एक पाऊल पुढे….

१० सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस पाळला जातो. ह्यासाठी एक वेगळा दिवस राखून ठेवण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेला आणि आत्महत्या प्रतिबंध संघटनेला वाटते, यावरुनच हा विषय किती गरजेचा आहे ह्याची कल्पना आपण करु शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगात दर ४० सेकंदाला १ व्यक्ती आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडते. १५ ते २९ वर्षे वयोगटामध्ये होणा-या मृत्यूमागे असलेल्या कारणांमध्ये आत्महत्या हे क्रमांक २ चे कारण आहे. या आकडेवारीवरुन ही समस्या किती भिषण आहे याचा अंदाज आपल्याला येतो.

       असं असलं तरी आपल्याकडे जबाबदारीने यावर फार बोललं जात नाही. मुळातच मृत्यूविषयी बोलणं म्हणजे अभद्र. त्यात आत्महत्येचा तर विषयच नको अशी एक भावना असते. आपण आत्महत्येचा विषय काढला तर समोरच्याच्या मनात नसले तरी ते विचार यायला लागतील किंवा जे आत्महत्येबद्दल बोलतात ते उगाचच धमकी देतात, ते असं काही करत नाहीत असे अनेक गैरसमज आत्महत्येबद्दल समाजात प्रचलित आहेत. याविषयी बोलायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे माहित नसतं. ह्या आणि अशा अनेक कारणांमुळे हा विषय बाजूला सारला जातो. पण आत्महत्येबद्दल बोलल्यामुळे झालाच तर फायदाच होतो. नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला पूर्णपणे हताश वाटायला लागतं, आता कुठलेही पर्याय उपलब्ध नाहीत असं वाटायला लागत तेव्हा ती व्यक्ती आत्महत्येचा विचार करायला लागते. अशावेळी जर कुणीतरी त्या व्यक्तीशी बोललं तर उलटत्या व्यक्तीच्या मनात आशा निर्माण व्हायला मदत होऊ शकते आणि कुणालातरी आपली काळजी वाटतेय ही भावना त्या व्यक्तीसाठी आश्वासक असू शकते.

      नेमके कुणाच्या मनात हे विचार चालू आहेत हे आपण कसं ओळखायचं, असा एक प्रश्न मनात येऊ शकतो. खरतर ह्याच काही सूत्र किवा चाचणी नाही. पण काही व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा पर्याय येण्याची शक्यता जास्त असते. उदा. मानसिक आजार असलेल्या व्यक्ती, पराकोटीचं दारिद्र्य, घरात होणारी सतत हिसा अशा काही कठीण परिस्थितीत जगणा-या व्यक्ती, असाध्य रोगांनी ग्रासलेल्या व्यक्ती, व्यसनाधीन व्यक्ती, ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न पूर्वी केला आहे अशा व्यक्ती यांना आत्महत्येचा धोका जास्त असतो, असं विविध संशोधनातून समोर आले आहे. शिवाय जर एखादी व्यक्ती अतिशय निराश आणि असहाय्य वाटत असेल, ती व्यक्ती सतत मरणाबद्दल बोलत असेल, ती व्यक्ती अति वेगाने गाडी चालवणे, हातापायावर ब्लेडने वार करणे इत्यादी स्वतःला हानिकारक अशा गोष्टी करत असेल, मृत्यूपत्र करणे किवा स्वतःच्या वस्तूंचे वाटप करणे अशा निरवानिरवीच्या गोष्टी करायला त्या व्यक्तीने सुरुवात केली असेल तर अशा व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार असू शकतात. अशावेळी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे किवा त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन तिच्याशी मोकळेपणाने संवाद साधला तर त्याची मदत होऊ शकते. अशावेळी त्या व्यक्तीशी नेमकं काय बोलायचं किवा कसं वागायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

      सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीच्या या (आत्महत्येच्या) विचारांबद्दल/निर्णयाबद्दल त्या व्यक्तीला कोणतीही नाव न ठेवता, ‘हे किती बावळटपणाचं आहे / तुला वेड लागलंयअसे कुठलेही शेरे न मारता त्या व्यक्तीपर्यंत तुमची काळजी पोचवायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. उदा.तुम्ही त्या व्यक्तीला असं म्हणू शकता की तू इथपर्यंत विचार केलायस म्हणजे तुला किती त्रास होत असेल हे मी समजू शकते‘. त्यांना विचारा की या परिस्थितीत तुम्ही त्यांची कुठल्याप्रकारे मदत करु शकता. तुमच्या मनात काही कल्पना असतील ज्यायोगे तुम्ही त्यांची मदत करु शकता तर त्या त्यांना सुचवा, पण सल्ले देऊ नका. तुम्ही त्यांच्यासोबत आहात हा विश्वास त्यांना द्या.

