आरोग्य रक्षक गावातील आरोग्य अभियानाला बळकटी देतील-सुरेश प्रभू

जिल्ह्यात साडेसातशे डॉक्टर्स आहेत. गावागावातून जसे सामाजिक कार्यकर्ते असतात. त्याप्रमाणे गावागावातून प्रशिक्षित आरोग्य रक्षक निर्माण झाले पाहिजेत. स्वेच्छेने काम करणारे आरोग्य रक्षक गावातील आरोग्य अभियानाला बळकटी देतील असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

      माझा वेंगुर्ला, किरात ट्रस्ट आणि अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मानव साधन संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले, कंपलायन्स अँड लिगल ऑफिसर एजिस फेडरल इन्शुरन्स प्रतिनिधी राजेश आजगांवकर, कोकण सक्षम आरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ. अमेय देसाई, माझा वेंगुर्ला संस्थेचे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, किरात ट्रस्टच्या सीमा मराठे, शरद चव्हाण, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते.

      सुरेश प्रभू पुढे म्हणाले, माझ्या वडिलांचे आजोळ वेंगुर्ला आणि माझे आजोळ शिरोडा, त्यामुळे जरी मूळ घर माझं मालवणात असले तरी मी या अर्थाने वेंगुर्लेकरच झालो. वेंगुर्ल्याची लोक प्रचंड चोखंदळ आहेत, याचा अनुभव मी ही घेतला आहे. साप्ताहिक किरात येथील बातम्या चाकरमान्यापर्यंत पोहोचवत असल्याने कोकणची खबर आम्हाला मिळत असते.

      रुग्णवाहिकेच्या बाबतीत इथल्या भौगोलिक स्थितीनुसार त्याची उपलब्धता करण्यात आली आहे. कोरोना लाटेच्या खाणाखुणा आजही आपल्या आजूबाजूला शिल्लक आहेत. आरोग्य सेवा सक्षम करत असताना भौतिक सुविधांसोबत आरोग्य रक्षक निर्माण झाले तर कोरोनासारख्या कठीण प्रसंगातून तरून जायला नक्कीच मदत होईल.

      यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि माझा वेंगुर्ला सदस्यांनी सेंटलुक्स हॉस्पिटल पुरुज्जीवन होण्यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा एक आढावा देत ते सुरू होण्यासाठीचा प्रभू यांच्या स्तरावरून देखील झालेल्या कामाबाबत चर्चा करीत प्रस्ताव सादर केला. यात सेंटलुक्स हॉस्पिटल सुरु करण्यासाठी आपणही प्रयत्नशील असल्याचे प्रभू यांनी सांगितले.

      आतापर्यंत कोकण सक्षम अभियान अंतर्गत कुडाळ येथील रोटरी क्लब यांना कार्डिऍक्ट रुग्णवाहिका तर वेंगुर्ला, सावंतवाडी येथे पेशंट ट्रान्सपोर्टसाठीच्या रुग्णवाहिका सीएसआर निधीतून देण्याचा प्रयत्न केला. यासाठी माझा वेंगुर्ला, किरात ट्रस्ट आणि अटल प्रतिष्ठान या संस्थानी मला भक्कम साथ दिली. नुसत्या ॲम्बुलन्स देऊन न थांबता कोकणातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी श्री.प्रभू यांनी मांडलेल्या आरोग्य रक्षक विचाराच्या आधारे यापुढेही काम करण्याचा आम्ही निश्‍चितच प्रयत्न करु. यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्त्वाची आहे असे कोकण सक्षम आरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी सांगितले.

      यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सुरेश प्रभू यांचा माझा वेंगुर्लाच्या सदस्यांच्यावतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला तर डॉ. अमेय देसाई यांचा सुरेश प्रभू आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी कोरोना कालावधीत तळागाळात सेवा दिलेल्या जिल्ह्यातील डॉक्टर्स, सिंधू रक्तमित्र कार्यकर्ते, समुपदेशक यांचा जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्वाक्षांकित केलेले सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

      रुग्णवाहिकेचे प्रायोजक चीफ कंपलायन्स अँड लीगल ऑफिसर एजीस फेडरल इन्शुरन्स प्रतिनिधी राजेश आजगांवकर, सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. मान्यवरांचे स्वागत निलेश चेंदवणकर व सिमा मराठे, प्रास्ताविक मोहन होडावडेकर, सुत्रसंचालन अँड.शशांक मराठे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu