चांदा ते बांदा ही पथदर्शी व महत्वाकांक्षी योजना – पालकमंत्री उदय सामंत

       वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राच्या परिसरात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, संदेश पारकर, अतुल रावराणे, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे शिक्षण विस्तार संचालक डॉ.संजय भावे, सहयोगी संचालक डॉ.बी.एन.सावंत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बागल, तहसीलदार प्रवीण लोकरे, जि.प. सदस्य नितीन शिरोडकर, सभापती अनुश्री कांबळी, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, सचिन वालावलकर, नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, रमण वायंगणकर आदी उपस्थित होते. 

          चांदा ते बांदा ही पथदर्शी व महत्त्वाकांक्षी योजना सुरु असून ही योजना जिल्ह्राच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जिल्ह्राच्या विकासाआड येणारे कोणतेही राजकारण करु नये. अशांची कोणतीही गय केली जाणार नाही. वेंगुर्ला शहराचा पर्यटनाच्या दृष्टीने चांगला विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. येथील सागर विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. शहराच्या

पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुरु असलेले सर्व प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. आंगणेवाडीच्या विकासासाठी 15 कोटी, जिल्ह्रातील प्रत्येक गेस्ट हाऊससाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी, सी-वल्र्ड प्रकल्प आता 400 ते 500 हेक्टर जागेत करुन त्यासाठी किमान 100 कोटींचा निधी देण्याचे आश्वासन वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. मे महिन्यापर्यंत जिल्ह्रातील महत्त्वाचा प्रकल्प असलेले चिपी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येणार आहे. आपण राजकारण जरुर करावे पण ते निवडणुकीपुरते मर्यादीत ठेवावे. विकासाबाबत सर्वांचे एकमत असावे असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

          वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे शिक्षण विस्तार संचालक श्री.भावे यांनी यावेळी फळ संशोधन केंद्राच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. भूमिपूजन झालेले माहिती व प्रशिक्षण केंद्र कशाप्रकारे काम करणार आहे याची माहिती देताना त्यांनी शेतक-यांसाठी सर्व प्रकारची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्याचे सांगितले तसेच फक्त उत्पादन घेणे म्हणजे यश नाही तर त्या माध्यमातून आर्थिक विकास कसा साधता येईल याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Close Menu