     अशावेळी अगदी नैसर्गिकरित्या आपली पहिली कृती काय असते तर आपण त्या व्यक्तीला आत्महत्या करणं कसं चुकीचं आहे हे पटवून द्यायचा अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो आणि नेमकं हेच त्या व्यक्तीला अजिबात ऐकायचं नसतं. त्यांना ह्या पर्यायांबद्दल बोलण्याऐवजी त्यांच्या भावना, समस्या याबद्दल बोलत करा आणि त्यांच्या मनातून हा विचार निदान तात्पुरता बाजूला जाईल असा प्रयत्न करा.

    अशा व्यक्तींच्या शक्य होईल तेवढं संपर्कात राहा. तुम्ही त्या व्यक्तीच्या घरातल्या/कामाच्या ठिकाणच्या इतर कोणाला ओळखत नसाल तर त्यांच्याशी ओळख करुन घ्या आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक तुमच्या जवळ ठेवा. त्या व्यक्तीशी बोलताना आत्महत्येच्या विचारांचं गांभीर्य समजून घेऊन परिस्थिती किती आणीबाणीची आहे ह्याचा अंदाज घ्या. त्या व्यक्तीच्या मनात नुसतेच विचार आहेत की त्या व्यक्तीने काही बेत पण केला आहे ते जाणून घायचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीच्या सभोवतालातून सर्व हानिकारक वस्तू जसं औषध, किटकनाशक, सु-या / चाकू ई. गोष्टी बाजूला करा. अशावेळी त्या व्यक्तीने मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशाकडून मदत घेतल्याने खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा पर्याय त्यांना सुचवा. तिथपर्यंत पोचण्यासाठी आणि ही प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी शक्य ती मदत त्यांना करा. जर परिस्थिती गंभीर आहे असं जाणवलं तर ती परिस्थिती एकट्याने हाताळण्याचा प्रयत्न करु नका. अशावेळी एखाद्या मानसिक समुपदेशन पुरवणा-या हेल्पलाईनची मदत घ्या. खाली अशा काही हेल्पलाईनची माहिती दिली आहे.

आयकॉल सायकोसोशल हेल्पलाईन  – ०२२-२५५२११११/९१५२९८७८२१, सोमवार ते शनिवार सकाळी १० ते रात्री ८ ह्या हेल्पलाइनवर तज्ज्ञ आणि प्रशिक्षित समुपदेशकांतर्फे मोफत समुपदेशन केले जाते.

परिवर्तन हेल्पलाईन – ७६७६६०२६०२ -सोमवार ते शुक्रवार दुपारी १ ते रात्री १० ह्या हेल्पलाईनवर तज्ज्ञ व प्रशिक्षित समुपदेशकांतर्फे समुपदेशन केले जाते.

आसरा हेल्पलाईन- ९८२०४६६७२६ ह्या हेल्पलाईनद्वारे आठवड्याचे सातही दिवस २४ तास समुपदेशनाची सुविधा पुरविली जाते.

      आत्महत्यांचे जगभरातले आकडे जितके सत्य आहेत तितकंच हेही सत्य आहे की, ह्यातल्या काही आत्महत्या तरी रोखल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर हेही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे की प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे, दुर्दैवाने त्या प्रयत्नांना यश आलं नाही तर तो तुमचा दोष/अपराध नाही. पण सध्याची परिस्थिती अशी काही की समाज म्हणून आपले प्रयत्नच कमी पडतायत. तसं व्हायला नको. यंदाच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचं ब्रीद आहे – एक पाऊल पुढे (ठ्ठ द्मद्यड्ढद्र डथ्दृद्मड्ढद्ध). आपण पुढे केलेला एक हात आणि टाकलेलं एक पाऊल ही आकडेवारी कमी करायला मदत करु शकते. हे पाऊल एका सशक्त समाजाच्या दिशेने टाकलेलं पाऊल असेल. चला तर मग आपण सगळ्यांनी मिळून टाकूया एक पाऊल पुढे…                                                       अतिथी-भक्ती करंबेळकर, ९९२०८१५४०७

This Post Has One Comment

  1. मला वाटतं आत्महत्तेच्या वाटेवर चालणाऱ्या वास्तविकतेचा आढावा त्याचे आकलन करून होणार नाही.
    जागृतता महत्वाची! एकत्रित कुटुंब पद्धतपण याला आळा घालू शकते. मला वाटतं आपण आपल्या संस्कृतीची जी तोडफोड आपल्यानुरूप परिवर्तित केली आहे, त्याचाच परिणाम असावा हा!
    मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश असतच आणि त्याची मांडणी जबाबदारी नागरीक म्हणून समोर ठेवली तर यातून नक्कीच सकारात्मक परिवर्तन होईल, यांत शंका नाही.
    चांगला विषय मांडला.
    धन्यवाद

Leave a Reply to VINAY PATIL Cancel reply

Close Menu