राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे वेंगुर्ले बंदर पुनर्जीवित करावे, त्याचबरोबर वेंगुर्ले बंदर विकसित करण्यासाठी मेरिटाईम बोर्ड, फिश डिपार्टमेंट आणि पर्यटन विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन आधुनिक बंदर उभे रहावे यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मंत्रालयात भेटीदरम्यान केली.
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे मंत्रालयाच्या दालनात भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर आणि मच्छीमार पदाधिकारी यांनी मच्छिमारांच्या विविध समस्यांबाबत भेट घेतली. यावेळी शरद चव्हाण, आमदार उमाताई खापरे, मच्छीमार बाबा नाईक, अशोक सारंग, श्याम सारंग, रामचंद्र आरावंदेकर, अमोल गोकरणकर, योगेंद्र मोर्जे, राजेश केळुसकर, किशोर सागवेकर, किशोर नाईक, उमाकांत मोर्जे, सतीश मोर्जे, काका घाटवळ आणि मच्छिमार उपस्थित होते.
यावेळी वेंगुर्ले बंदर विकास व मच्छिमारी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छिमारांच्या समस्यांविषयी केंद्र सरकारच्या सल्ल्याने सर्व मच्छिमारांना समान न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारचे एकच मत्स्यधोरण असावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच लवकरच राज्यात बंदर विकास धोरण ठरवून तिथल्या साधनसामुग्रीवर आधारित सर्व प्रकारच्या मच्छिमार वर्गाला सक्षम करणार आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करून देणार असल्याचे सांगितले. यासाठी लवकरच केंद्राची एक कमिटी येणार असून ते स्वतः त्या कमिटीसोबत येऊन मच्छिमारांच्या समस्यांविषयी स्वतः जाणून घेणार असल्याचे सांगितले.