वेंगुर्ला शहरातील ४५ वर्षीय महिलेचा कोरोनामूळे मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दरम्यान, गुरुवारी १० सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार वेंगुर्ला शहर, उभादांडा, कोचरा व शिरोडा असे मिळून एकूण ९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर आतापर्यंत तालुक्यात एकूण १७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून यातील १०६ व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत. तर ६६ रुग्णांवर उपचार सूरु असल्याची माहिती तहसीलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे.

      वेंगुर्ला शहर सातेरी मंदिर नजिकच्या या महिलेचा गुरुवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. श्वसनाचा त्रास झाल्याने त्या महिलेला ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज शुक्रवारी पहाटे तिचे निधन झाले. तिचे वय ४५ वर्ष होते. दरम्यान या घटनेची चर्चा शहरात सकाळपासून सुरु होती. या घटनेला तहसिलदार यांनी दुजोरा दिला आहे.

      दरम्यान गुरुवारी सकाळी करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये उभादांडा-भेंडमळा १, उभादांडा-वरचीमाडवाडी १, शहरातील रामेश्वर मंदिर जवळ १, सातेरी मंदिर जवळ १, इचलकरंजी वरुन आलेला १ मिळून ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यातील आज पहाटे एका महिलेचा मृत्यु झाला. तसेच गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोचरा येथील जुन्या रुग्णाच्या संपर्कातील २ व नवीन १, तर शिरोडा येथे १ अशा एकूण ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते, अशी माहिती तहसीलदार श्री.लोकरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Close Menu