नगरवाचनालय, वेंगुर्ला विविध उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक व शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आदर्श शिक्षक, शिक्षिका आणि शाळा असे पुरस्कार देत असते. याहीवर्षी असे पुरस्कार संस्थेतर्फे जाहीर केले आहेत.
यात जे.एम.गाडेकर यांनी दिलेल्या देणगीतून दिला जाणारा मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मातोंड-वरचे बांबर शाळेचे शिक्षक सुभाष साबळे यांना, कै.जानकीबाई मे.गाडेकर स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार वेंगुर्ला शाळा नं.१च्या शिक्षिका गायत्री बागायतकर यांना, तर अनिल श्रीकृष्ण सौदागर यांनी दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती माध्यमिक विभागासाठीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार अणसूर-पाल हायस्कूलच्या शैलजा वेटे यांना तसेच रामकृष्ण पांडुरंग जोशी यांच्या देणगीतून देण्यात येणारा सौ.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद नवभारत विद्यालय केळुस नं.१ या शाळेस जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांचे वितरण रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नगरवाचनालयाच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात दै. तरुण भारतचे सिधुदुर्ग आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.