जीवन हेच खरे व्हॅलेंटाईन!

        इ. स. 270 मध्ये रोमन सम्राज्याचा क्लाउडियस गोथीकस द्वितीय नामक राजा होता. त्याला प्रेम, विवाह इ. गोष्टीचा तिटकारा होता. प्रेम व विवाह यामुळे सैनिक आपले लक्ष विसरतात अशी त्याची ठाम समजूत होती. त्यामुळे त्याने आपल्या साम्राज्यात एक फतवा काढला की, कोणताही सैनिक प्रेमात पडणार नाही किंवा विवाह करणार नाही. विवाह न केल्याने सैनिकांचे मनोबल व उमेद उंचावते अशी त्याची ठाम भावना होती. राजाच्या या आदेशाला संत व्हॅलेंटीन यांनी तीव्र विरोध दर्शवीला व रोमन साम्राज्याला त्याने प्रेमाचा संदेश दिला. सैनिकांना प्रेम करण्याची प्रेरणा दिली इतकेच नव्हे तर सैनिकांचे विवाह करून दिले. राजाला ही गोष्ट समजताच त्याने संत व्हालेंटीन यांना मारण्याचे फर्मान काढले. ज्या दिवशी त्यांना मारण्यात आले तो दिवस 14 फेब्रुवारी होता. इ. स. 496 मध्ये पहिल्यांदा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात आला. पोप गॅलसियस यांनी 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून घोषित केला. तेव्हापासून जगभरात हा दिवस ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

      प्रेमाचा दिवस विशेषतः तरुणाईसाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी युवक युवती आपापल्या जोडीदाराचा शोध घेत प्रेमसागरात येथेच्छ सैर करतात. प्रत्येक युगुल आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. मग ते विवाहित अगर अविवाहित असो, प्रत्येकजण ह्या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो. कारण प्रेमाला वयाचे बंधन नसते असं मानलं जातं. कारण प्रेम ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे. प्रेम ह्या शब्दाचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करीत असतो. शास्त्रज्ञांच्या मते प्रेम ही मन आणि शरीर ह्या दोघांची मिळून होणारी प्रक्रिया आहे. मानवाच्या मनात उद्भवणाऱ्या विविध प्रकारच्या भावनांपैकी प्रेम ही एक भावना आहे की, ज्याचा संबंध मानवाच्या शरीरातील विविध ग्रंथीमधून स्रवणाऱ्या रसायनांशी होतो. प्रेम हे शरीर, विचार व भावना यांच्याशी निगडित व स्थलकाल सापेक्ष असतं. विचारांद्वारे घेतलेल्या प्रेमातून प्रेमाची संकल्पना मिळते, कारण ते प्रेमाचेच परिवर्तीत रूप आहे. प्रेम हे आंधळे नसून प्रेमाची स्वतःची प्रज्ञा असते की जी विचारांशी संलग्न असते. निरागस मनच प्रेम म्हणजे काय? ते जाणू शकते.

      सद्य स्थितीत देशात ह्या पश्‍चात्य संस्कृतीच्या अनुकरणापायी खऱ्या प्रेमाची अभिव्यक्ती विसरली जात आहे. ईस्थर पेरेल या बेल्जीयम मनोविकार तज्ज्ञच्या मते एकच व्यक्ती आपल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल असा अट्टाहास असतो किंवा पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ, सर्वगुण संपन्न आपला जोडीदार असावा असे प्रत्येकाला वाटते. परंतु लौकिकार्थाने ते शक्य नसते. म्हणून यासाठी सिंगल कम्युनिटी प्लो या संस्थेचे संस्थापक सिद्धार्थ मेघराम यांनी आपल्या लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटद्वारे एकटी माणसे, गरोदर स्त्रिया किंवा मनोरुग्ण यांना विविध समाज घटकातील माणसे आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आधार पुरवितात, यामध्ये जोडीदार सुपरहिरो असावा असा अट्टाहास नसतो. हेच खरे प्रेमाचे द्योतक आहे. तरुणपणी प्रेमात पडून बेधुंद होणे, प्रेम विवाह करणे, प्रेम असफल झाल्यास ठरवून लग्न करणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे, लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये रहाणे, शारीरिक आकर्षणातून लग्नापूर्वी दिवस जाणे, आंतरजातीय विवाहामुळे प्रेमिकांचे बळी जाणे, ब्रेकअप झाल्यावर दुसरा जोडीदार निवडणे इ. घटना सद्यस्थितीत समाजात मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात किंवा मग एकतर्फी प्रेमातून महिलांची हत्या करणे, त्यांच्यावर ज्वलनशील द्रव्यांचा वापर करणे, तिच्या कुटुंबातील व्यक्तींचे शारीरिक व मानसिक खच्चीकरण करणे इ. दुर्दैवी प्रकार सद्यस्थितीत काही अविवेकी मानसिकतेच्या पुरुषी अहंकारी वृत्तीकडून करण्यात येतात. अशा मानसिकतेला हे का कळत नाही? की प्रेम हे सुडाग्नी पेटविण्यासाठी नसून प्रेम ही नितल व तरल भावना आहे. त्याचा असा बाजार न मांडता ते प्रत्येकावर निर्व्याजी करणे गरजेचे आहे. जेष्ठ कवी मंगेश पडगावकरांच्या कवितेप्रमाणे प्रत्येकाने एकमेकांच्या जीवनावर व मरणावरही शतदा प्रेम करावे. तरच ह्या प्रेमाची खरी गोडी चाखता येते.

