आजच्या सावित्रीसमोरील आव्हाने – प्रा. डॉ. सुमेधा नाईक

3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. सावित्रीबाईंनी खूप मोठा संघर्ष केला म्हणून आज मी हा लेख लिहू शकते आहे, कित्येक जणी आज खूप मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत, समाजाच्या आणि करिअरच्या विविध क्षेत्रांमध्ये मैदान गाजवत आहेत. सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायचं ठरवलं आणि त्यांच्यासमोर समाजाने अनेक आव्हाने उभी केली. आज आम्ही सावित्रीच्या लेकी शिकून स्वतःच्या पायावर उभे आहोत. समाजामध्ये मानाचे, आदराचे स्थान मिळवित आहोत किंवा ते मिळवण्यासाठी संघर्षाला तोंड देण्याची तयारी करीत आहोत.
आजच्या या सावित्रीच्या समोर आव्हानांचा भला मोठा डोंगर उभा आहे. आजच्या सावित्री समोरची आव्हाने बघताना मी त्याची तीन स्तरात विभागणी करू इच्छिते: वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक. आपण क्रमाने यांचा उहापोह करूया.

वैयक्तिक पातळीवरील आव्हानांमध्ये सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे स्वत:ची व्यक्ती म्हणून जाणीव निर्माण करणे. प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या भूमिका निभावत असते : आई, बहीण, मुलगी, पत्नी, काकी, मामी, मावशी, इत्यादी अनेक. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, या वेगवेगळ्या भूमिका कधी स्वतंत्रपणे तर कधी एकत्रितपणे स्त्रिया निभावत असतात. “अग तू एक व्यक्ती आहेस, एक स्वतंत्र माणूस आहेस,” याची स्वतःच स्वतःला आठवण करून द्या. व्यक्ती म्हणून स्वतःचा विकास कसा करायचा, मला स्वतःसाठी काय करायचे आहे , याचे भान येणे, स्वतःचा विकास म्हणजे केवळ घर, गाडी, संपत्ती नव्हे तर, स्वतःचा आनंद कशात आहे, मला काय आवडते आणि काय आवडतं नाही, याची स्वतः बरोबर इतरांना जाणीव करून देणे, हे महत्त्वाचे आहे. मानव जातीच्या निकोप प्रगतीसाठी स्त्रीच्या व्यक्ती म्हणून जाणिवा प्रगल्भ होणे ही गरजेची बाब आहे. मग केवळ स्वतःला काय आवडते इतक्या पुरतं ते मर्यादित नसून तर सारासार विवेक करता येणे, समाजासाठी काय महत्वाचे आहे हे समजणे, कुटुंबासाठी काय महत्त्वाचे आहे हे जाणून कृतीशील होणे, हे आजच्या स्त्री समोरील महत्त्वाचे आव्हान आहे असे मला वाटते. त्यासाठी स्त्रीच्या सामाजिक आणि राजकीय जाणिवा देखील प्रगल्भ होणे महत्त्वाचे आहे.
