वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेची सभा तालुकाध्यक्ष संजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला नगरवाचनालय सभागृहात झाली. गणेशोत्सव कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन अधिकायांनी उपस्थितांना दिले. या सभेला अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिशाळे, तालुका वीज वितरण अभियंता बालाजी वाघमोडे, कार्यकारी अभियंता दिनोरे, सहाय्यक सेक्शनचे अधिकारी, जिल्हा समन्वयक अॅड.नंदन वेंगुर्लेकर, सचिव जयराम वायंगणकर, खजिनदार सुजित चमणकर, सदस्य जाफर शेख, शिवराम आरोलकर, डॉ.श्रीनिवास गावडे, अशोक गवंडे, वाल्मिकी कुबल, अभि वेंगुर्लेकर, महेश वेंगुर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, धाकोरे सरपंच मुळीक उपस्थित होते. तिरोडा, मळेवाड, आडेली, कामळेविर व वेंगुर्ला शहरातील वीज ग्राहकांनी अधिकायांसमोर आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला. उभादांडा-नमसवाडी येथील एका महिलेने आपल्या घरात गेली बरीच वर्षे लाईट नसून लावलेला मीटर सुद्धा काढून नेण्यात आल्याची तक्रार केली. यावर वादळी चर्चा होऊन ४८ तासात तिला मीटर देऊन लाईट सुरू करून देण्याचे आश्वासन तालुका अभियंता वाघमोडे यांनी दिले. तसेच बागायतवाडी येथील विद्युत लाईन बदलणे, विद्युत पोल, ग्राहकांची वाढीव वीज बिले, वीज ग्राहकांची मीटर कनेक्शनबाबत चर्चा झाली.