वीलपॉवर

“अरे क्या बात है! तुला खोटे वाटेल…. पण! आत्ताच आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. आणि तूझा फोन आला…“ अरे आता तुलाच फोन लावत होतो.! .. असा संवाद खूप वेळा आपल्या कानावर पडला असेल….

      कधी कधी आपण सुद्धा कोणाचीतरी आठवण काढली असेल आणि त्याच वेळी त्याचाच फोन आलेला असतो. किंवा आपल्या समोर तो प्रत्यक्ष उभा राहतो असे पुष्कळ वेळा घडलेले आपण खूप वेळा अनुभवतो…  म्हणजेच काय असे योगायोग घडत असतात.

      काहीजणांना ती प्रबळ इच्छाशक्ती वाटते… “वीलपॉवर“!!!!

      पण कधी कधी आपण एखाद्याला टाळण्यासाठी आपला नेहमीचा मार्ग बदलून दुसरा मार्ग निवडला तरी नको असलेली व्यक्ती आपली इच्छा नसताना सुद्धा  आपल्या समोर उभ्या ठाकतात याला कुठली प्रबळ इच्छा म्हणावे हेच कळत नाही.

      पण काहीही असो आमच्या कडे ही वीलपॉवर फारच प्रबळ आहे हे मात्र नक्की!! कारण आमच्या सौ. ने एखाद्या माणसाची आठवण काढायची अवकाश, ती व्यक्ती संपूर्ण दिवसात हजर नाही झाली असे क्वचितच घडले आहे. आणि हेच कशाला, आमच्या बागेतले “भारद्वाज, साळुंख्या, बुलबुल, खंड्या, धनेश, कोतवाल, कोकिळा असे पक्षी ही यातून सुटलेले नाहीत. आणि मुंगूस सुद्धा…  त्यामुळे मी मात्र देवाला एकच मागणे असते की “देवा चुकून सुद्धा आमच्या हिला खूप दिवस साप दिसला नाही असे कधीच वाटू  देवू नकोस!“ कारण सरपटणारे प्राणी माझ्या काळजाचा ठोका चुकवतात…….

      आणि आम्हाला यात अंतरात्म्यातल्याची साथ असते हे खूप वेळा सिद्ध झाले आहे. कारण गेले पंधरा दिवस झाले नाना शिरोडकर चहा प्यायला आलेले नाहीत हे हिच्या लक्षात येऊन नानांची आठवण तिला फार प्रकर्षांने झाली. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी नानासाहेब जोरजोरात हाक मारत दरवाजावर उभे! आणि त्यांनी आम्ही विचारायच्या अगोदरच मी पंधरा दिवस तळवड्याला मुलीकडे रहायला गेलो होतो, हे सांगून टाकले. आणि तुमचा निरोप मिळाला की तुम्ही माझी खूप आठवण काढत आहात म्हणून तसाच एसटी तून उतरून घरी न जाता परस्पर चहा प्यायला इकडे आलो…

      आम्ही एकमेकांकडे पाहातच राहिलो.

      नाना म्हणाले अहो रात्री स्वप्नात “हे“ आले आणि म्हणाले “अरे तुझी कब्रे खूप आठवण काढतायतात तेव्हा त्यांना जाऊन ताबोडतोब भेट!“ म्हणून मी सकाळीच एसटी पकडली.

      आम्ही दोघेही ओरडलो “कोण हे?“

      तसे त्यांनी मी केलेल्या शंकर महाराजांच्या पेंटिंग कडे बोट दाखवले हेच दाढीवाले महाराज!“

      आणि आम्ही स्तब्ध उभे.खरंच काही क्षण तर्कअतर्कतेच्या पलिकडे, समजण्या पलिकडचे असतात हेच खरं. म्हणतात की मन आणि इच्छा या एकत्रित झाल्यावर  भावना प्रभावीपणे प्रगट होतात.

