मुखी घास घेता करावा विचार

      “अरे रोहन, थांब! लगेच वेफर्सचं पाकीट कशाला फोडतोयस? माझा स्वयंपाक झालाय म्हणतेय ना? फक्त पानं घ्यायची आहेत.“ माधवी अगदी काकुळतीला येऊन म्हणाली.

  “मामी, मी करतो तुला पानं घ्यायला मदत. रोहन, राधिका मला दाखवा बरं, ताटं, वाट्या, भांडी कुठे असतात?“ केदार तत्परतेनं माधवीच्या मदतीला आला.

  “दादा मला भूक लागली आहे. मी आत्ता काम करण्याच्या मूडमधे नाही.“ रोहन धुसफुसत म्हणाला..

  “अरे भूक लागली ना? मग… मुखी घास घेता करावा विचार.“ केदार हसत म्हणाला.

  “तुझ्या त्या वेदपाठशाळेतले फंडे इथे ऐकवू नको रे! बोअर! भूक लागल्यावर कसला आलाय विचार?“ रोहन.

  “तुला साधे बूट घ्यायचेत, तर कालपासून त्यावर चर्चा करतो आहेस.जेवताना नको विचार करायला?“ दादानं विचारलं.

  “हे बघ दादा, बुटांची गोष्ट वेगळी असते. ते वर्षभर तरी टिकवावे लागतात. नाहीतर आईबाबा ओरडतात.“

  “मग आपण खाल्लेल्या अन्नावर पोसलं जाणारं हे शरीर किती वर्ष टिकवायचं असतं?“ दादाच्या या गुगलीवर रोहन चमकला. माधवी त्यांच्याकडे पाठ करून गालातल्या गालात हसत होती.

  “सांग की! किती वर्ष?“ दादानं परत विचारलं.

  “मला तरी पणजोआजोसारखं शंभर वर्ष जगायचं आहे.“ राधिका उत्तरली.

  “मग कचरा खाऊन जगता येतं का शंभर वर्ष?“ दादाचा थेट प्रश्‍न.

  “कचरा?“ राधिकाचा चेहरा आश्‍चर्यचकीत झाला. “जंक शब्दाचा अर्थ काय आहे? कचराच ना? जंक फूड म्हणजे कचरा, जो तुम्ही अन्न म्हणून खाता.“

  “खरंच की रे दादा!“

  “म्हणून म्हणालो, मुखी घास घेता करावा विचार.“ दादा म्हणाला..

  “नक्की काय विचार करायचा रे केदार? मला प्रश्‍न पडलाय म्हणून विचारतेय हं.“ माधवीनं चर्चेला चालना दिली.

  एका बाजूला ताटं वगैरे पुसून ती मांडत केदार म्हणाला, “सगळ्यात पहिला विचार म्हणजे आपल्याला भूक लागली आहे का हे बघायचं. भूक असेल तरच खायचं. नाहीतर कितीही आवडते पदार्थ समोर आले तरी तोंड उघडायचं नाही. कारण भूक असेल तरच अन्न नीट पचेल आणि त्याचं रुपांतर शरीराला हवं तसं करता येईल.“

  “हो, नाहीतर आपण काल चुपके चुपके बघत होतो, त्यातल्या धर्मेंद्रसारखं व्हायचं. इकडे पोट बिघडलंय, डॉक्टर घरी बोलावलेत आणि त्यांची पाठ वळतेय न वळतेय तोच हा समोरचं सफरचंद खायला घेतोय…“ आजी पण संवादात सामील झाली. सगळे हसले.

  “दुसरी गोष्ट म्हणजे आपले हातपाय, ताटवाटी, जेवायची जागा हे सगळं

स्वच्छ असावं. त्यामुळे रोगराई पसरत नाही.“ दादा म्हणाला.

  “हो, हे आम्हाला शाळेत शिकवलं आहे.“ रोहन.

  “तिसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक, घरी शिजवलेले, ताजे पदार्थ खावे. “ दादा म्हणाला.

  “पारंपरिक म्हणजे?“ राधिकाच्या या प्रश्‍नावर दादाचे डोळे चमकले.

