, मुलगा खरोखरच शिक्षणाच्या प्रवाहात काहीतरी करील, माझ्या आईला तर विश्वासच होता. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे महाविद्यालयात असतानाच प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली. तब्बल तेरा वर्ष प्राथमिक शाळेत मुलांना संस्कारक्षम घडविण्याचा प्रयत्न केला, नंतर गडहिग्लजमथील शिवराज महाविद्यालयात मराठीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. शिक्षण घेता घेताच एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने विद्यार्थी दशेपासून सुरू झालेला माझा लेखन प्रवास आज नव्वदाव्या वर्षीही अखंडपणे सुरू आहे, याचे अनेकांना आश्चर्य आणि कौतुकही वाटते. 

     इतक्या उंचीवर गेलेल्या साहित्यिकाचे पाय आजही जमिनीवर आहेत. गर्व नावाची गोष्ट त्यांना स्पर्श करू शकलेली नाही. अत्यंत शांत स्वभाव, कमीत कमी बोलणे असे असले तरी एखाद्या कार्यक्रमात व्याख्यान देताना आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविताना त्यांच्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि प्रबोधन व संस्कार करण्याचा विचार आपसुकच बाहेर येत असे.

     नलगे यांची व्याख्याने ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप­यातील वाचकवर्ग आणि तरूण विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत असतात. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या लेखनाचे लाखो विद्यार्थी चाहते आहेत. असा हा एका उंचीवर पोहोचलेला साहित्यिक इतक्या साधेपणाचे जीवन कसा जगू शकतो ही गोष्ट सुद्धा सर्वांच्या औत्सुक्याची आहे.

     त्यांच्या कार्यालयात हा संवाद करीत करीत त्यांचे जेवण पूर्ण झाले. त्यानंतर कुणीतरी कर्मचारी येऊन ताट घेऊन जाईल असे वाटत असतानाच स्वतः ते जेवणाचे ताट घेऊन बाहेर गेले. ताट, वाटी स्वच्छ धुवून त्यांनीच आणून ठेवली. जेवता जेवता झालेला संवाद आणि त्यानंतरचा संवाद यामध्ये एक सूत्र कायम होते. जीवनशैली मी आपणहून स्वीकारलेली आहे. आज समाजात सर्वत्र अस्वस्थता पहायला मिळते. कितीही ऐश्वर्य मिळाले तरी माणसाकडे समाधान नावाची गोष्ट पहायला मिळत नाही. या सर्वांचा विचार केल्यानंतर आपल्या बदलत्या जीवनशैलीतूनच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मात्र ही गोष्ट समजून घ्यायला आणि कबूल करायला कोणाचीच तयारी नसते. सकाळी घरातून नऊला पेट्रोल पंपावर आल्यानंतर सायंकाळी सहापर्यंत पेट्रोलपंप परिसरातच असलेल्या कार्यालयात ते असतात. त्याचठिकाणी लेखन सुरू असते. येणा­यांशी त्यांचा संवाद सुरू असतो. लेखनाबाबतही त्यांना विचारले. एखादा लेख लिहिण्यास किती वेळ लागतो. त्यावर ते म्हणाले, किमान चार ते पाच दिवस लागतात. स्वतःच्या उत्तम हस्ताक्षरात, आखीव कागदावर त्यांचे लेखन असते. त्यात खंड पडत नाही. आज अर्धवट राहिलेले लेखन दुस­या दिवशी सुरू करताना कोणताही अडथळा होत नाही. पुढील लेखन अखंड सुरू राहते. डोळ्याला चष्म्याशिवाय लेखन करीत असतात. दोन तासाच्या त्यांच्या सहवासात त्यांच्या जीवनप्रवासातील काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कौटुंबिकस्तरावर अनेक आघात झाले. आज एकाकीपणा असला तरी अखंडपणे लेखनामध्ये ते तरंगत असतात, त्यामुळे एकाकीपणावर मात करून अत्यंत समाधानाने आणि आनंदाने त्यांचा दिनक्रम सुरू असतो.

     साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणुकही त्यांनी एकदा लढविली होती. त्यात यश मिळाले नाही. परंतु त्याची त्यांना बिलकुल खंत नाही. साहित्याच्या दरबारात मला आयुष्यभर सेवा करण्याची जी संधी मिळाली आहे. त्यामुळेच माझे जीवन समृद्ध झाले आहे. समाजात विविध प्रकारचे मतप्रवाह असतात. कोणी चांगले म्हटल्याचा फारसा आनंद नाही, वाईट म्हटल्याचा खेद वाटत नाही. एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे लेखनाच्या वाटेवर अखंड चालत राहणा­या या नव्वद वर्षाच्या साहित्यिकाची तेवढीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्याच्या प्रत्येक अंगाला त्यांनी आपल्या लेखनातून स्पर्श केला आहे. अशा या उत्तुंग लेखकाला, साहित्यिकाला प्रबोधनकाराला आणि एका साध्या जीवनशैलीतील चांगल्या माणसाला मनापासून धन्यवाद आपणही एकदा प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या सहवासात जाऊन माझ्यासारखाच अनुभव घ्यावा, त्यांचा सहवास अत्यंत भारावलेला असतो. त्यातून आपल्याला नवी ऊर्जा मिळते, नवे शिकायला मिळते, जीवनाची नवी दिशासुद्धा मिळते. अर्थात आपण त्यादिशेने विचार मात्र केला पाहिजे.    

  मुलाखत शब्दांकन –

सुभाष  धुमे, (ज्येष्ठ पत्रकार) दूरध्वनी- (०२३२७) २२६५१०

 

Leave a Reply

Close Menu