स्त्रियांचे आरोग्य हे दुसरे महत्त्वाचे आव्हान आजच्या सावित्री समोर आहे. बदललेली जीवनशैली, अन्नपदार्थांचे बदललेले स्वरूप, कामकाजाचे बदललेले स्वरूप पाहता, स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालल्या आहेत. स्वतःचे शरीर समजून घेणे, त्यात वारंवार होणारे बदल पाहणे, त्या त्या वेळच्या विविध मनोवस्था समजून घेणे हे खूप गुंतागुंतीचे असले तरी ती काळाची गरज आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यसनाधीनतेचे उदात्तीकरण होऊ पाहत आहे. हे उदात्तीकरण थांबवून स्त्रियांनी आपल्या आरोग्याप्रति सजग व्हायला हवे. महिलांनी मौजमजा करणे करणे वावगे नाही, परंतु मौजमजा म्हणून व्यसनांकडे आकृष्ट होणे हानीकारक आहे.
बदललेल्या जीवनशैलीतून निर्माण झालेले आणखी एक व्यसन म्हणजे स्क्रीनचे व्यसन. दिवसाचा बराचसा वेळ मोबाईल, संगणक आणि टीव्ही स्क्रीन वर अनावश्यक गोष्टींसाठी घालून, अनेक स्त्रिया स्वतःचा मोलाचा वेळ वाया घालवत आहेत. माणसाचे आयुष्य एकदाच मिळणार आहे,त्यादेखील ते किती कालावधीसाठी याची कोणतीही शाश्वती नसताना स्क्रीनचे व्यसन हे अत्यंत घातक आहे. फावल्या वेळेत काय करायचे याची कित्येक स्त्रियांना सुतराम कल्पना नाही. काय करावे हे माहीत नाही म्हणून मग टीव्ही किंवा मोबाईल! या स्क्रीन व्यसनाचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर आणि आपल्या कुटुंबावर होत आहे, याची जाणीव देखील कित्येक स्त्रियांना नाही.
बदललेल्या जीवनशैलीचा एक भाग म्हणजे अनावश्यक खरेदी! गरज नसताना केवळ बरे वाटावे म्हणून मॉलमध्ये खरेदी करायला जाणे, तासनतास ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईट वरती वेळ घालवणे, हे देखील एक प्रकारचे व्यसनच. आपण सतत फिरायला गेले पाहिजे, सतत आपल्या सुखी परिवाराचे प्रदर्शन समाज माध्यमांवरती मांडले पाहिजे, असे वाटत राहणे; त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवणे, अगदी त्यासाठी गुन्हे देखील करणे, हा सगळा समाज माध्यमांचा प्रभाव. या प्रभावाला बळी न पडता समाज माध्यमांचा चांगला कामांसाठी वापर करता येणे हेदेखील आमच्या समोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
समाजामध्ये वावरत असताना अनेक पुरुषांशी विविध माध्यमांतून संपर्क येतो. वाढते विनयभंग आणि बलात्कारांची संख्या पाहता ‘समाजामध्ये सर्वच पुरुष वाईट आहेत’ ही सार्वत्रिक भावना निर्माण होत चालली आहे की काय, अशी शंका येते. परंतु आपल्या आजूबाजूला स्त्रियांची बाजू समजून घेणारे, मांडणारे आणि तशी कृती करणारे अनेक पुरुष दिसतात. चांगलं कोण आहे आणि वाईट कोण आहे याचे भान बाळगून एकीकडे स्वतःला सुरक्षित ठेवणे, दुसरीकडे आपल्याशी नव्याने नातेसंबंध प्रस्थापित करू पाहणारे पुरुष नक्की कोणत्या अपेक्षेने नाते जोडत आहेत याची चाचपणी करणे, त्याच बरोबर ज्या पीडित स्त्रियांकडे योनी शुचितेच्या पूर्वग्रहाचा चष्मा बाजूला ठेवून पाहणे आणि ज्या स्त्रियांकडे ही प्रगल्भ जाणीव आहे त्यांनी, ‘मला काय त्याचे’ अशी भूमिका घेणाऱ्या स्त्रियांना समजूतीचा हात देणे, ही यासंदर्भातील मोठी आव्हाने आहेत.

