दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरचा संप्रोक्षण कलशारोहण सोहळा मंगळवार दि.२८ मार्च रोजी थाटात संपन्न झाला. रविवार २६ मार्च पासून सुरुवात झालेल्या या सोहळ्याला भाविकांचा जनसागर लोटला.
रेडी गणपती कलशारोहण सोहळ्यानिमित्त २६ ते २८ मार्च पर्यंत भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. शुक्रवारी २४ मार्च रोजी सकाळी रेडी श्री गणपती मंदिर कलश कोल्हापूर येथून वाजत गाजत आणण्यात आला. २८ मार्च रोजी सकाळी रेडी श्री गजाननाचे कोल्हापूर येथील भक्त अजयसिंह विठ्ठलराव देसाई व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर सवाद्य मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून रेडी गजानन देवस्थानचे मानकरी यांच्या हस्ते हे कलशारोहण करण्यात आले.
यानंतर श्री गजाननाला नैवेद्य दाखवून मंदिरात महाआरती संपन्न झाली. व हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, मुंबई, पुणे व राज्यभरातील हजारो भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहत श्री गजाननाचे दर्शन घेतले.