डॉ. आंबेडकरांची सावली -रमाई!

रमाबाई आंबेडकर -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी, त्यांची आवडती रामू. यांचा जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला. रमाबाईचा जन्म एका गरीब कुटुंबात. वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी या दाम्पत्याच्या पोटी दाभोळ जवळील वणंद गावात ७ फेब्रुवारी १८९७ मध्ये झाला. त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. रमाच्या लहानपणीच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. काही दिवसातच वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे त्यांचे वलंगकर काका व गोविंद पुरकर मामा यांनी ह्या मुलांचा सांभाळ केला. रमाईचे बालपण अत्यंत गरिबीत गेल्याने तिला कष्टाची व जबाबदारीची जाणीव होती. आयुष्यातील कठीण प्रसंगाना धिरोदत्तपणे तोंड देण्याची मानसिकता तिच्यात उपजतच होती.

     रमाई व भीमराव यांचा विवाह सन १९०६ साली झाला. तेव्हा भीमराव १४ वर्षांचे व रमाई ९ वर्षांच्या होत्या. डॉ. आंबेडकर यांनी रमाईला सामान्य लेखन व वाचन शिकविले होते की जेणेकरून त्या स्वतःची सही करू शकत होत्या. बाबासाहेब तिला रामूया नावाने तर त्या बाबासाहेब यांना साहेबम्हणून संबोधत.

       प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. मग ती स्त्री आजी, आई, बहीण, पत्नी किवा अन्य कोणीही असो. प्रत्येकाच्या सहभागाचे मोल हे अमूल्यच असते. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वात त्यांच्या पत्नीचा म्हणजेच रमाईचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. हे बाबासाहेब नेहमीच मान्य करत. रमाई जणू काही बाबासाहेबांची सावलीच होती. बाबासाहेबांच्या बरोबरीने समतेचं स्वप्न पाहणा­या त्या आमच्या सर्वांच्या माता होत्या. रमाईने जर त्या काळात बाबासाहेबांना चळवळीसाठी मोकळं सोडलं नसतं तर आज आमची पिढी स्वाभिमानाने उभी राहिलेली दिसलीच नसती. सा­-या बहुजन समाजावर माता रमाईचे फार मोठे उपकार आहेत. त्यांनी बाबासाहेबांवरचा स्वतःचा हक्क जणू मोठ्या मनाने सोडून दिला आणि आमचं आयुष्य बदलवणा-­या क्रांतिकार्यासाठी बाबासाहेबांना दान देऊन टाकलं. या मातेचं केवढं मोठं हे औदार्य व मन! जसं भगवान बुद्धांच्या कार्यात स्वतःचा अडसर होऊ न देणारी यशोधरा की, जिने सिद्धार्थ गौतमला मानवाच्या कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी स्वतःला व मुलाला सोडून जायची आनंदाने परवानगी दिली. सासू सासरे व पुत्र राहुल यांचा जीवापलीकडे सांभाळ केला, तद्वतच महात्मा जोतिबा फुले यांनी उभारलेल्या क्रांती कार्यात सावित्रीबाईंर्नी प्रत्यक्ष सहभाग घेतला कारण त्यांच्या मागे मुलांची जबाबदारी नव्हती. परंतु, माता रमाई व यशोधरा यांच्यावर कुटुंबाची व मुलांची जबाबदारी असल्यामुळे त्या जनकल्याणाच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकल्या नाहीत, तरी सुद्धा त्यांचे चळवळीतील योगदान कमी ठरत नाही. बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणाच्या कालावधीत रमाईला अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रमाईने आपल्या घरच्या हलाखीची कल्पना बाबासाहेबांना दिली नाही. बाबासाहेबांनी परदेशातून पाठवलेल्या तुटपुंजा पैशात घरखर्च चालवणे अत्यंत कठीण झाल्याने त्या शेणाच्या गोव­या थापून घर खर्चाला हातभार लावत होत्या. तीन मुलगे व एक मुलगी यांना गमावल्याचं दुःख पचवून तिने बाबासाहेबांची होता होईल तेवढी जपणूक केली होती. रमाईच्या त्या गोव-­यांची किमत आजच्या आंबेडकरी समाजाला अमूल्य अशी आहे. कारण रमाईचा बाबासाहेबांच्या चळवळीतील अप्रत्यक्ष सहभागाची गोड फळं आजचा आंबेडकरी समाज चाखत आहे.