      सकाळीच बाहेरूनच शैलेशची हाक ऐकू आली. “ साहेब आजच्या कार्यक्रमाची भालजीनी आठवण करायला सांगितली आहे… लक्षात आहे ना? दुपारी दादरला तीन नंबर प्लॅटफॉर्म वर भेटुया… खर तर दरवर्षी आमच्या “दिपाली कुंज” मधील सगळे रहिवासी एकत्र येऊन कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम करायचो. या वेळी शैलेश तळकर याने खूप मेहनत घेऊन मुलांचा सुगम संगीताचा कार्यक्रम बसवलेला होता व मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी साथीला भालजींचा वाद्यवृंद बोलाविला होता. भालजींनी आम्हा नवख्यांना सांभाळून कार्यक्रमात मजा आणली होती. तिथेच भालजींशी सूर जुळले आणि त्याच दिवशी चैत्रनवरात्रात कल्याणला राममंदिरात मला घेऊन येण्यासाठी शैलेशला बजावले होते. त्यामुळे मला नकार देण्याची संधीच नव्हती.

      कल्याण स्टेशनरून पकडलेली रिक्षा अन्सारी मोहल्ल्यात घुसून जुन्या ठाकूरद्वारच्या राममंदिराजवळ थांबली. सभोवती असलेल्या मुस्लिम वसाहतीत ते राममंदिर पाहून मनाला वेगळीच भावना निर्माण झाली. फार पूर्वीच्या काळात जसे शिर्डीतील साईबाबांचे मंदिर होते तस हे मंदिर वाटले. तेच समाधान! खर तर आम्ही दोघे वेळेच्या आधी पोहोचलो होतो. बाकी सगळे यायला अर्धा पाऊण तास होता. त्यांची वाट पहात सभागृहाबाहेरच बसलो.

      खर तर मला कार्यक्रमापेक्षा जास्त उत्सुकता होती ती फक्त 151 वर्षांच्या स्वामी दामोदराचार्याना पहाण्याची आणि भेटण्याची! त्यांना भेटायची संधी मिळाली हे माझे भाग्यच होते.

      त्यांच्या विषयी विचार करत असताना अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते सभागृहात चाललेल्या प्रवचनाने. हिमालयातून आलेले स्वामी श्री रामावर प्रवचन करत होते. आठवडाभर चालू  असलेल्या प्रवचनाची सांगता उद्या रामनवमीला होणार होती. सभागृहातील श्रोतेमंडळीनी खूप तल्लीन होऊन गेली होती. बाहेरूनच मी ते ऐकत होतो. ऐकता ऐकता मी ही तल्लीन होऊन गेलो. आणि अचानक चक्क वेगळेच जाणवायला लागले. चक्क असे वाटायला लागले की त्या स्वामींप्रमाणे आपणही त्या श्रोत्यांसमोर उभ राहून काहीतरी रामावर बोलावे! निदान एक गाणे तरी म्हणावे. आज कोणी जर मला असे म्हणाले तर नक्कीच बोलेन आणि गाणे म्हणेन….

      आणि मला तंद्रीतून जागे केले ते शैलेशने कारण भालजी हाका मारत होते. मनात आलेल्या विचाराने मला माझेच हसू आले.

      भालजींनी आम्हाला त्यांचे गुरू स्वामी दामोदराचार्यांशी भेट करून दिली. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज जाणवले. 151 वर्षांच्या स्वामींनी आशीर्वाद देताना माझ्या डोक्यावर ठेवलेल्या हातात एक वेगळीच संवेदना जाणवली. डोक्यातील सगळे विचार नाहीसे होऊन मन एकदम शांत झाले. थोडावेळ आम्ही सगळे त्यांच्या बाजूला बसून राहिलो.

      आणि एकदम भालजींनी मला एक वाक्य विचारले आणि मी हादरूनच गेलो कारण ते शब्द असे होते “काय चित्रकार तुम्हाला रामावर काही बोलायचे आहे कां? हे ऐकून मी गडबडून गेलो. मला काय उत्तर द्यावे हे कळालेच नाही?……..

      खर तर पंचवीस वर्षांपूर्वी मी त्या राममंदिरात एक रसिक श्रोता म्हणून गेलो होतो पण विश्‍वास बसणार नाही पण त्या कार्यक्रमाची सुरुवात गजर आणि स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती या ग. दि. मां. च्या गीत रामायण ने माझ्या स्वरातून झाली हे मात्र खरं!

      आणि त्या टाळ्यांच्या कडकडाटाने मिळालेल्या अनुभुतीचे वर्णन शब्दात करता येत नाही हेच खरं!

– प्रकाश कब्रे,

चित्रकार, 9657456647.

Leave a Reply

Close Menu