उपोषणात घेतलेले मुद्दे घेऊन संदेश निकम यांनी यापूर्वी शासनाकडे तसेच वरिष्ठ पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला होता. त्यावर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी अधिका-यांनी न.प.मध्ये येऊन तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष जागेवर विकास कामांची पाहणी करुन त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना सादरही केला आहे. मात्र, तक्रारदार यांनी भ्रष्टाचाराबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. न.प.च्या सर्व विकासकामांवर वरिष्ठांनी समाधान व्यक्त करत अहवाल मान्य करुन संबंधित अधिका-यांना निर्दोष ठरविलेले आहे.
२०१२ साली तत्कालीन नगराध्यक्ष संदेश निकम यांच्यावर भूयारी गटार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महालेखापाल मुंबई यनी ऑडीट रिपोर्टमध्ये आक्षेप नोंदविले आहेत. अशा व्यक्तीने भ्रष्टाचाराबद्दल बोलणे म्हणजे आपले पक्षातील अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. सत्तेत बसलेल्या उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ या सर्व ठरावांना मंजुरी देऊन बाहेर जाऊन भ्रष्टाचार म्हणतात, म्हणजे नेमका भ्रष्टाचार कसला? हे उपोषण म्हणजे सत्तेत राहायचे, सत्तची फळे चाखून आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून लोकांना फक्त विरोध दाखविण्याचे काम करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहरात मागील ४ वर्षात झालेला विकास नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे अशा दिखाऊ उपोषणाने नगरपरिषदेच्या स्वच्छ कारभाराकडे बघण्याची दृष्टी बदलणार नाही असेही श्री. गिरप यांनी स्पष्ट केले.