वयाच्या 35 व्या वर्षी मी लेखन करू लागले. तत्पूर्वी शालेय जीवनात उत्तम निबंध लिहिणारी, पत्रलेखन करणारी होते. शिवाय माझ्या भाषणात नेहमी वाचलेल्या अनेक पुस्तकांचा संदर्भ येत असे. त्यामुळे माझे वेगळे वक्तृत्व ठरत असे. वाचनाने माझ्या आयुष्यात माणूस म्हणून जगण्याची प्रगल्भता दिली. एकच गोष्ट अनेक अंगाने पाहाण्याची दृष्टी दिली. आयुष्याच्या टप्प्यावर प्राधान्यक्रम ठरविताना मनाचा कधी तोल गेला नाही. कारण वाचनाने ती समृद्धता मला दिली. जाणिवा विकसीत करणारे खुले दालन म्हणजे ही पुस्तके आहेत असे प्रतिपादन प्रख्यात लेखिका माधुरी शानभाग यांनी केले. औचित्य होते जागतिक महिला दिनाचे. जागतिक महिला दिनानिमित्त मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात मराठीतील प्रख्यात लेखिका माधुरी शानभाग यांनी ‘वाचनाने मला काय दिले‘ या विषयावर साहित्यप्रेमींशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक पद्मा फातर्फेकर, उज्ज्वला खानविलकर-पटेकर (प्रायोजक), श्रद्धा सावंत (मळगाव हायस्कूल मुख्याध्यापिका), सत्कारमूर्ती नुतन बांदेकर, (ठाणे महानगरपालिका कृतीशील शिक्षिका) उपस्थित होते.
माणूस म्हटल्यानंतर संकटे, अडचणी या येतातच. पण या अडचणींना सामोरे जाताना संधीचं सोने करण्याची दृष्टी या वाचनाने होते असे सांगत माधुरी शानभाग यांनी आपले अनुभव ओघवत्या शैलीत सांगितल्ो. शिवाय सातत्याने नवीन काहीतरी करत राहाण्याची, शिकण्याची आस्था बाळगण्याचा सल्लाही यावेळी उपस्थितांना दिला. या दिनाचे औचित्य साधून माहेरवाशीण नुतन बांदेकर यांचा माधुरी शानभाग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन शुभांगी धर्मा यांनी केले. प्रास्ताविक वाचनालयाचे संचालक विलास मळगावकर, परिचय पद्मा फातर्पेकर, निवेदन राखी कासरलकर तर आभार गौरी डिचोलकर यांनी मानले.