डोळसपणे बदल स्विकारल्यास ग्राम विकास शक्य -अनंत सामंत

ग्रामविकासासाठी स्थानिक ग्रामस्थांची मानसिकता फार महत्वाची भूमिका बजावते. परिस्थितीकडे डोळसपणे पाहून बदल स्विकारणे गरजेचे बनले आहे. पर्यटक फाईव्हस्टार हॉटेलमध्ये न राहता कौलारु घरात राहणे पसंत करीत आहेत. त्यांचा हा बदलता दृष्टीकोन लक्षात घेऊन स्थानिकांनी त्यादिशेने पाऊले टाकावीत. घरातील नष्ट होत चाललेली श्रमप्रतिष्ठा पुन्हा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहत. प्रत्येकाने सकारात्मक दृष्टकोन ठेवल्यास ग्रामीण विकास ही संकल्पना यशस्वी होऊ शकते असे प्रतिपादन भगिरथ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तथा माड्याची वाडी येथील हायस्कूलमध्ये गेली २७ वर्षे अध्यापनाचे काम करणारे अनंत सामंत यांनी वेंगुर्ला येथे केले.
वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्रीधर मराठे स्मृती जागर विचारांचाया कार्यक्रमांतर्गत आज (दि.११) बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ग्रामीण विकासाच्या दिशाया विषयावर विशेष संवाद पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते कै.श्रीधर मराठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर उद्योजक रघुवीर मंत्री, दादासाहेब परुळकर, अनंत सामंत, प्राचार्य विलास देऊलकर, कलावलयचे बाळू खांबकर, किरातचे व्यवस्थापक सुनिल मराठे आदी उपस्थित होते.
ग्रामीण विकासाच्या दिशायावर बोलताना श्री. सामंत म्हणाले की, काहीजण कॅलिफोर्निया न बघताच म्हणतात की, कोकणचा कॅलिफोर्निया करु. पण ज्यावेळी कॅलिफोर्नियाची माणसं इथे आली आणि त्यांनी कोकणची समृद्धी पाहिली तेव्हा ते म्हणाले, कोकणचा कॅलिफोर्निया करण्यापेक्षा कॅलिफोर्नियाचा कोकण करु. यावरुन कोकणावर निसर्गाने किती उपकार केले याची जाणिव होत आहे. आपल्या जमिनीचे केरळीयन जर सोने करीत असेल तर आपल्याला का करता येऊ नये. दिवसेंदिवस शहराचे ग्लॅमर तरुणांना खुणावते आहे. परंतु तरुणांनी ग्रामीण विकासाकडे वळले पाहिजे. शाळा हीच ग्रामीण विकासाचे प्रतिक आहे. ग्रामविकासाचे शिक्षण शाळेत मिळू शकते. युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि तेच काम भगिरथ प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या दारात गुरेढोरे आहेत. त्यामुळे त्यांच्या शेणाचा उपयोगी स्वयंपाकासाठी व्हावा यासाठी भगिरथ प्रतिष्ठानने ८ हजार बायोगॅसची निर्मिती केली आहे. ३ हजार महिलांना प्रेशर कुकर दिले. जेणेकरुन महिलांचा स्वयंपाकघरातील वेळ कमी होऊन तो वेळ उत्पादक कामांसाठी त्यांना वापरता येईल आणि त्यातूनच कुटुंबाचा आर्थिक स्थर उंचावेल. तसेच जलसंधारण, वराह पालन, कुक्कुट पालन यासारखे प्रकल्पही भगिरथने हाती घेतले असल्याची माहिती अनंत सामंत यांनी दिली.
साप्ताहिक किरातमधील प्रत्येक बातमीची दखल वाचक घेतात. याचा प्रत्यय मला आलेला आहे आणि त्यातून बहुसंख्य व्यक्ती माझ्याशी जोडले गेले असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले. तर कै.श्रीधर मराठे यांना वेंगुर्ल्याच्या विकासाची तळमळ होती. त्यांनी कित्येक पत्रकार घडविले. माणसं जोडण्याचे काम किरात साप्ताहिक करीत असल्याचे गौरवोद्गार प्राचार्य विलास देऊलकर यांनी काढले. दादासाहेब परुळकर व रघुवीर मंत्री यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात विकासाचा मानवी चेहराया निबंध स्पर्धेतील विजेते किशोर वालावलकर (सावंतवाडी), सुवर्णा वैद्य (रत्नागिरी), दिक्षा तोंडवळकर (मालवण), पांडुरंग दळवी (वजराट) व निता सावंत (सावंतवाडी) यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कच-याच्या वैश्विक समस्येवर कृषीऋषीम्हणून ओळखल्या जाणा-या पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी बनविलेल्या जीवामृताचा प्रचार व प्रसार करणारे वेंगुर्ल्याचे सुपुत्र अजित परब यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक संपादक सीमा मराठे यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी तर आभार अॅड.शशांक मराठे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu