वेंगुर्ला न.प.तर्फे भव्य सायकल रॅली

जागतिक वसुंधरा दिवस 22 एप्रिल रोजी साजरा झाला.त्याच अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत 22 ते 28 एप्रिल हा  वसुंधरा आठवडा म्हणून साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून न.प.तर्फे घराच्या छतावर सौरउर्जा र्निर्मितीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन शिबीर न.प.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी बेलारिज सोलार मुंबईचे मॅनेजिंग डायरेक्टर ॲलन फर्नांडिस उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना सोलार प्लांटचे फायदे विषद केले तसेच उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. वेंगुर्ले शहरातील घराच्या छतावर सोलार बसवू इच्छिणाऱ्या नागरिकांना वेंगुर्ले नगर परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. तर 26 एप्रिल रोजी वेंगुर्ला न.प.कार्यालय ते हॉस्पिटल नाका, अग्निशमन केंद्र, स्टेडीयम, पॉवर हाऊस, रामेश्वर मंदिर, पिराचा दर्गा, गणपती मंदिर, दाभोली नाका, न.प.कार्यालय पर्यंत भव्य सायकल रॅली काढण्यात आली. निसर्गाच्या ढासळलेल्या समतोलाला पेट्रोल, डिझेल तसेच गॅसवर चालणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारे वाढते प्रदुषण कारणीभूत आहे. यावर उपाय योजना म्हणून शक्य तेथे सायकलच्या वापराला प्रोत्साहन मिळावे या हेतूने नगरपरिषदेने या भव्य रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, सर्व अधिकारी, कर्मचारी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, वेंगा बॉयजचे  डॉ. राजेश्वर उबाळे व इतर पदाधिकारी सहभागी झाले. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वसुंधरेचे जतन करण्यासाठी, पंचमहाभुतांचे प्रदुषण कमी करण्याासाठी विविध संदेश देणारे माहिती फलक लावून सदर सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीच्या निमित्ताने पर्यावरणाचे संतुलन राखणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.

Leave a Reply

Close Menu