थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये इरोड या गावी त्यांच्या आजोळी झाला. म्हणून 22 डिसेंबर हा दिवस गणित दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सन 2012 हे वर्ष (त्यांची 125 वी जयंती) भारत सरकारने गणित वर्ष म्हणून साजरे करावयाचे निश्चित केले. त्या वर्षापासुन आजतागायत श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे, ता. वेंगुर्ला या प्रशालेच्या प्रवेशद्वारापाशी दरवर्षी एका नाविन्यपूर्ण गणित जत्रेची निर्मिती केली जाते.
बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय कठीण वाटतो आणि त्यामुळे साहजिकच त्या विषयाकडे दुर्लक्ष होते. पर्यायाने गणित विषयात उत्तीर्ण होणे त्यांना अवघड जाते. गणितात रंजकता आणण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला आणि बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी गणित हा विषय कठीण नसून प्रयत्नसाध्य आहे. हे पटवून देण्यासाठी कृती, उपक्रम आणि प्रयोग यांचा वापर करायला हवा हा दृष्टीकोन समोर ठेवून आणि यावर्षी 22 डिसेंबर 2021 रोजी रामानुजन यांची 134 व्या जयंतीचे औचित्य साधून इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विविध अध्ययन अध्यापन अनुभुत देणाऱ्या एकूण 134 गणिती खेळांची निर्मिती या गणित जत्रेत केली.
या जत्रेच्या निर्मितीतून साध्या, सोप्या भाषेत गणित समजावून देण्याचा व घेण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी 22 डिसेंबरला घेतला जातो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दरम्यान सुसंवाद साधावा, अध्ययन करताना विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे आणि यामुळेच शिक्षण प्रक्रिया अर्थपुर्ण व आशायुक्त व्हावी यासाठी दरवर्षी हा उपक्रम प्रशालेत राबविला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने गणिताची ओळख होते.
गणित व संख्याशास्त्र या विषयाअंतर्गत 80 गुणांची लेखी परीक्षा व 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा याप्रमाणे 11 वी, 12 वी साठी गुणदान पद्धती शासनाने ठरवून दिली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 20 गुण असल्याने विद्यार्थ्यांना कृतीद्वारे प्रात्यक्षिक करुन त्याचा अनुभव घेता यावा हा दृष्टीकोन समोर ठेवून गणितातील विविध खेळांची निर्मिती केली.
सुरुवातीला गणितातील प्रत्येक संकल्पना विचारात घेऊन त्यावर कृतीयुक्त माहिती जमविण्यास सुरुवात केली. यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रत्यक्ष सहभाग घेतला. गणिती खेळांची निर्मिती करताना विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनाच आपल्या कल्पनेतून शक्य होतील, तशा गणितीय प्रतिवृत्तीबद्दल माहिती तयार करण्यास सांगितली. विद्यार्थ्यांनी आपल्या परीने साहित्य निर्माण करण्यास सुरुवात केली. गरज पडेल तिथे त्यांना मार्गदर्शन करत नवनवीन साहित्याची निर्मिती केली. गणित जत्रेत फक्त प्रतिकृती न बनविता त्यावर आधारीत – * गंमत गणिताची, * गुप्तहेर बना, * मेंदूला खुराक, * Fun with shapes, * बौद्धिक करामत, * ज्याचे त्याला द्या, * चित्रातील आकृतीचा परिचय द्या, * तराजूचे पारडे समान करा, * जरा डोकं चालवा, * विखुरलेल्या मण्यांची माळ, * अलिबाबाचा खजिना लूटा, * हे करुन पहा, * आकड्यांची भौमितीक रचना, * गणितातील कोडी, * गणितातील कूट प्रश्न, * घालू नका घोळ अन् पूर्ण करा ओळ, * शारीरिक खेळ-गुणोत्तरांचा मेळ, * Magic Square Puzzles, * हॅनॉईचा टॉवर, * टिकटॉक मल्टिप्लायर, * पेंटामिनोज, * Black To Back, * Round the block, * खेळ फुली गोळ्यांचा, * अचूक मार्ग शोधा, * माशांच्या पोटात दडलं काय? * Get Set Go, * रचनेचा खेळ, प्रमेयांचा मेळ, * खुल जा सिम-सिम, * मॅजिक कार्डस्, * गुण्या गुण्या गुणोत्तरे, * गुणोत्तरांची एकजूट, * शोध सुत्रांचा, * हे असंच का? * रहस्याचा शोध घ्या, * अंक – रचनांच्या चमत्कृती, * एकांतातील जगश्रेष्ठ संख्या, * जादुच्या रांगोळ्या, * बापाचे गुण नातवात, * वेड्यांचा कारभार, * आईची इच्छा, * 45 वजा 45 बरोबर 45, * मैदानावरील भूमिती, * पॉवरबाज संख्या, * 3 चेंडू 30 धावा, * चकवा देणारी बेरीज, * चला खेळूया विभाज्यता, * थक्क करु सोडणारी स्मरणशक्ती, * आळशी मुलाची गोष्ट, * दोन आकड्यांचे गणित, * नवअंक दरबार, * माचिस काड्यांची कोडी
अशा प्रकारच्या अनेक कृती, खेळ व कोडी या सर्व कृती विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वैयक्तिकपणे करु शकतात. तसेच विद्यार्थी गटाला एकत्र करुनही काही प्रात्यक्षिके/खेळ दाखविता येतात. यातील काही कृती वर्ग अध्यापन करतेवेळी शैक्षणिक साधन म्हणून वापरुनही दाखविता येतात. या जत्रेतील खेळ व कोडी वैयक्तिकपणे खेळण्यास विद्यार्थ्यांना मजा येते. त्याचप्रमाणे प्रत्येक कृतीत एक गणिती घटक लपला आहे तो शोधता येतो आणि याची प्रचितीत येते.
