कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने केलेल्या आवाहनानुसार आज वेंगुर्ला बंदारावर फक्त नगराध्यक्ष, पोलिस, व्यापारी यांनी सोशल डिस्टंसिगचे पालन करुन गर्दी न करता नारळ अर्पण केले. नारळी पौर्णिमेला दरवर्षी गर्दीने फुलून जाणारा बंदर परिसर आज अगदी सुनासुना वाटत होता.

      वेंगुर्ला बंदर येथे दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. पोलिस, नगराध्यक्ष, व्यापारी, मच्छिमार यांच्यासह इतरही नागरीक समुद्रात नारळ अर्पण करतात. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी संबंधितांची बैठक घेऊन तशाप्रकारचे नियोजन केले होते. तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरीकांनी नारळी पौर्णिमेदिवशी बंदर परिसरात गर्दी करु नये आणि कुठल्याही प्रकारचे स्टॉल तेथे लावू नये असे आवाहनही केले होते.

      बैठकीत ठरल्यानुसार आज सायंकाळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी वैभव साबळे, तालुका व्यापारी संघाचे पदाधिकारी, मच्छिमार यांनी समुद्रात नारळ अर्पण केले. कोरोनाच्या संकटामुळे आणि नगरपरिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरीकांनी मात्र, बंदारावर जाणे टाळले. त्यामुळे दरवर्षी गर्दीने फुलून जाणारा बंदर परिसर आज सुनासुना वाटत होता. याठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

Leave a Reply

Close Menu