वेंगुर्ला-परबवाडा शाळा नं.१चा शतक महोत्सव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर, शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदिप परब, संत साहित्याचे गाढे अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर, रामेश्वर देवस्थानचे विश्वस्त रविद्र परब, सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच विष्णू परब, माजी सभापती सारिका काळसेकर, मनवेल फर्नांडीस, माजी सरपंच इनासिन फर्नांडीस, आपा पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनिल परब, सामाजिक कार्यकर्ते विलास परब, सविता लक्ष्मीकांत परब, माजी उपसरपंच विश्वास पवार, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, संजय परब, मुख्याध्यापिका अनिता रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते.
मराठी शाळांमध्ये शिक्षण घेऊनही आज अनेक लोक मोठ्या पदावर आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मराठी माध्यमाच्या शाळांशी तुलना करु नये. शाळांमध्ये स्थानिक भाषेतून शिक्षण झाले तर त्याचा प्रभाव जास्त होतो हे परदेशातही सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रसाद देवधर यांनी केले. यावेळी शाळेच्या आजी माजी शिक्षकांचा, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माजी विद्यमान ग्रा.पं. सदस्य तसेच जमिनदाते यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त घेतलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविद्र परब, सूत्रसंचालन सहदेव परब यांनी तर आभार संदिप परब यांनी मानले. महोत्सवाच्या दुस-या दिवशी प्रा.रुपेश पाटील यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी पालक व पाल्य यांच्यातील सुसंवाद किती महत्त्वाचा आहे. युवा पिढीतील मोबाईल वापराचा अतिरेक व त्याचे दुष्परिणाम पटवून दिले. त्यानंतर माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
महोत्सवाच्या तिसया दिवशी श्रीसत्यनारायण महापूजा व स्नेहभोजन झाले. सायंकाळी महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला. यात आरती गवंडे पैठणीची मानकरी ठरली. या कार्यक्रमाचे निवेदन युसुफ आवटी यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे उपस्थित होत्या. रात्री शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या सातेरी तरुण दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग संपन्न झाला.