२६ जानेवारी आणि कॉमन मॅन

  २६ जानेवारी १९५० पासून घटनेची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा डॉ. आंबेडकरांनी म्हटले की, आजपासून देश लोकशाहीप्रधान असेल की त्या दिवसापासून लोकांचे सरकार असेल, जे लोकांनी बनविलेले व लोकांच्यासाठी बनविलेले असेल. लोकशाही केवळ उत्कृष्ट स्थितीत नव्हे तर चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी आपले सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करण्याच्या घटनात्मक पद्धती गतिमान ठेवणे गरजेचे आहे म्हणजेच क्रांतीच्या रक्तपात युक्त पद्धती, सविनय कायदेभंगाची पद्धती, असहकार आणि सत्याग्रहाची पद्धत सोडून दिली पाहिजे. ते म्हणतं ज्यांनी जन्मभर देशाची सेवा केली अशा थोर माणसांविषयी कृतज्ञता बाळगण्यास काहीच हरकत नाही पण त्या कृतज्ञतेला मर्यादा असाव्यात. धर्मामध्ये भक्ती आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असेल पण राजकारणात भक्ती किंवा नायकपूजा (नेत्यांवरील श्रद्धा) अवनतीकडे व शेवटी हुकूमशाहीकडे देशाला नेऊ शकते सध्या स्थितीत त्यांच्या म्हणण्याची प्रचिती येताना दिसते, कारण आजचे राजकारण व समाजकारण व्यक्ती केंद्रित बनत चालल्याने भविष्यात लोकशाहीला धोका संभावण्याची भीती कॉमन मॅनच्या मनात निर्माण झाल्यावाचून रहात नाही.

     भारतीय संविधानाने देशातील जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला. अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे हक्काचे शस्त्र दिले. देशातील जनतेला राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक हक्क मिळवून दिले. न्याय, आचार विचार, धर्म, वंश, परंपरा, जात यावर आधारित भेदभावास कायद्याने मनाई करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य जीविताचा अधिकार, अल्पसंख्यांक संरक्षण इ. मूलभूत हक्काची ग्वाही दिली. भारतीय लोकशाही केवळ राजकारण नसून तिला सामाजिकतेची किनार लाभली आहे.  यामध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या लोकशाहीच्या मुल्यांची जपणूक केली जाते हे सर्व जरी खरं असलं तरी सुद्धा आजच्या प्राप्त परिस्थितीचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. देशात आधुनिकतेच्या नावावर प्रगती साधत असताना बेचिराख केली जाणारी माणसं, वस्ती, शोषितांची मानसिकता त्या मानसिकतेचे जाणारे बळी, विकासाच्या नावाखाली देशोधडीला लागलेली माणसे, त्यांच्या खचलेल्या, पिचलेल्या देहातील आठवणी, जगण्याचे उसने अवसान आणत विकासाची वाट शोधणारी दुबळी नजर व मानसिकता ह्या सर्व विकास प्रक्रियेत कॉमन मॅनच नेमकं स्थान कोणतं व कोठे आहे? आजकाल शोषितांचे मरण स्वस्त झाले असून गिधाडांची फौंज त्यांचे लचके तोडत आहे. वैचारिकतेच्या लेखणीवर हल्ले करून त्यांचे हात कलम केले जातात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत खरं बोलणा­यांच्या जीभा छाटण्याचे अवसान दिले जात आहे. असंवेदनशील मानसिकता संवेदनशीलतेवर प्रति हल्ला करत आहे.

     माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणसाचे आयुष्य इतके आक्रसून गेले आहे की ते मोबाईलच्या स्क्रीन सारखे प्रति सेकंद बदलत जाते. ज्यांच्या जीवनाचे बुजगावणे झाले आहे, कानशीले बधिर झाली आहेत. त्यांच्या पायाखालच्या जमिनीतून आक्रंदणारे स्वर किती भयानक आहेत हे भ्रामक अस्मितेच्या गाळात रूतलेल्या हिंसक मनोवृतीला अद्यापही कळत का नाही? सर्व सामान्य जनतेला फसव्या विकासाची स्वप्ने दाखवत त्यांना आशाळभूत जीण जगण्यास भाग पडले जात आहे. अशा मनोवृत्तीला विवेकीपणा कधी येणार? धर्मांधतेच्या अविचारी वैचारिकतेतुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुडदा पाडू पाहणा­यांना हे का कळत नाही, की प्रत्येक जातीच्या झेंड्याच्या मुळाशी धमन्यातून वाहणारे रक्त एकच असते ते फक्त माणुसकीचे. भुकेलेल्या डोळ्यातील आग, बेघर झालेले अनाथ, रेड लाईटच्या मंद प्रकाशात पोटाची खळगी भरणा­या ललना, डोंगरदर्‍यात वावरणारे सामान्य जन कृतीत लोळणा­यांना एक तुकडा भाकरीसाठी वणवण करणा­यांची किमत कळणे अवघड आहे. प्रत्येक ठिकाणी कॉमन मॅन गृहीत धरला जात आहे. ह्या सर्वात ख­या अर्थाने राजकीय, सामाजिक व आर्थिक बदल घडत गेल्यास कॉमन मॅन प्रजासत्ताकाची गोड फळे निश्चितच चाखेल.                   संजय तांबे, कणकवली, ९४२०२६१८८८

Leave a Reply

Close Menu