२१ जूनला सूर्यग्रहण पार पडले. सोशल मिडियाच्या कृपेने ग्रहण या विषयावरचे बरेच लेख वाचनात आले. त्यातल्या एका लेखात म्हटलं होतं की, साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर ‘ग्रहण‘ म्हणजे सावल्यांचा खेळ. जेव्हा एक खगोलीय वस्तू दुस-या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुस-या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुस-या वस्तूला ‘ग्रहण‘ लावले असे म्हणतात आणि बोली भाषेत ‘ग्रहण‘ म्हणजे ‘गिळंकृत करणे‘ किवा ‘खाऊन टाकणे‘ वैगरे वैगरे…
हे वाचून मला गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण जगावर मृत्युची सावट पाडणा-या कोरोनारुपी ग्रहणाची आठवण झाली. समस्त मानव जातीच्या नेहमीच्या जगण्याच्या आड हा कोरोना आलाय, याच्या प्रतापाने उघड्या डोळ्यांनी म्हणण्यापेक्षा उघड्या नाकातोंडाने जगण्याचा आपण विचारच करु शकत नाही आणि पीपीई किट घातल्याशिवाय याच्या जवळही जाऊ शकत नाही. म्हणूनच मला याला कोरोनारुपी ग्रहण अशी उपमा द्यावीशी वाटली.
खरंतर मुख्य मुद्दा हा नसून कोरोना नंतरच्या जगण्याचा आहे. रतन टाटा यांच्यासारख्या माणसाने या बाबत म्हटलं आहे की, ‘पुढचं एक वर्ष फक्त जगण्याचा विचार करा‘. आपल्याला माहीत आहे की, टाटा जे करतात आणि जे बोलतात त्या दोन्हीतही खूप मोठा अर्थ सामावलेला असतो. त्यामुळे त्यांचे हे विधान खूप गांभीर्याने घ्यायला हवे.
कोरोना नंतरचे जग यावर खूप काही लिहिलं बोललं जातंय, त्यातून ब-याचदा मनाला उभारी मिळण्यापेक्षा भीतीच जास्त निर्माण होतेय.
एखाद्या माणसाला साप चावला आणि त्याला समजलं की तो विषारी होता तर जसं विषापेक्षा भीतीनेच तो मरतो. तसं इथे होण्याची शक्यता अधिक. परंतु ही वेळ घाबरुन जाण्याची नाही, त्यावर संयमाने मार्ग काढण्याची आहे. प्राप्त परिस्थितीला धीराने सामोरे जाण्याची आहे. निर्णयाची गडबड न करता हळुवार अंदाज घेत पुढे जाण्याची आहे. झालं असं होतं की ‘खेड्यांकडे चला‘ हा संदेश बाजूला सारत गावाकडून शहराकडे जाण्याची प्रक्रिया गेली अनेक वर्षे वेगाने सुरु राहिली.
यात कोणाचं चूक कोणाचं बरोबर या वादात न जाता सर्वसामान्य लोकांना चांगला नोकरी धंदा करण्यासाठी औद्योगिकरण जोरात असलेली शहरे आपलीशी करणे ही एक तत्कालीन गरज वाटली असावी.
पुढे शहर वेगवान ससा झालं आणि खेडे अर्थात कासव. शहर पळतंय सशाच्या वेगाने आणि गाव कासवाच्या संथ गतीने. जशी एक अघोषित शर्यत. अचानक शहर थांबलं. आता इथे आपल्याला पुस्तकातल्या जुन्या गोष्टीप्रमाणे फक्त कासवालाच जिंकवायचं नाही तर ससा आणि कासव या दोघांनीही विजयी व्हायचं आहे. जी मंडळी शहरातून गावी आलीत त्यांनी फार मोठी चिंता करण्याचे कारण नाही.त्यांनी नुसत्या विचारात फक्त रिकामी राहता नये. रिकामी मन हे सैतानाचे घर असते असं म्हणतात. त्यामुळे आज तुम्ही गावात आहात तर आपल्या शेती भातीकडे लक्ष द्या, आंबा-काजू कलमांना भर घाला, चार सायले लावा, पन्नास बांबू लावा, भाजी लावा, कोंबडी पाळा, शोधून बारीक बारीक कामात लक्ष द्या. अगदीच स्वतःच काही नसेल तर आवडीच्या कामातला रोजगार शोधा. शहरातील काम आणि गावातील काम यांच्यात उगाच स्टेटस शोधत बसू नका. परिस्थिती हळूहळू बदलेल. पण शहरे पुन्हा गजबजतील हे पहायला वेळ लागेल. गावाकडे स्थिरस्थावर होणं हे तुलनेने सोपे आहे, आरोग्यदायी आहे. पूर्वी जे गावात मिळत नव्हतं ते सर्व आता इथे एका क्लिकवर उपलब्ध आहे.
शेती व शेतीपूरक व्यवसाय हेच शाश्वत असल्याचे या कोरोनाने सिद्ध केलंय आणि त्यासाठी आपल्या कोकणात मोठी संधी आहे. म्हणूनच निर्णयाची गडबड नको. हा रामाचा वनवास आहे, प्रतिकूल परिस्थितीत अधिक संयम हवा. कारण, आपल्याला चिंता आहे लवंकुशची. आपल्या पुढच्या पिढीची. ‘दे दान-सुटे गिरान‘ असं म्हणत कालच ग्रहण सुटलं. कोरोनारुपी ग्रहण सुद्धा लवकरच सुटेल त्यासाठी गरज आहे संयमी आणि सकारात्मक विचारांच्या दानाची.
– प्रभाकर सावंत, ९४२२३७३८५५