         रमाई जरी फार शिकलेल्या नव्हत्या तरी त्या अत्यंत समजदार होत्या. बाबासाहेबांच्या सहवासात राहून त्यांच्यातही सामाजिक व्यवस्थेविषयी खूप मोठी जाण निर्माण झाली होती. बाबासाहेबांच्या प्रति पंढरपूर निर्मितीच्या कार्यात थोड्या फार का होईना त्या प्रत्यक्ष उतरल्या. महाडच्या सत्याग्रहातही त्यांना इच्छा असूनही सहभागी होता आलं नाही तरी सुद्धा त्यांना जेव्हा वेळ मिळे तेव्हा त्या आपली सामाजिक बांधिलकी कृतीने सिद्ध करून दाखवत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, सन १९३०साली डॉ. बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचे होते तेव्हा रमाईची तब्बेत ठीक नव्हती, त्यांनी तिला हवा पालटण्यासाठी बाबासाहेबांचे मित्र वराळे यांच्याकडे धारवाडला ठेवले. वराळे धारवाडला गरीब मुलांसाठी वसतिगृह चालवत होते. काही दिवस त्या वसतिगृहाला सरकारने अनुदान मंजूर न केल्याने त्या वसतिगृहाची चूल बंद पडली. ही बातमी तिथे असणा­या रमाईला समजली, त्यांना अत्यंत वाईटवाटले. कारण त्यांनी गरिबीचे बरेच चटके सहन केले होते. त्यांनी आपल्या हातातल्या सोन्याच्या चार बांगड्या काढून वराळे यांच्याकडे दिल्या व मारवाड्याकडे गहाण ठेऊन येणा­या पैशात विद्यार्थ्यांसाठी वाण सामान आणण्यास सांगितले व वसतिगृहाची चूल पेटवली. रमाईने बाबासाहेबांकडे स्वतःसाठी कधीही हट्ट केला नाही, आहे त्या परिस्थितीत आनंद मानत राहिल्या. त्या संपूर्ण शोषित, बहुजन समाजाच्या आदर्श माता होत्या. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी आई जिजाऊ झाली नसती तर स्वराजांची निर्मितीच झाली नसती तसंच यशोधरा, सावित्रीबाई व रमाई झाल्या नसत्या तर या क्रांतिकारी महापुरुषांच्या कार्याला बळकटी मिळाली नसती.

         आजच्या सा­-याच स्रियांचा सामाजिक चळवळीतील प्रत्यक्ष सहभाग होऊ शकत नाही. परंतु अप्रत्यक्ष सहभाग किती जणी घेतात हा सुद्धा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सामाजिक कार्यासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणा­या पतीला छळणा­या कितीतरी स्रिया दुर्दैवाने आंबेडकरी समाजात आहेत. बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना याची जाणीव हवी. त्यांनी जिजाऊ, यशोधरा, सावित्रीबाई यांना आपल्या हृदयात वंदनीय स्थान द्यायला हवं. सन १९४० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल ‘Pakistan or the partition of India’ हा ग्रंथ त्यांनी रमाईला अर्पण केला होता. त्यामध्ये ते लिहितात INCRI BED TO THE MEMORY OF RAMUAs a. tokan of my appriciation of her. goodness of heart, her nobility of mind and her purity of character…. रमाईवरचे हे त्यांचे अबोल प्रेम ह्या पत्रातून व्यक्त होते. बाबासाहेबांनी आपल्यापेक्षा अत्यंत कमी शिकलेल्या आपल्या पत्नीला आदराने वागवले, तिचा अवमान केला नाही. बुद्धांच्या स्त्री-पुरुष समानतेचा वारसा जोपासला. आजच्या आंबेडकरी विचारांच्या पुरुषांनी व स्रियांनी हा वारसा जपणे गरजेचे आहे तरच घरोघरी चळवळीचे वारे वाहतील व आंबेडकरी चळवळ झपाट्याने आपल्या उद्दिष्टांकडे वाटचाल करील. हीच खरी रमाईला आदरांजली ठरेल!                                                    संजय तांबे, फोंडाघाट  (९४२०२६१८८८)

Leave a Reply

Close Menu