खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग

वेंगुर्ला खरेदी विक्री संघ इमारतीच्या खाली असलेल्या खत दुकानाला 19 डिसेंबर रोजी पहाटे 4.30वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक होऊन हजारोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान ज्येष्ठ भजनी बुवा विजय गुरव पहाटेची काकड आरती करण्यास जात असताना त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजारी रहाणा¬या मोर्डेकर व नाईक कुटुंबियांना उठवले तसेच अग्निशमन बंब व पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत राहूल मोर्डेकर, ओंकार मोर्डेकर, वृंदा मोर्डेकर, विजय गुरव, निखिल घोडगे यांनी तसेच अमित नाईक, कुणाल नाईक, प्रकाश नाईक यांनी आपल्या घरातून पाण्याचे पाईप जोडून पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणली. राहूल मोर्डेकर याने जीवाची पर्वा न करता शटर तोडून आत प्रवेश करत पाणी मारले. त्यानंतर बंब आल्यावर पहाटे 5.30 पर्यंत आग विझविण्यात यश आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Close Menu