महाभारत ग्रंथ वाचताना गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्येचे शिक्षण देते वेळची कथा आपण शाळेमध्ये नक्कीच वाचली असणार. अर्जुन वगळता सारे शिष्य गुरुंच्या परीक्षेतून वगळले गेले. फक्त अर्जुनच का गुरु द्रोणाचार्यांच्या परिक्षेत अव्वल ठरला. त्याचे कारण- गुरुंच्या मार्गदर्शनाचा सखोल अभ्यास, अचूक संधान व वेध, मनाची एकाग्रता आणि तीक्ष्ण दृष्टी – एका निष्णात धनुर्धारी योध्या जवळ ज्या साऱ्या मानसिक आयुधांची आवश्यकता असते, ती सारी आयुधे अजेत्या धनुर्धारी पांडुपुत्र अर्जुनाजवळ होती.
ही घटना इथे नमूद करण्याचे प्रयोजन एवढ्यासाठीच होते, प. बंगाल येथील, आसनसोल येथे दि. 10 ते 14 ऑक्टोबर 2022 दरम्यान संपन्न झालेल्या ऑल इंडिया, जी. व्ही मावलंकर शूटींग चॅम्पीयन स्पर्धेमध्ये (रायफल) वेंगुर्ल्याची कन्या सानिया सुदेश आंगचेकर हिने, यूथ आणि ज्युनीयर गटामध्ये (वयोमर्यादा- 18 ते 21) 10 मी. पीप साईट क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून 381/400 अशा भव्य गुणांनी यशाचा झेंडा रोवला. या भव्यदिव्य यशामुळेच सानियाने पुढील राष्ट्रीय शूटींग स्पर्धेसाठी आपल्या स्थानावर शिक्कामोर्तब केले आहे.
या अपूर्व यशाबद्दल सानियाचे अंतःकरण पूर्वक अभिनंदन! तब्बल 12 राज्यामधून आलेल्या 1240 स्पर्धकांमध्ये, तेजःपुंज यश संपादन करून सानियाने स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबियांचे, वेंगुर्ला तालुक्याचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचे- नेमबाजी क्रिडा क्षेत्रात नाव रोशन केले आहे.
सानियाच्या यशाच्या काही ठळक पायऱ्यांचा उल्लेख इथे आवर्जून करावा असे वाटते :
2020 : डेरवण यूथ गेम्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रायफल नेमबाजी स्पर्धेत 315/400 गुण प्राप्त करून सानिया “सुवर्ण पदकाची“ मानकरी ठरली.
2020 : महाराष्ट्र एयर अँड फायर आर्म द्वारा आयोजित, मुंबई येथील राज्यस्तरिय नेमबाजी स्पर्धेत 374/400 गुण संपादन केले आणि प्री नॅशनल स्पर्धेसाठी निवडीवर मोहर उमटविली.
सानिया मध्ये नेमबाजी क्रिडेसाठी अत्यावश्यक असलेल्या अमूल्य गोष्टी : नेमबाजी क्रिडेमध्ये दिव्य यश प्राप्त करण्याची दृढ इच्छाशक्ती, ही इच्छाशक्ती सिद्ध करण्यासाठी जरूर असलेली तपस्या, अथक मेहनतीची तयारी, गुरुंच्या मार्गदर्शनाचा सखोल अभ्यास, अचूक संधान व वेध, मनाची एकाग्रता आणि तीक्ष्ण दृष्टी, या सोबतच सानियाला, ज्यांचा क्रियाशील पाठींबा मिळाला अशा व्यक्ती : उपरकर शूटींग रेंज, वेंगुर्ला या नामांकित क्रिडा प्रशिक्षण संस्थे कडून लाभलेले सुयोग्य प्राशिक्षण, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. विक्रम भांगले यांचे योग्य मािर्गदर्शन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सानियाचे आई-वडील यांचे आशीर्वाद आणि मौलिक पाठबळ.
