सिने-नाट्य कलावंताना मालवणी जेवणाची लज्जत देणारे वेंगुर्ल्याचे मातृछाया भोजनालय

पूर्वी वेंगुर्ल्यात बाजाराला आल्यावर एसटीतून उतरण्याचा महत्त्वाचा थांबा असायचा तो म्हणजे मारुती स्टॉप. (अलिकडे काही वर्षापासून वाहतुकीच्या समस्येमुळे वेंगुर्ल्यात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांना कॅम्प मार्गे यावे लागत असल्याने हा स्टॉप आता वेंगुर्ल्यातून मठमार्गे बाहेर जाणाऱ्या एसटीसाठीच उपयोगात येत आहे.) मारुती स्टॉप च्या जवळच कुळकर बंधूचे ‘आज काय खाणार?’ हॉटेल आणि ‘मातृछाया भोजनालय’ लक्ष वेधून घ्यायचेत. यापैकी मातृछाया भोजनालय अजूनही चालू असून कुळकरांची पुढच्या पिढीने यशस्वीपणे परंपरा चालू ठेवली आहे.

      वर उल्लेख केलेल्या ‘आज काय खाणार?’ हे हॉटेल बंद होऊन आता बरीच वर्षे झालीत. कै. सुहास कुळकर यांनी सुरू केलेले हे हॉटेल कै. आबा कुळकर यांनी पुढे चालू ठेवले होते, अशी आठवण त्याकाळी त्या हॉटेलात काम करणारे कामगार सांगतात. या हॉटेलचे नेमके नाव काय होते हे कुणी सांगू शकले नाही, मात्र हॉटेलच्या दारात ‘आज काय खाणार?’ हा बोर्ड मात्र लक्ष वेधून घ्यायचा. ओल्या काजूची ऊसळ, सुकी ऊसळ, पातळ बटाट्याची भाजी, पुरी, वडा-पाव, भजी आणि खाजा, गुलगुले व मालपे (मालपुआ) हे गोड पदार्थ, या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दिवसभर ग्राहकांची गर्दी असायची. ओल्या काजूची ऊसळ जुन्या पिढीच्या अजूनही आठवणीत आहे, काळाच्या ओघात हे हॉटेल बंद झाले. या हॉटेलच्या जवळच असलेले मातृछाया भोजनालय मात्र आता थोडेसे रुप पालटून जोमात सुरु आहे.

      कुळकर बंधूंपैकी कै. शरदचंद्र सदाशिव कुळकर यांना व्यवसायात यश येत नव्हते. अशावेळी अंबरनाथ येथील संत देवबाबा वालावलकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सन 1959 मध्ये वेंगुर्ल्यात मारुती स्टॉप नजिक भोजनालय सुरु केले. मातृछाया भोजनालय हे नावही संत देवबाबा वालावलकर यांनीच सुचविले होते. सुरुवातीला शरदचंद्र कुळकर हे हॉटेल घरातील सदस्यांच्या मदतीने चालवत असत. पुढे त्यांच्या विवाहानंतर शेवटपर्यंत त्यांची पत्नी उमा यांनी त्यांना साथ दिली. सारस्वत पध्दतीचे मालवणी जेवण ही त्यांची खासियत. ग्राहकांचे पोट भरेपर्यंत त्यांना जेवण वाढले जायचे. केवळ भात आणि चपाती एक्स्ट्रा घेतली तर त्याचे ज्यादा पैसे आकारले जात. खानावळी म्हणजेच महिन्याचे मेंबर यांच्यासाठी तर संपूर्ण थाळी अनलिमिटेड. माफक दर आणि दर्जेदार भोजन यामुळे या भोजनालयाची लोकप्रियता अजूनही कायम आहे. कै. शरदचंद्र यांचा मृदू स्वभाव आणि पैशाला महत्त्व न देता ग्राहकांना पोटभर जेवायला मिळले पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांचे ग्राहक अजूनही त्यांची आठवण काढतात. त्यांचा मुलगा दत्तात्रय आणि सून सौ. शितल यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

      अलिकडे वेंगुर्ल्यात प्रशस्त नाट्यगृह सुरु झाले आहे, मात्र पूर्वी तात्पुरत्या नाट्यगृहात म्हणजेच खर्डेकर कॉलेजच्या पटांगणात नाट्यप्रयोग व्हायचेत. प्रयोगाच्या रात्री या नाटकातील कलाकांराची तसेच बॅकस्टेज आर्टीस्ट यांची जेवणाची सोय मातृछाया भोजनालयात केली जायची. नाट्यप्रयोग संपल्यावर रात्री दोन वाजता हे कलाकार जेवणासाठी या भोजनालयात येत. रात्री दोन वाजता देखील यांच्यासाठी ताजे व गरमागरम जेवण तयार करुन वाढले जायचे. सर्वांसाठीच शाकाहारी भोजनाची व्यवस्था असायची. मात्र तरीही यातील बरेचसे कलाकार मच्छीचा आग्रह करत आणि एवढ्या रात्री देखील त्यांचा हा आग्रह पुरविला जायचा. बॅक स्टेज आर्टीस्ट यांचे जेवण आणि गप्पा गोष्टी यामध्ये पहाटेचे पाच वाजत, तरीही न कंटाळता या कलाकारांना सेवा दिली जायची आणि दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायचे, असा त्यांचा दिनक्रम असायचा.

