माझ्या राजा रं

दिदींचे पार्थिव संस्कार कव्हरेज करुन घरी परतत असताना डोक्यात आर्टिकल लिहायचं होतं.. ‘माझ्या शिवबाबा रं’. दिदींना दीनानाथ मंगेशकरानी घडवताना केलेला प्रवास मांडायचा होता.. शिवबाबा ही लतादीदींना हाक मास्टर दीनानाथ मारायचे. मोठं आर्टिकल लिहायचे होते. पण घरी आलो आणि दमल्यामुळे नाही जमलं.. पण पहाट उजाडली तीच कानात ऑर्गनवर जड बोटे पडावी आणि तो भेसूर आवाज ऐकू यावा अगदी तसं झालं.. मेसेज होता ‘सुधीर कलिंगण गेले.’

      लोकराजा सुधीर कलिंगण यांचे निधन! ज्यांना ‘दशावतार’ हा शब्द ठाऊक आहे अशा कुठल्याच माणसाला मी कितीही सुधीर कलिंगण या नावाबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमी वाटेल. अफाट रसिक श्रीमंतीत जगलेला हा बाबी कलिंगण यांचा मुलगा आज अखेरच्या प्रवासाला निघाला तेव्हा लोकराजा आपली नगरी आपले प्रजाजन पाहत होता आणि त्यांना पाहणारी ते समोर राजाचे रूप असूनही वेडा चंदनसारखी फक्त भ्रमिष्ट बनायची बाकी होती..

      बाबी कलिंगण या एका मोठ्या पित्याचे नाव सांगणारा नवतरुण कलावंत ज्येष्ठ कधीच बनला होता. पण वटवृक्ष असणाऱ्या पित्याच्या सावलीत त्या मोठं होताना तेवढाच महाकाय बनला.. अजूनही हनुमान म्हणजे बाबी कलिंगण, आणि बाबी म्हणजे देवच जणू ! या समीकरणात पेट्रोमॅक्स उजळताना कृष्ण अवतरला आणि या लाल मातीला त्यांनी द्वारका बनवली.. तोच कृष्ण, तोच शिवराम, तोच सुधीर आणि तोच स्वतःहा लोकराजा सुधीर कलिंगण!

      दशावतार हा शिकून येतो का माहीत नाही मला, पण दशावतार बनण्यासाठी अंगात एक देवाचा अंश लागतोच. बाबी नालंग यांचे अफाटपण जगलेल्या या परंपरेला ज्यावेळी सुधीर यांनी द्यायचे ठरवले ना तेव्हा आभाळाने झोळी पसरवली, आणि मातीनेस्वतःला दूर लोटत हे सुधीरचे साम्राज्य म्हणून चहू दिशांना द्वाही फिरवली.. आणि नाद उमटला लोकराजा!

      सुधीर कलिंगण समजून घेताना त्यांची अदा, त्यांचे नाट्यप्रयोग आठवतील. पण मला हा कलावंत आज माणूस म्हणून उलगडायचाय! माझ्यासारख्या अनेक सामान्य कलावंताना या जगण्याचा प्रवास शोधताना त्यांचे महानत्व उलगडत जाईल.

      ‘कामामुळे नाटका करूक टाइम नाय गावना’ हे फटकन बोलून तुम्ही केवळ स्वतःचे वकीलपत्र घेऊ शकता. पण सुधीर कलिंगण एसटीत दिवसभर ड्युटी करुनही रात्रभर नाट्य प्रवेश आणि पुन्हा सकाळी एसटीची ड्युटी! ही तारेवरची कसरत फक्त जगण्याची नव्हती, ती राजसत्ता आणि जनसेवा यांच्यातील एक कमालीची कर्तव्यभावना होती. आज जगाच्या मॅनेजमेंटमध्ये अनेक लोक स्वतःच्या आठ तासाची महती सांगून किंवा आमचा साहेब फक्त तीन तास झोपतो सांगून महती गातात.. मग अशावेळी लोकराजाला तुम्ही काय म्हणाल?

      संवाद, अभिनय, उंची या सगळ्यांचे कौतुक आहेच, पण कामावरचा थकवा नाटकात संवादात जाणवू न देणे, सकाळी कितीची ड्युटी आहे हे लक्षात ठेवूनही त्या राजपार्ट म्हणून माहोल उभा करणे आणि वडिलांच्या किर्तीला उंचवताना स्वतःचा आलेख मांडणे हे फक्त लोकराजाच करू शकतो!

      सुधीर कलिंगण यांना अखेरचा निरोप देताना त्यांना राजाचा वेश धारण केला होता. स्मिता पाटीलच्या पार्थिवाच्या वेळची गोष्ट फक्त ऐकली होती. आज सुधीर यांच्या निमित्ताने पाहिली. एवढी गर्दी पण निरव शांतता.. आसमंतावर अधिराज्य गाजवणारा राजा असा शांत निघाला त्यावेळी आज कदाचित देवांनी राजासी वाहून नेले या पल्याड आणि काय बोलणार म्हणा!

      सुधीर कलिंगण हे लोकराजा होते आणि लोकराजाच राहतील! पण सुधीर कलिंगण आठवताना कलाकार आणि नोकरीतला निष्ठावंतपणा हा कायम मस्तकी राहील. त्या वेशातही राजाच असणारा हा देवमाणूस एसटीच्या वेशातही रुबाबदार दिसायचा. कालपर्यंत सुधीर कलिंगण या आवाजातला तो श्‍लोक “आकाशात्पतितम्‌ तोयम्‌ यथा गच्छति सागरम्‌। सर्व देव नमस्कारः केशवम्‌ प्रति गच्छति॥“ उद्याही तसाच असेल फक्त आता नमस्कार देवांना पोहोचावा म्हणून लोकराजाला आवर्जून असेल.

      कारण सुधीर कलिंगण कालपर्यंत लोकराजा होते, आता स्वर्ग लोकीचे राजे बनले आहेत.. आणि हे राजेपण अढळ आहे.. कारण हे राजेपण या मातीतल्या रसिकजनांनी केलेल्या रंगसंस्काराच्या राज्याभिषेकाचं!

      भावपूर्ण श्रद्धांजली!

– ॠषी श्रीकांत देसाई,

वरिष्ठ पत्रकार, लोकशाही न्यूज,9870904129

Leave a Reply

Close Menu