  “म्हणजे पणजोआजो जे खातात ते! कारण तेच पदार्थ खाल्ल्यानं पणजोआजो शंभर वर्ष जगले ना? hence proved की तेच खाऊन शंभर वर्ष जगता येतं.“ केदार म्हणाला.

  “पण पणजोआजो तर बाहेरून आणलेले कुठलेच पदार्थ खात नाहीत. आईस्क्रीम, पिझ्झा, बिस्कीट, वेफर्स, चॉकलेट काहीच नाही. मोदक लाडू देखील घरी आईनं किंवा आजीनं बनवले तरच खातात. नाहीतर आमटी, भात, भाकरी, पोळी, भाजी, कोशिंबीर, चटणी, ताक… मोरावळा लागतो त्यांना रोज! पण सणासुदीचे पदार्थ खातात बरं का आवडीनं. गणपतीत मोदकांवर मस्त ताव मारतात. त्या त्या सणाला तो पदार्थ करणार ना म्हणून आदल्या दिवशीच विचारतात.“ रोहन म्हणाला.

  “तोच पुढचा नियम आहे. आपल्या सणासुदीला होणारे सगळे पदार्थ त्या त्या वेळी खावे. ते आरोग्याचा विचार करून ठरवले आहेत. संक्रातीला तिळगुळ, कोजागिरीला आटवलेलं दूध, चैत्रात आंब्याची डाळ…” राधिकानं सांगितले.

  “मला आधी हे सगळं आवडत नव्हतं. पण आजीनं सवय लावली. आता मी पण या सगळ्या पदार्थांची वाट बघत असतो.“ रोहन म्हणाला.

  “पुढचा नियम म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढंच अन्न आधी पानात वाढून घ्यावं. टाकून देऊ नये. आणखी हवं असेल तर पुन्हा घेता येतं. जेवताना लक्ष फक्त जेवणाकडे असावं. टीव्ही, मोबाईल, गप्पा सगळं बंद. मौन पाळावं. म्हणजे आपण तृप्त होतो आणि अन्न चांगलं पचतं.“

  “पण मग शेवटी स्वीट डीश खाताना तरी टीव्ही वगैरे चालेल ना?“ रोहन म्हणाला.

  “आपल्याकडे स्वीटडीश शेवटी नाही, आधी खातात. एक सांग, तुम्हा मित्रांना कुठले विषय अवघड वाटतात आणि कुठले सोपे?“

  “काहींना गणित, काहींना इंग्रजी तर काहींना शास्त्र अवघड वाटतं. त्यामानाने मराठी, हिंदी, चित्रकला सोप्पं.“

  “मग शाळेत अवघड विषयांचे तास कधी शेवटी असतात का? कारण तुम्ही कंटाळलेले असता तेव्हा अवघड विषय समजेल का? तसंच जेवण पचवून दमलेल्या पोटाला जड, गोड पदार्थ पचवायला देऊन कसं चालेल? सुरवातीला फ्रेश असतानाच अवघड काम करून घ्यायचं. “

  “खरंच की! पण दादा, हे सगळं तुला कसं माहीत?“ रोहनला प्रश्‍न पडला.

  “अरे. आम्हाला वेदपाठशाळेत एका वर्षी अष्टांगहृदय नावाचा आयुर्वेदाचा ग्रंथ होता अभ्यासाला. त्यात होतं.“ दादा म्हणाला.

  “चला, बसा जेवायला. माझी पानं वाढून झालीत.“ आई म्हणाली. “अजून काय काय सांगितलं आहे आयुर्वेदात? भारी आहे रे! आम्हाला असलं काही शिकवत नाहीत.“ राधिकाला उत्सुकता वाटली.

  “खूप काही आहे. तुम्हाला नंतर सांगेन.“ दादा जेवायला बसत म्हणाला. पण आत्ता मांडी घालून जेवायला बसायचं आणि मौनात जाण्याआधी प्रार्थना म्हणायची. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही प्रार्थनाच आपल्याला शक्ती देते. चला म्हणा… वदनी कवळ घेता…“ रोहन आणि राधिका डोळे मिटून प्रार्थना म्हणू लागले. आई आणि आजी न जेवताच तृप्त झाल्या.

– वैद्य सुचित्रा कुलकर्णी.

ठाणे. 9322790044.

Leave a Reply

Close Menu