लेखक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवविश्वातून विशिष्ट अनुभव प्रतिभानवित करून व्यक्त करीत असतो. जीवन जगत असताना विविध अनुभवांना सामोरे जात असताना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. कथाबीजापासून संपूर्ण कथानिर्मितीचा प्रवास हा दीर्घ असतो. त्यात अनेक टप्पे असतात. कथा निर्मिती ही निर्मितीच्या दृष्टीने एक आव्हान असून प्रत्येक कथा ही तिची निर्मितीकथा घेऊनच जन्माला येते. असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कथा लेखिका व कादंबरीकार सौ. वृंदा कांबळी यांनी कथा निर्मितीविषयी मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ या गावी तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कथा सत्राच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. लेखक रघुवीर मेटकरी हे संमेलनाचे अध्यक्ष होते. कथासत्रामध्ये अंकलखोप येथील युवा लेखक सुधीर कदम यांनी तसेच पेठ येथील जगन्नाथ माळी यांनी कथा अभिवाचन केले. यावेळी सौ. वृंदा कांबळी यानी कथाकथन कौशल्याची दशसूत्री सांगत कथा लेखन निर्मितीचा प्रवास ओघवत्या शैलीत व्यक्त केला.
तिळगंगा साहित्यरंग परिवार, संगीतरत्न ग. रा. पाटील संगीत मंच, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केलेे होते. कवी आनंदहरी यांनी आभार मानले.