कार्ड गेम- यामध्ये इंटरनेट व काही संदर्भ पुस्तकांच्या सहाय्याने काही गेम्स तयार केले ज्याद्वारे अगदी Counting numbers, prime numbers, LCM, GCD, Squaes Cubes यांसह Quadratic Equations, Polynomials यांसारखे Points खेळातून विद्यार्थ्यांना स्पष्ट होतात. तसेच यातील या गेम्सद्वारे स्पष्ट होण्यास मदत होते.
कृती- इंटरनेटच्या माध्यमातून तसेच काही संदर्भ पुस्तकांच्या माध्यमातून माहिती मिळवून हे साहित्य जत्रेत तयार केले. क्षेत्रफळ, परिमिती बोर्ड, जिओबोर्ड, पिक फॉर्म्युला उपकरण, कोनिक सेक्शन उपकरण, अस्टोलॅब व हिप्सोमिटर यासारखी उपकरणे जत्रेत बनविण्यात आली, ज्यांचा वापर करुन प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थी सहज आकलन करु शकतात.
वैयक्तिक व सांघिक खेळ- जसे कार्ड गेम्स तयार केले त्याचप्रमाणे इतर काही गणिती खेळ बनविले ज्यामध्ये त्रिकोणमितीवर आधारित खेळ व कोडी, पायथॉगोरस प्रमेयावर आधारित खेळ, समांतर रेषांचा खेळ, मॅजिक कार्डस्, टिकटॅक गुणाकार, संख्यारेषा यासारखे अनेक खेळ जे सांघिक किंवा वैयक्तिक पद्धतीने देखील खेळता येतील.
वैदिक गणित- अगदी प्राचीन काळापासून भारतात वैदिक गणित प्रचलित आहे. परंतु काळाच्या ओघात कुठेतरी त्याबद्दलची माहिती व त्याचा वापर कमी होत गेलेला दिसतो. परंतु नेहमीच्या वापरातील पद्धतीपेक्षा वैदिक गणितातील पद्धतींनी अगदी कमी वेळेत आणि अचूकपणे आकडेमोड करता येते. त्यामुळे विदार्थ्यांना त्याची माहिती मिळावी यासाठी वैदिक गणितातील पद्धती व त्यावर आधारित ट्युटोरीअल देखील तयार केली.
Some interestimg facts- यामध्ये तक्ते व बोर्डच्या सहाय्याने गणितातल्या काही रंजक गोष्टी तयार केल्या आहेत. काही कोडी, कटुप्रश्न, चारोळ्या, कविता यांच्या माध्यमातून गणितातील बऱ्याच संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. यात खास म्हणजे उखाणे, ज्याचा वापर करुन बरीच सूत्र लक्षात ठेवता येतात. एकक, दशक, शतक पासून परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत पर्यंतच्या संख्यांचे वाचन, रामानुजन मॅजिक स्क्वेअर सारख्या बाबींची सखोल माहिती या जत्रेतून मिळते.
नेहरु विद्यान केंद्र, वरळी मुंबई येथे संपन्न झालेल्या पश्चिम भारत विज्ञान जत्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत गोवा, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, दीव-दमण आणि दादरा नगर हवेली या आठ राज्यांसमवेत आम्ही मांडलेली गणित प्रयोगशाळा खुल-जा-सिम-सिम ही प्रतिकृती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
गणित हा विषय जरी क्लिष्ट असला तरी गणित जत्रेच्या माध्यमातून वियार्थ्यांना आकर्षण वाटेल, गणितात गोडी, रस निर्माण होईल, गणिताची भिती वाटणारे व गणिताकडे वळू पहाणाऱ्यांना गणित हा विषय निश्चितच आवडू लागेल याची मला खात्री आहे. गणित विषयात रुची निर्माण करण्याचा उदात्त हेतू या नाविन्यपूर्ण गणित जत्रेच्या माध्यमातून सफल झाला.
-सौ. स्वाती वालावलकर
मुख्याध्यापिका-श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे, मो. 9421260750