स्त्रिया अर्थार्जन करायला लागल्यापासून बराच काळ लोटला. वेगवेगळ्या घरातील स्त्रिया आपापल्या कुवतीप्रमाणे अर्थार्जन करीत आहेतच – कोणी संघटित क्षेत्रात तर कोणी आज असंघटित क्षेत्रात! परंतु तरीदेखील आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सत्ता याबाबत अनेक स्त्रिया अनभिज्ञ आहेत किंवा त्याबद्दल माहिती असून देखील डोळेझाक करीत आहेत. पैसा तर कमावला जातो परंतु तो खर्च करायचा कसा, तो खर्च करण्याचा आपल्याला अधिकार आहे का, पैसा गुंतवायचा कुठे आणि कसा, तो गुंतवायचा की नाही, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या पैशावर हक्क कोणाचा, असे याबाबतीतील प्रश्न आहेत. मुळात कित्येक स्त्रियांना अजूनही वाटते की आपण कमावलेल्या पैशावर आपला काही हक्क नाही, त्यामुळे तो पैसा खर्च करण्याबाबत घेतले निर्णय दुसऱ्या कोणीतरी घेतले तरी त्यात त्यांना वावगे वाटत नाही. स्त्रिया जर पैसा कमवू शकतात, तर त्या खर्चही करू शकतात आणि त्याची गुंतवणूक देखील करू शकतात उत्तम प्रकारे. परंतु स्त्रियांना पैशातले काही कळत नाही असा एक सार्वत्रिक समज करून दिला जातो. घराघरांमध्ये स्त्रियांना पैसा खर्च करण्याचे निर्णय स्वातंत्र्य नाही. काही ठिकाणी तर निर्णय स्वातंत्र्य असले तरी निर्णय घेत असताना त्यांना कुठेतरी अपराधी वाटत राहते. जा स्त्रिया गृहिणी आहेत त्यांना पदोपदी जाणीव करून दिली जाते की तुम्ही काही कमवत नाही त्यामुळे तुम्ही मुलांवर संस्कार करण्याचे काम करा आणि स्वयंपाकघरापुरतेच बघा, आर्थिक निर्णय आमचे आम्ही घेऊ, त्यात तुम्ही नाक खुपसू नका. काही जणींना करिअर करायची इच्छा असून देखील त्यांना करिअर करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, तर उलट काही जणांना नोकरी किंवा करिअर मध्ये अडकायचे नसते परंतु पैसा कमावणे ही कुटुंब चालवण्यासाठी गरज होऊन बसते. दोन्ही बाबतीमध्ये स्त्रियांची स्वतःची मर्जी चालत नाही. अर्थात त्यामध्ये स्त्रियांच्या स्वतःदेखील काही मर्यादा असतात, त्या मर्यादांवर मात करून आर्थिक जाणिवांच्या आकाशात भरारी घेणे, हे आजच्या सावित्री पुढील एक आव्हानच.

कुटुंब हा समाजाचा आधारभूत घटक. कुटुंब हा घटक भक्कम राहिला तर समाज भक्कम राहू शकेल. म्हणून कुटुंब व्यवस्था उत्तम राखणे, कुटुंबव्यवस्थेला पडत चाललेली खिंडारे बुजवून, नव्या परिप्रेक्ष्यातून नव्या भिंती बांधणे, हे आजच्या सावित्री समोरील मोठे आव्हान आहे. बदललेली जीवनशैली, नात्यांचे बदलेले पदर अंगिकारण्याच्या जुन्या कुटुंब रचनेच्या मर्यादा, हे सर्व स्त्रीने समजून घेणे गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वीचा काळ किंवा अगदी वीस वर्षांपूर्वीचा काळ या दृष्टिकोनातून आजच्या कुटुंबाकडे पाहता येणे अवघड आहे. किंवा त्यावेळच्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्थेकडून अपेक्षा केल्यास चुकीचे ठरेल. स्त्रियांना आलेले स्व-भान, आर्थिक स्वावलंबन, मोठ्या प्रमाणावर होणारे घटस्फोट, एकल पालकत्व, आपल्या जोडीदाराची मुले, बदललेल्या लैंगिक जाणिवा, अशा घटकांमुळे कुटुंबांची रचना बदललेली आहे. बदलत राहणाऱ्या रचनेला जुने नियम लागू पडतील असे नाही, याचे भान बाळगून, कुटुंब ही एक जुनाट व्यवस्था न राहता, तिला केवळ बाहेरून नवा साज चढवण्या ऐवजी, आतून भक्कम बनवणे, हे आजच्या स्त्री समोरील आव्हानच आहे.

