लॉकडाऊन आणि शिक्षण

शिक्षणसंस्था आणि विद्यार्थी यांविषयी लिहिताना एक महत्त्वाचा घटक आपण विचारात घ्यायला हवा होता, जो नेहमीच विसरला जातो किवा दुर्लक्षित केला जातो, तो म्हणजे अध्ययन क्षमता कमी असलेली किंवा शारीरिक व बौध्दिक क्षमता नसलेली मुलं आणि त्यांचं शिक्षण! एरवीचं म्हणजे नेहमीच्या परिस्थितीतच त्यांना शिकवणं म्हणजे चॅलेजिंग काम असतं तर सद्य परिस्थितीत त्यांच्या शिक्षणाची काय आबाळ होत असेल याची कल्पना सर्वसाधारण माणसाला येणं अशक्य आहे. त्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक लागतात आणि नॉर्मल मुलांपेक्षा कितीतरी जास्त कष्ट आणि जास्त वेळ त्यांना द्यावा लागतो. पालकांकडे तेवढा वेळ आणि कौशल्य असण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळेच अशा मुलांच्या जीवनात शिक्षकांचं स्थान अनन्यसाधारण असतं. रोज अशा शिक्षकांच्या नुसत्या सहवासांनी देखील त्यांना बरं वाटतं. खूप पेशन्स, ट्रेनिंग व कौशल्य असलेली व्यक्ती प्रत्यक्ष तिथे असणं फार आवश्यक असतं. पण या करोना आणि लॉकडाऊनच्या भीषण परिस्थितीमुळे हे सध्या शक्य होत नाहीये. अशा मुलांना ऑनलाईन पद्धतीनं शिकवणं हे खूपच आव्हानात्मक काम आहे. तरीही अशा मुलांसाठी त्या त्या संस्था आपापल्या परीने अथक प्रयत्न करीत आहेत.

         अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी ऑनलाईन क्लासेस चालू केले आहेत. छोट्या छोट्या गटांमध्ये त्यांना शिकवलं जात आहे, त्याला मुलांचा आणि पालकांचा चांगला प्रतिसादही आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकणं बौध्दिकदृष्ट्या मागे पडणा-या, (मतिमंद) मुलांसाठी जवळजवळ अशक्य आहे. कारण त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावं लागतं, ऑनलाईन लेक्चर्स मधून काही वेळा पालकांना मुलांकडून अॅक्टिव्हिटी कशी करुन घ्यावी याविषयी धडे दिले जात आहेत. अशा मुलांच्या पालकांना ऑनलाईन क्लासमधे काहीवेळ तरी बसावं लागतंच कारण, टॅब अथवा मोबाईलसारख्या उपकरणांचा योग्य रितीने वापर करणं या मुलांना शक्य नसतं. पण स्क्रीनवरुन टिचर आपल्याशी बोलतेय हे काही मुलांना खूप आवडतय. गोष्टी, गाणी, गप्पा यांच्या सहाय्याने अनेक विषय व व्यवहार ज्ञान शिकवलं जातंय. अशा मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी असतो. त्यामुळे कमी वेळातच त्यांचं लक्ष वेधून घेता येईल आणि ती मुलं एका जागेवर बसून राहतील हे पहाणं गरजेचं असतं. त्यामुळे थोड्या वेळाची सेशन्स/लेक्चर्स घ्यावी लागतात.   

      पालकांसाठी हे काम अजिबात सोप्पं नाही, तरीही ब-याच पालकांनी सहकार्य केलं आहे. परंतु काही पालकांनी यावर्षी गॅप घ्यायचंच ठरवलंय. त्यासाठी बरीच आणि वेगवेगळी कारणं आहेत. वेळ, कौशल्य आणि साहित्याची उपलब्धता यांचा अभाव ही प्रमुख कारणं आहेत. शासनाने मात्र या मुलांचा फार विचार केलेला दिसत नाही. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. नंतरही सर्व नविन नियमांचं पालन ही मुलं करु शकतील का? ही मोठी शंका व जबाबदारी आहे. अध्ययन क्षमतेप्रमाणेच यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत कुठलाही निर्णय घेणं शाळेसाठी व पालकांसाठी कठिणच आहे. या गॅपमुळे मात्र अशा मुलांचं खूप नुकसान होईल की काय अशी भीती शिक्षकांना वाटते आहे. तरीही ही सर्व शिक्षक मंडळी ज्या ध्येयाने आणि ध्यासाने काम करत आहेत ते प्रशंसा आणि पुरस्काराच्या पलिकडचं आहे. शतशः नमन आहे त्यांना!                                                                       -श्रुती संकोळी, ९८८१३०९९७५

Leave a Reply

Close Menu