सानियाच्या या नेमबाजी स्पर्धेतील यशामुळे साऱ्या वेंगुर्ला तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवाळी पूर्वीची कौतुकरुपी आतिषबाजी सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शुटींग असोसियेशन, तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक यांच्या कडून मिळालेले उत्स्फूर्त सहकार्य व शुभेच्छा. हा अपूर्व सोहळा जल्लोषात साजरा होतोय.
ज्या खेळाने सानियाला हे घवघवीत यश मिळवून दिले त्या खेळाबद्दल थोडी माहिती असावी तरच या खेळामागील स्पर्धकाचे या खेळासाठी वाहिलेले श्रम आणि श्रद्धा अधोरेखित होतील.
नेमबाजी खेळाचा इतिहास- या खेळाचा उगम धनुर्विद्येपासून झाल्याचे मानले जाते. पूर्वी धनुष्य बाणाचा उपयोग करून हा खेळ खेळला जात होता. परंतु आधुनिक काळात रायफल आणि पिस्तुलीच्या सहाय्याने खेळला जातो. या खेळात ठराविक अंतरावर लक्ष्य दिलेले असते, ज्यावर नेमबाजाला अचूक नेम साधावा लागतो. या खेळाची सुरुवात 15-16 व्या शतकात युरोप देशात झाल्याचे समजते. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीचा समावेश 1896 सालच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेपासून झाला आहे.
नेमबाजी खेळाचे ऑलिम्पिक मधील प्रकार- या खेळाचे पुरुषांसाठी 9 प्रकार आणि महिलांसाठी 6 प्रकार आहेत. हे प्रकार नेमबाजीसाठी वापरली जाणारी बंदूक, नेमबाजाची स्थिती आणि अंतर यांनुसार पाडलेले आहेत.
बंदुकी वरून पडलेले प्रकार-
रायफल शूटिंग : यामध्ये नेमबाजाला 50 मी. आणि 10 मी. एअर रायफलने लक्ष्यावर नेम साधावा लागतो.
पिस्टल शूटिंग : यामध्ये नेमबाजाला 25 मी. रॅपीड फायर आणि 10 मी. एअर पिस्टलने लक्ष्यावर नेम साधावा लागतो.
शारीरिक स्थितीवरून पडलेले प्रकार-
उभे राहून (Standing Position)
गुडघ्यावर बसून (Kneeling Position)
झोपून (Prone Position)
वरील दोन्ही प्रकारांत लक्ष्य हे एका जागेवर स्थिर असते.
शॉटगन शूटिंग : या प्रकारामध्ये लक्ष्य हे हवेत उडविले जाते व नेमबाजाला त्यावर नेम साधावा लागतो. शॉटगन शूटिंगचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात.
ट्रॅप : यामध्ये लक्ष्य हे एकाच ठिकाणाहून हवेत उडविले जाते आणि नेमबाजाला त्यावर नेम साधावा लागतो.
स्कीट : यामध्ये लक्ष्य हे उजवी आणि डावी कडून हवेत उडविले जाते आणि नेमबाजाला त्यावर नेम साधावा लागतो.
नेमबाजी खेळामध्ये दिले जाणारे गुण :
या खेळामधील लक्ष्य हे अनेक वर्तुळांनी बनलेले असते. ही वर्तुळे केंद्राकडे लहान होत जातात. केंद्रावर नेम साधल्यास पूर्ण गुण दिले जातात. तसेच केंद्रापासून जितके दूर नेम साधला तेवढे गुण कमी मिळतात.
