उभादांडा येथील श्री गणपतीचा 9 फेब्रुवारी रोजी जत्रौत्सव

उभादांडा येथील प्रसिद्ध श्री गणपतीचा जत्रौत्सव माघ कृ. चतुर्थी (संकष्टी चतुर्थी), गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. नवसाला पावणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना आश्‍विन कृष्ण अमावास्येला अर्थात लक्ष्मीपूजना दिवशी केली जाते. दिवाळीच्या सणाला गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची ही आगळीवेगळी पद्धत सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रात फक्त उभादांडा येथेच आहे. मातीच्या या भव्य मूर्तीचे पूजन साधारणतः 4 ते 5 महिने केले जाते. भव्यदिव्य अशा या गणपतीची मूर्ती साकारण्याचे काम विनायक संभाजी तांडेल करतात. यापूर्वी त्यांचे वडील संभाजी नारायण तांडेल हे करीत होते.

      नवरात्रौत्सवाच्या कालावधीत हा गणपती साकारण्याचा श्रीगणेशा केला जातो. त्यानंतर दिवसेंदिवस आकार घेणारी ही मूर्ती दिवाळीच्या अगोदर रंगवून पूर्ण होते. लक्ष्मीपूजना दिवशी सायंकाळी विनायक तांडेल यांच्या निवासस्थानाकडे गणेशभक्त एकत्र होतात. त्यानंतर गणपतीला आपल्या खांद्यावर घेत ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत गणपती मंदिरात आणला जातो. तेथे विधीवत पूजन करुन आरती होते आणि खऱ्या अर्थाने आगळ्यावेगळ्या गणेशोत्सवाला प्रारंभ होतो. गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत मंदिरात रोज स्थानिक तसेच बाहेरील अगदी गोवा राज्यातीलही गणेशभक्तांची संगीत तसेच वारकरी भजन सेवा होते. विशेष गणपती साकारणारे विनायक तांडेल हे उंचीने कमी आहेत. परंतु, कलेचा अधिपती गणपती त्यांच्याकडूनच आपले भव्यदिव्य स्वरुप साकारुन घेत आहे.

      गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर मंदिरात जागर, फुगड्या, गोफनृत्य, कीर्तन, श्रीसत्यनारायण महापूजा असे कार्यक्रम पार पडतात. दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी, अंगारकी संकष्टी, मंगळवार या दिवशी बहुसंख्य भाविक मंदिरात येऊन गणपतीचे दर्शन घेतात. माघ संकष्टीला जत्रौत्सव होतो. यादिवशी मंदिर परिसरात विविध खेळणी, मिठाई, हॉटेल्स, तसेच केळी-नारळ विक्रेते आपली दुकाने मांडतात. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. भाविकमंडळी सकाळपासून मंदिरात श्रींच्या दर्शनाकरिता रांगा लावतात. या दिवशी श्रीसत्यनारायण महापूजेचेही आयोजन केले जाते. रात्रौ कै.बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्‍वर दशावार नाट्य मंडळाचे नाटक होऊन जत्रौत्सवाची सांगता होते.

      गणपतीचा विसर्जन सोहळाही पहाण्यासारखा असतो. होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी याचे सागरेश्‍वर किनारी विसर्जन केले जाते. त्याआधी एक दिवस म्हामणे म्हणजेच महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. असंख्य भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. विसर्जनादिवशी महाआरती झाल्यानंतर भाविक पुन्हा आपल्या खांद्यावर गणपतीला घेत विसर्जनाच्या दिशेने निघतात. मार्गात ठिकठिकाणी थांबून भजन केले जाते. तर वाघेश्‍वर मंदिर येथे गणपती आल्यावर नवस फेडले जातात. त्यानंतर सागरेश्‍वर किनारी पुन्हा महाआरती होऊन गणपतीचे विसर्जन केले जाते. विसर्जन झाल्यावर गणपतीचा पाट वाजत मंदिरात आणल्यावर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटला जातो. मंदिरातील गणपतीच्या रिक्त आसनावर गणपतीचा फोटो ठेवला जातो. भाविक मंडळी येता जाता श्रद्धेने याठिकाणी हात जोडून नतमस्तक होतात.                                           शब्दांकन – प्रथमेश गुरव, वेंगुर्ला,   9021070624

(या मंदिराची 16 डिसेंबर 1992 रोजी रितसर नोंदणी केली आहे. दीडशे वर्षे पुरातन असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरु आहे.)

 गणपतीचे म्हामणे (महाप्रसाद) – शनिवार दि. 4 मार्च 2023                                                     गणपतीचे विसर्जन       – रविवार दि. 5 मार्च 2023

Leave a Reply

Close Menu