आजची सावित्री ताठमानेने समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये लीलया वावरत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात पाय रोवून उभी असताना त्या त्या क्षेत्राला योग्य न्याय देणे आणि त्यासाठी स्वतःचा बौद्धिक, मानसिक आणि भावनिक विकास सातत्याने करणे, हे फार मोठे आव्हान आहे. एकदा नोकरी मिळाली की संपले, आयुष्याचे सार्थक झाले, या भावनेला स्वतःला बळी पडू देता नये. करिअरच्या नव्या वाटा धुंडाळत असताना स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. काम आणि घर या रेट्या मध्ये, सुपरवुमन सिंड्रोम ला बळी न पडता, स्वतःला अपडेट करणे सोपे नाही.

समाजाच्या एकंदर विकासामध्ये माझे योगदान काय, हा प्रश्न आज किती स्त्रियांना पडला आहे? सावित्रीबाईंना तो प्रश्न तेव्हा पडला आणि समाजाचा प्रचंड विरोध पत्करून त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर कृती मधून मांडून दाखवले. आम्ही हे कुठेतरी विसरत चाललो आहोत. आम्हाला आमचे घर, कुटुंब, आमचे सुख आमचा आनंद यापलीकडे काही दिसेनासे झाले आहे, याचे द्योतक अगदी छोट्या छोट्या प्रसंगांमधून सुद्धा दिसते. कारच्या मागच्या सीटवर बसलेली स्त्री वेफर्स खाऊन झाल्यावर त्याचे पॅकेट खिडकीची काच खाली करून रस्त्यावर फेकून देते. लोकल ट्रेन मध्ये स्त्रिया भाज्या निवडून कचरा सीट खाली फेकून आपल्या स्टेशनला उतरून निघून जातात. संत्री विकत घेऊन, खाऊन, त्याची साले सीट खाली सरकवून देतात. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्यासाठी नगरपालिकेने वेगवेगळे डबे दिले तरी कचरा एकाच डब्यात टाकतात. सार्वजनिक प्रसाधन गृहात गेल्यावर कित्येक जणी पाणी टाकत नाहीत किंवा sanitary pads तिथेच टाकून जातात. सोशल मीडियावर एखाद्या स्त्रीला ट्रोल केले जात असताना, हात बांधून मजा पाहत राहतात. दुसऱ्या स्त्री बद्दल राग असल्यास, तिच्या चारित्र्या बद्दल इकडे तिकडे खोट्या गोष्टी पसरवत राहतात. वैयक्तिक आकसापोटी पुरुषांवर खोट्या तक्रारी पोलिसात दाखल करतात. आपल्याच मुली वर एखाद्या नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केला तरी मूग गिळून गप्प बसतात. अशी कित्येक उदाहरणे देता येतील की ज्यामध्ये स्त्रिया समाजाकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा बाळगत राहतात, मात्र स्वतः काही करण्याची तयारी नसते. त्यासाठी आमच्या सुखाच्या व्याख्या तपासून पाहिल्या पाहिजेत. समाजाचे सुख, समाजातील दुःखी, पीडित, शोषित, वंचित घटकांचे सुख हे आमच्या सुखाच्या विस्तारित व्याख्येत आणि कृतीत बसवणे, हे आजच्या सावित्री समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे मला प्रकर्षाने वाटते. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आजच्या सावित्रीने या आव्हानांना सक्षमपणे तोंड द्यायला हवे. ज्यांच्याकडे ही क्षमता आहे, त्यांनी इतरांना आपल्या सोबत जोडून घ्यायला हवे!!
©प्रा. डॉ. सुमेधा नाईक,
मालवण

Leave a Reply

Close Menu