भारतात नेमबाजीची स्पर्धा- नॅशनल रायफल असोशिएशन ऑफ इंडिया आयोजित करते. ह्या संस्थेची स्थापना, 1951 साली, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जी. व्ही. मालवंकर यांनी, जनते मध्ये या खेळाबद्धल प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने केली. मालवंकर यांचे नंतर गोविंद वल्लभ पंत, लाल बहादूर शास्त्री आदींनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
या क्रिडा प्रकारामध्ये शारिरीक व मानसिक क्षमते सोबतच या क्रिडा प्रकारामधील काही आवश्यक बाबींकडे आवर्जून लक्ष केंद्रित करावे लागते. उदा. बंदूक वजन, त्याची योग्य आणि वेळच्या वेळी करावी लागणारी देखभाल, आवश्यक असणारा ड्रेस कोड, शूज, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचे नियम इ.
नेमबाजी स्पर्धेत सहभागी आणि यशस्वी झालेले नामांकीत काही भारतीय खेळाडू : अभिनव ब्रिंदा, जसपाल राणा, जीतू राय, अपूर्वी, अंजली भागवत, मनू भाकर, श्रेयसी सिंग, राही सरनोबत इ.
सरते शेवटी सानियासाठी व तिच्या यशाच्या अभिप्रायासाठी आशीर्वादपर चार शब्द :
महाराष्ट्राच्या मातीमधून छत्रपती शिवरायांसारखे दैदिप्यमान राजे जन्मास आले आणि जिजाऊ, मनकर्णिका राणी लक्ष्मीबाई, सारख्या विरांगना, आहिल्या बाई होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, सारख्या अगणित समाज व्रती जन्मास येऊन महाराष्ट्राचा इतिहासातील प्रत्येक पान सुर्वणाक्षरांत लिहिले गेले.
या इतिहासाची कास धरून अलिकडच्या काळात देखील, अनाथांची माई-सिंधुताई, चाळीसगावची अंतराळ संशोधिका स्वीटी पाटे, संगीत-साहित्य क्षेत्रामधील शांता शेळके, लता दिदि, क्रिडा क्षेत्रा मधून सावरपाडा एक्सप्रेस- कविता राऊत, श्वेता सावंत, सरोजिनी गोगटे, अशा असंख्य महिलांनी या महाराष्ट्राच्या वर्तमानाला सुवर्ण किरणांची झळाळी दिली.
ही शृंखला इथेच थांबली नाही तर अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब, पॉवर लिफ्टर संपदा नागवेकर, रोलर स्केटींग मधील रिना परब अशा मुलींनीही महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले.
महाराष्ट्राच्या अशा खेळ-रत्नांच्या मालिकेत गेल्याच आठवड्यामध्ये अजून एक माणिक गुंफले गेले व त्या माणिक मोत्याचे नाव-मूळ गाव, मु. भरणी- कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, सद्यस्थितीत ठाणे येथील रहिवासी, तृप्ती आबाजी सावंत! आणि आत्ता या विवेचना द्वारे उमललेली नवीन क्रिडा तारका : सानिया सुदेश आंगचेकर.
एक काळ असा होता, जेव्हा प्रत्येक कुटुंबामध्ये “कुलदिपक“ जन्मावा म्हणून नवस-सायास केले जात होते. या वंशाच्या दिव्याने कुटुंबाचा वृक्ष सदैव बहरत ठेवावा म्हणून प्रत्येक पालक प्रार्थना करीत असे. हे चित्र आजही थोड्या फार प्रमाणात दिसते. परंतु गेल्या काही काळापासून या विचारांना सद्सद्विवेक बुद्धिचे अवरोधक रोखताना आढळत आहेत. मुलगा अथवा मुलगी ह्या फरकाला कालौघात, विवेकी समाज फारकत घेताना दिसत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली, मुलांच्या बरोबरीने किंबहुना काही बाबतीत वरचढ यश मिळविताना दिसतात. आणि म्हणूनच सानियाची ही विजयश्री अख्ख्या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाच्या मुलांना प्रेरणादायी आहे.
सानिया, तुला, भविष्यामधील, क्रिडा तथा शिक्षण क्षेत्रातील तसेच तुझ्या मनातील समस्त स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि उदंड आशीर्वाद!
-आनंद ग. मयेकर, ठाणे,
9930243943