एकाच आयुष्यात केवढे कार्य

इतिहासातील नाही वर्तमानातील व्यक्ती. ब्राह्मण कुटुंबातील सामान्य स्त्री. त्या काळातील योग्य वयात विवाहबद्ध. यथावकाश दोन मुलांची माता. त्यात मिळालेली किवा करावी लागलेली बँकेची नोकरी. काय वेगळे करता येणार? सरधोपट आयुष्य जगून काळानुसार विस्मृतीत जाणार. हीच कल्पना करू शकतो. पण आरती संजय कार्लेकर ही व्यक्ती यासाठी जन्मलीच नव्हती.

       बँकेच्या नोकरीच्या प्रारंभात वरिष्ठांकडून झालेली छळणूकच रणरागिणीच्या पुढील नाट्यमय आयुष्यातील नांदी होती. पुण्यासारख्या महानगरात छोटी मुले पदरात असताना राजकीय गुंडांना प्रसंगी तलवार दाखवणा­या या दूर्गेने पुढे डोळ्यांच्या आणि शब्दांच्या तलवारीने अनेक संकटात संकटमोचकाची भुमिका पार पाडली. कित्येक भरकटलेल्या जीवांना आधार दिला. जिल्हा विधी प्राधिकरण सदस्या म्हणून चोख कामगिरी पार पाडली.

       संसार रथ हाकताना प्रसंगी दुचाकी /चारचाकी रथ हाकलेच; पण गरज निर्माण झाल्यावर टेंपोही चालवला. नोकरीच्या जोडीला गॅस एजन्सी, भेळ गाडी सारखे व्यवसायही केले.

       सिंधुदुर्गाच्या साहित्य चळवळीत महिला साहित्याला मानाचे स्थान मिळवून देण्यातही आपला वाटा जरूर उचलला. महिला साहित्यिकांना संघटीत करत अनेक कार्यक्रम पार पाडले. आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगतीही अनेकांना थक्क करणारी. लेखनासोबत वाचन व अभ्यास असल्याने वक्तृत्वही प्रभावी.  ज्ञातीचा अहंकार नाही पण अभिमान जरूर. त्यामुळे ज्ञातीच्या सर्व कार्यक्रमात तन मन धनाने सहभाग. पण ज्ञातीबाहेरही अनेकांशी उत्तम स्नेहसंबंध. संसारासाठी अर्थार्जन कष्टाने स्वाभिमानाने केले आणि गरजेनुसार सढळ हस्ते दुस­या हाताला न समजता दानधर्म देखील केला.

      बँकेची नोकरी हा स्वतंत्र अध्यायच होईल. संसारिक जबाबदा­या समोर असल्याने काळानुसार प्रमोशन शक्य असताना घेतले नाही. उत्तर आयुष्यात प्रमोशन परीक्षा देऊन मिळवले. संपूर्ण नोकरी कालखंडात किती टार्गेट स्वीकारून पूर्ण केली त्याला गणतीच नाही. गरजु व्यक्तीला योग्य मदत आणि त्यासाठी संपूर्ण सहकार्य करतानाच अयोग्य वागण्याला खड्या आवाजात भिती निर्माण करायला कधीच संकोच बाळगला नाही. बँकेच्या ओळखीचा उपयोग प्रामाणिक व्यावसायिकांना उभे रहाण्यासाठी केला. गरजुला कर्ज मिळण्यासाठी बँक आहे. पण मी आहे तोपर्यंत माझ्या ब्रॅन्चला कोणी फसवणार नाही याची काळजी देखील घेतली. हे सर्व करताना दोन्ही मुलांना उच्च शिक्षित करून स्वयंनिर्णयक्षम बनवले. सामाजिक कार्याची जाण निर्माण केली.

      संसार, नोकरी, समाजकार्य गंभीरपणे केले पण सहकारी मित्र मैत्रिणींसोबत सहकुटुंब पर्यटन, हॉटेलींग देखील केले. स्वतःच्या गाडीतून फिरवले, अनेक पिक्चर दाखवले, नवनवे पदार्थ खाऊ घातले. अनेक व्यावसायिकांची जाताजाता जाहिरात केली त्यांना कामे मिळवून दिली.

      ३१ जानेवारी २०२३. स्वेच्छा सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस. इथून पुढे बँकेची नोकरी नसेल. बाकी सगळे असेच सुरू राहील. कोणासोबत कुठेतरी फिरणे मुक्तपणे चालेल. कधी कोणाला खायला प्यायला बोलावले जाईल. अजुनही त्यांच्या मदतीच्या हाताची अनेकांना उब मिळेल. अयोग्य/वाईट/अनैतिक आजुबाजुला दिसले तर तरूणपणीच्याच उमेदीत खडसावले जाईल. खात्री आहे. होय. हे सर्व होईल. पण कदाचित यात सिंधुदुर्गवासी कमी असतील कारण त्या पुणेकर होत आहेत. आयुष्यातील मोठा कालखंड सिंधुदुर्गात गेल्याने त्या नाळ तुटू देणार नाहीत आणि आपण सर्वही असे होऊ देणार नाही. यासाठी त्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.            

– विवेक मुतालिक, कुडाळ, सिंधुदुर्ग

 ९४२२३८१३७८            

 

Leave a Reply

Close Menu