
वेंगुर्ला न.प. कौन्सिलची सर्व साधारण सभा शिवाजी सभागृहातून २४ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या सभेला उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, विधाता सावंत, पुनम जाधव, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, शितल आंगचेकर, कृपा मोंडकर, सुमन निकम, संदेश निकम, आत्माराम सोकटे, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
क्रॉफर्ड मार्केटच्या ठिकाणी नुतनीकरण करण्यात आलेल्या सर्व गाळ्यांचा शुभारंभ २७ ऑगस्ट रोजी करण्याचा व ज्या गाळ्यात जे व्यापारी व्यवसाय करीत होते, त्यांनाच ते गाळे न.प.च्या उपविधीनुसार देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे गणेशोत्सव होणार असून या कालावधीत बॅनर किवा जाहिराती लावण्यासंदर्भात फी भरुन परवानगी घेणे आवश्यक रहाणार असल्याचेही ठरविण्यात आले. एल.ई.डी. स्क्रिनवर जाहिराती देणा-यांनी सदरची फी भरुन जाहिरात देण्यासाठीही मंजुरी देण्यात आली. कॅम्प येथील टर्फविकेट क्रिकेट क्रिडांगणाची देखभाल व दुरुस्ती व्हावी. हे मैदान स्थानिक खेळाडूंना वापरण्यास योग्य रहावे. तेथे विविध खेळांची प्रशिक्षणे आयोजित केली जावीत. क्रिडा पर्यटनाचा उद्देश सफल व्हावा. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून वेंगुर्ला क्रिडांगण व इतर क्रिडा आस्थापने कोकण हॉस्पीटॅलिटी अँण्ड अँडव्हेन्चर्स यांना ३ वर्षासाठी ते विनामुल्य वापरांस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जलतरण तलावाच्या देखभालीसाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मुंबई विद्यापिठास सिंधुस्वाध्याय या अभ्यासक्रमासाठी नगरपरिषद मालकीची निसर्ग इमारत (संगीत रिसार्ट) भाड्याने देणेकामी इमारतीची डागडुजी त्यांनी स्वतः करावी. ते शक्य नसल्यास जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठविण्यांत यावा. त्यांच्याकडून मिळालेल्या परवानगीनुसार ती इमारत त्यांना वापरण्यास देण्यात यावी, असे ठरविण्यात आले.