      आत्ता श्री. दत्ता कुळकर हे भोजनालय चालवत असले तरी लहानपणापासून ते वडीलांना या व्यवसायात मदत करीत असत. त्यांच्या आठवणीनुसार विक्रम गोखले, क्षमाराज, अरुण गोवील, प्रभाकर पणशीकर, स्मिता तळवलकर, प्रशांत दामले, भक्ती बर्वे, डॉ. गिरीश ओक, रमेश भाटकर, सतीश तारे, मच्छींद्र कांबळी, संजीवनी जाधव, प्रदिप पटवर्धन यासारख्या अनेक सिने-नाट्यसृष्टीमधील नामवंत कलाकरांनी या भोजनालयातील भोजनाचा आस्वाद घेऊन येथील जेवणाच्या चवीला दाद दिली आहे. स्मिता तळवलकर यांना कोळंबी मसाला खूप आवडायचा. त्यांचा खानावळीतील वावर अगदी घरातल्या सदस्यांसारख्या, किचनमध्ये जाऊन स्वत:च्या हाताने जेवण वाढून घेत. दत्ता आठवणी सांगता सांगता बालपणात अगदी हरवून गेला होता.

      कै. शरदचंद्र कुळकर यांचे त्यांच्या ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध असायचे. त्याकाळी खाणावळी असणारे मेडीकल कॉलेजचे विद्यार्थी गर्दीच्या वेळी ग्राहकांना जेवण वाढणे वगैरे सारख्या कामात त्यांना स्वत:हून मदत करत. पर्यटक, चाकरमानी हे मातृछायाचे ठरलेले ग्राहक. त्यामुळे मे महिना, दिवाळी, गणपती, डिसेंबर महिना या काळात या भोजनालयात खूप गर्दी असते. मूळचे वेंगुर्ल्यात राहणारे आणि मुंबईत स्थायिक असणारे कित्येक चाकरमानी तर वेंगुर्ल्यात आल्यावर घरी चूल पेटवायची तसदी घेत नाहीत. दोन्ही वेळच्या जेवणासाठी ते मातृछायेचा रस्ता धरतात. परदेशी पर्यटकही या खानावळीत येऊन मालवणी जेवणाचा आस्वाद घेतात. काही परदेशी पाहुणे दरवर्षी वेंगुर्ल्याला भेट देतात आणि न चुकता जेवणासाठी मातृछायेत येतात.

      या खानावळीत शंभर रुपयात शाकाहारी जेवण आणि मच्छी जेवण 150 रुपयांपासून मिळते. आता घरात मसाले बनत नसले तरी त्याच दर्जाचे घरगुती मसाले वापरुन ग्राहकांना रुचकर जेवण देण्याकडे या भोजनालयाचा कल असतो. जेवणाच्या वेळे अगोदर प्रत्येक टेबलवर पाण्याने भरलेला तांब्या आणि फुलपात्र ही जुनी परंपरा अजूनही जपली जाते. अगदी नावाप्रमाणे आईच्या हातचे जेवण जेवल्याचे समाधान मातृछाया भोजनालयात मिळत असल्याचा अनुभव येथे नेहमी येणाऱ्या ग्राहकांच्या चर्चेतून कळत होता.

      बराच वेळ चर्चा आणि जुन्या आठवणीत रमत जाताना वेळेचा भान राहिले नाही. शेवटी या भोजनालयाच्या नव्या पिढीच्या संचालकांना पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा देत अस्मादिकांनी निरोप घेतला.

(सदर लेख कोणत्याही हॉटेल व्यवसायाची जाहीरात करत नसून वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती करुन खवय्ये आणि वेंगुर्ल्यात मिळणारे खाद्यपदार्थ व ती मिळणारी हॉटेल्स, भोजनालये इ. यांच्यात दुवा साधण्यासाठी हा आमचा प्रपंच आहे. खाली दिलेला लेखकांचा संपर्क क्रमांक हा केवळ या लेखावर आपल्याला व्यक्त व्हायचे असेल तर त्यासाठी माध्यम म्हणून उपलब्ध करुन दिलेला आहे.)

– संजय गोविंद घोगळे, 8655178247

Leave a Reply

Close Menu