      प्रेमासाठी संवेदनशील असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेम म्हणजे केवळ लैंगिक भावना नसून ते नाते संबंधातील सुधार, माणसामांणसातील सशक्त नातं, माणुसकीचं नातं, मानव धर्माचं पालन म्हणजे प्रेम. भारताकडे पाच हजार वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेला अतिप्राचीन देश म्हणून पाहिलं जातं. देशाच्या या इतिहासात हजारो वर्षे अत्यंत हिणकस अशा स्वयंघोषित उच्चवर्णीयांनी, सरंजामशाही वृत्तीने सर्वसामान्यांचे आर्थिक व सामाजिक शोषण केले व त्याविरोधात सर्वसामान्यांनी केलेला संघर्ष, केलेले श्रम, कष्ट त्याग, नवनिर्मिती ही अचंबित करणारी आहे. परंतु लेखणी मोजक्याच लोकांच्या हाती असल्याने त्यांनी आपल्याला सोयीस्कर इतिहास लिहिला. भारत म्हटलं की भ. बुद्ध, म. गांधी, डॉ. आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, संत तुकोबा, ज्ञानेश्‍वर, गाडगेबाबा इ. अनेक विभुतींचा विविधतेने नटलेला देश हे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. आपली संस्कृती आणि इतिहास टिकविण्यासाठी परस्परांबद्दल प्रेम, सहिष्णूता विश्‍वास व एकमेकांना सहकार्यांची भावना टिकविणे अत्यंत आवश्‍यक आहे. सद्य स्थितीत देशाचे वास्तव म्हणजे केवळ एक आभासी शत्रू निर्माण करून जगण्याचे वास्तवातले व कळीचे प्रश्‍न बाजूला सारून व भावनिक होऊन पसरविली जाणारी जातीय व धार्मिक तेढ, बेकारी, स्त्री पुरुष असमानता, देशाच्या नैसर्गिक संपत्तीची केली जाणारी हानी, शासन व प्रशासनात शिरलेली भ्रष्टाचाराची कीड इ. कारणांनी देशात पसरविलेली घृणा, द्वेष, तिरस्कार यांच्या तटबंदी तोडून परस्पर सौदार्ह, सौजन्य व समन्वय या द्वारे प्रेमाची रोपटी रुजविणे गरजेचे आहे.

      प्राचीन परंपरा, संस्कृती असलेल्या आपल्या देशात श्रेष्ठ, कनिष्ठ, सामाजिक अवस्थेत विभागला गेलेला समाज, अज्ञान दारिद्य्रात व मागासलेपणात खितपत पडलेला बहुजन समाज आहे. त्याचे सरंजामशाही, भांडवलशाही व्यवस्थेने वेगवेगळे मुखवटे धारण करून आर्थिक शोषण केले आहे व करत आहे. सन्मानाने, प्रतिषठेने, सद्भावनेने, सकारात्मकतेने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तो केवळ लोकशाही राज्य घटनेने. मानवता धर्मावर, प्रेम धर्मावर, स्त्री पुरुष सामानतेवर, मानवी मूल्यांवर प्रेम करायला शिकवलं, परंतु आज घडीस केवळ स्रियांच्याच नव्हे पुरुषांच्याही स्वातंत्र्याचा व प्रेमाचा संकोच होताना दिसत आहे. भीतीदायक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. जिथे जगण्याचीच भ्रान्त तिथे प्रेम कधी करणार? अशा अन्यायी वृतीला साहसीपणे दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर समाजाने विशेषत: तरुणाईने लोकशाही मार्गाने प्रतिकार करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जग हे विश्‍वासावर, नैतिक मूल्यांवरील प्रेमावर, अखंड मानव जातीच्या प्रेमावर चालतं. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इतरांशी मानवातारूपी प्रेमाचं नातं जोडणं अत्यंत गरजेचे आहे, सोशल मीडियाचा वापर सकारात्मक करून हे करणे शक्य आहे. कारण प्रेम ही भावना सुद्धा लोकल ही आहे व ग्लोबल ही आहे.                                                             – संजय तांबे, फोडाघाट, मोबा. 9420261888

Leave a Reply

Close Menu