शहर सौंदर्यीकरणात वेंगुर्ला न.प. राज्यात अव्वल

नगर विकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व शहर स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये क वर्ग न.प. मध्ये वेंगुर्ला नगर परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर विविध स्पर्धांमध्ये अत्युच्च कामगिरी बजावण्याची परंपरा अखंडीत ठेवली आहे. यापूर्वी वेंगुर्ला न.प. ने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा, माझी वसुंधरा पुरस्कार यासारख्या स्पर्धांमध्ये राज्य व देश पातळीवर नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

      या स्पर्धेमध्ये सुंदर जलाशय, सुंदर हिरवे पट्टे, सुंदर पर्यटन, वारसास्थळ व सुंदर बाजार, व्यावसायिक ठिकाण या बाबींचा विचार करण्यात आला. या चारही बाबींमध्ये वेंगुर्ला न.प. राज्यात अव्वल ठरल्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून 15 कोटीचे बक्षिस मिळाले आहे. हा पुरस्कार व पारितोषिक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला न.प.चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ व तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी स्वीकारले.

      वेंगुर्ले न.प.ने सुंदर जलाशय म्हणून निशाण तलाव व भटवाडी येथील चंद्रभागा विहिरीचे सुशोभिकरण करुन त्या ठिकाणी पर्यटनाचे महत्त्व सांगणारी चित्रे, वेंगुर्ल्यात आढळणारे पक्षीजीवन व मानवाचे निसर्गाशी असणारे नाते दर्शविणारे संदेश दर्शविले होते. सुंदर हिरवे पट्टे, जागा, कारंजे यामध्ये शरहातील त्रिवेणी गार्डन, बालोद्यान, मानसीश्‍वर उद्यान येथे केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, कारंजे व लावण्यात आलेले वृक्ष, प्रमुख वारसा स्थळांमध्ये न.प. मार्फत सन 1976 साली ऑर्थर क्रॉफर्ड यांनी उभारलेले घड्याळी मनोरा असलेल्या मार्केट इमारतीचे नूतनीकरण करतेवेळी त्याच्या मूळ ढाच्याला कोणताही धक्का न पोहोचविता सुशोभिकरण करून त्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यात आले. या इमारतीच्या भिंतीवर वेंगुर्ल्यातील जुन्या काळातील जीवनशैली रेखाटण्यात आली आहे. सदर चित्रमालिका शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. त्याचप्रमाणे शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या प्रमुख इमारतींपैकी सागररत्न मत्स्य बाजारपेठ व पवनपुत्र भाजी मंडई यासारख्या देखण्या इमारतींच्या आधुनिकतेला धरून करण्यात आलेल्या नवीन बांधकामामुळे व त्यावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे या इमारती शहरवासीय व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

      या इमारतींवर रेखाटण्यात आलेली इरसाल मालवणी माणसांच्या जीवनावर आधारित गमतीजमती दर्शविणारी चित्रमालिका या इमारतीच्या सौंदर्यात भर टाकून पर्यटनाला चालना देत आहे. या सर्वांसोबतच शहराच्या प्रवेशद्वारावर कोकणातील जांभ्या दगडाचा वापर करून उभारलेल्या स्वागत कमानी तसेच दीपगृहाकडे जाणाऱ्या पादचारी मार्गाचे आकर्षक बांधकाम करुन शहर सौंदर्यात भर घालण्यात आली आहे.

      पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नं.प.ने स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन, शहरातील विविध भिंतींवर रेखाटण्यात आलेली कोकणातील लोककला, निसर्ग, जुने पारंपरिक खेळ, जीवनशैली, विद्यार्थी जीवन, अध्यात्मिक वारसा, उत्सव व सांस्कृतिक परंपरा या सर्व आठवणींना उजाळा देणारी चित्रमालिका, शहर सौंदर्यीकरण या सर्व बाबी या स्पर्धेत अव्वल ठरल्याने वेंगुर्ला नगरपरिषदेला हा पुरस्कार मिळाला आहे. या यशामागे न.प.ने घेतलेली मेहनत असून याचे सारे श्रेय न.प.अधिकारी, कर्मचारी, पेेंटर, आर्किटेक्ट यांच्या सोबतीने आम्हाला कायम साथ देण़ाऱ्या वेेंगुर्लेवासीयांचे आहे असे मत परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu