वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती-
‘अरे मी योग्य ठिकाणी आलोय ना…’ मनातल्या मनात स्वत:लाच प्रश्न विचारत अस्मादिकांनी शांतादुर्गा भोजनालयात प्रवेश केला. वेंगुर्ले शहरातील जुन्या पध्दतीचे एक घर, त्या घरातच सासू-सून जोडगोळी संचलित करत असलेले हे भोजनालय. रत्नागिरीच्या एका वाचकाने मला शिफारस केली म्हणून मी या भोजनालयाला भेट देण्याचे निश्चित केले. पिराचा दर्गा कडून बंदराच्या दिशेने पुढे जाताना जुन्या पंचायत समिती इमारतीच्या बाजूलाच हे भोजनालय आहे. दारात दुचाकी पार्क करून आत शिरताना भोजनालयाची पाटी व्यतिरिक्त इथे कुठे जेवण मिळत असेल याची चिन्ह दिसत नव्हती. आत मध्ये दोन टेबले आणि खुर्च्या मांडलेल्या पाहिल्या आणि मी माझ्या सौसह आत मध्ये प्रवेश केला. काही मिनीटे आम्ही दोघेच आत उभे होतो, आम्ही हाक दिल्यावर आतून एक प्रौढ स्त्री बाहेर आल्या आणि मग लगबग सुरु झाली.
वेंगुर्ल्यातील हॉटेल्स, उपहारगृहे, भोजनालये, विविध खाद्यपदार्थ हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने ‘वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती’ ही लेखमाला सुरु करण्याचा माझा मानस होता. किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी हिरवा कंदिल दिला आणि अस्मादिकांनी खाद्य भ्रमंतीला सुरुवात केली. या लेखमालेची सुरुवात शांतादुर्गा भोजनालयाकडून सुरु होत आहे. हे भोजनालय वेंगुर्ल्यात गेली 10 ते 11 वर्षापासून सुरु आहे. जेव्हा रत्नागिरीच्या एका वाचकाने मला या भोजनालयाला भेट देण्याची शिफारस केली तेंव्हा प्रथमत: असे वेंगुर्ल्यात कुठे हॉटेल असल्याचे लक्षात येईना. गेली पंचवीस वर्षे मुंबईत स्थायिक होतो असल्याने कदाचित मला हे हॉटेल माहित नसावे. शेवटी त्याच वाचकाकडून या भोजनालयाचे लोकेशन प्राप्त करुन घेऊन प्रत्यक्ष भोजनालयाला भेट देऊन लेखन प्रपंचास सुरुवात केली. श्रीमती साई सचिन डिचोलकर त्यांच्या सासू श्रीमती चंद्रकला चं. डिचोलकर यांच्या सहकार्याने घरखर्चाला हातभार लागावा म्हणून मोठ्या जिद्दीने हे घरगुती स्वरुपाचे भोजनालय चालवतात. साईचे पती आपला कामधंदा सांभाळून त्यांना या व्यवसायात मदत करत असतात. घरचेच मसाले आणि पिढी दर पिढी चालत आलेली स्वयंपाक करण्याची पध्दत वापरुन रुचकर जेवण ग्राहकांना देण्याकडे या सासू-सून जोडगोळीचा कल असतो. घरगुती मसाले वापरल्याने स्वयंपाकाला अगदी घरगुती जेवण्याचा स्वाद येतो आणि हेच घरगुती मसाले त्यांनी विक्रीसाठीही उपलब्ध ठेवले होते.
अस्मादिकांनी या भोजनालयाला भेट दिली त्यादिवशी त्यांचेकडे अनिरुध्द बापूंच्या पादूकांचे पूजन असल्याने केवळ शाकाहारी जेवणच उपलब्ध होते. माझ्या सौ चा मार्गशीर्ष आणि अस्मादिकांची तब्येत थोडी नरम-गरम असल्याने हे आमच्या पथ्यावरच पडले होते. साई मॅडमशी थोडीशी वार्तालाप केल्यावर काही वेळातच जेवणाचे ताट समोर आले. अगदी मालवणी पध्दतीचे शुध्द शाकाहारी जेवण, ज्यात श्रीखंड-पुरी, हिरव्या वाटाण्याची सुकी ऊसळ, कोबीची भाजी, दाळ-भात, लोणचे, सोलकढी, बटाटाच्या काचऱ्या सोबत साऊथ इंडियन पध्दतीचे गोड अप्पन असा फक्कड बेत होता. सोबत अजून काय हवे म्हणून धरलेला आग्रह, पण पुढ्यात वाढलेले जेवणच एवढे भरपेट होते की एक्स्ट्रा काही घेण्याची गरजच भासली नाही.
जेवण रुचकर होते, आम्ही जेवत असताना दोन-तीन स्थानिक गिऱ्हाईके पार्सल घेऊन गेली. दोन गिऱ्हाईके जी बहुतेक मुंबईची असावीत त्या दिवशी नॉनव्हेज जेवण उपलब्ध नसल्याने परत गेली. (मालवणी पध्दतीचे नॉनव्हेज जेवण हे या भोजनालयाची खासियत, परंतु उपरोक्त नमुद कारणाने आज रविवार असून सुध्दा नॉनव्हेज उपलब्ध नव्हते.) या व्यतिरिक्त मी असताना या भोजनालयात गिऱ्हाईकांची फारशी काही रेलचेल दिसून आली नाही. हॉटेलच्या संचालिका साई मॅडम यांनी हॉटेलात बरेच चाकरमानी जेवायला येतात, जेवणाची तारिफही करतात मात्र भोजनालयाला पब्लिसिटी मिळत नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात गिऱ्हाईक नसल्याची खंत व्यक्त करतात. या भोजनालयात वेंगुर्ल्याला भेट देणारे पर्यटक, मुंबईचे चाकरमानी हेच केवळ जेवायला येतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे रास्त भावात मिळणारे रुचकर घरगुती जेवण. काही आसपास राहणारे पार्सलही घेऊन जातात.
भोजनालयात शाकाहारी जेवणा व्यतिरिक्त फिश थाळी, चिकन थाळी केवळ 80 ते 120 रुपयांपर्यत मिळते. मोठा मासा (म्हणजे सुरमई, सरंगा, पापलेट वगैरे) पाहिजे असेल तर हा दर माश्यांच्या बाजार भावानुसार जास्तीत जास्त दोनशे रुपयांपर्यत जातो. याशिवाय ऑर्डरप्रमाणे नाष्टाही उपलब्ध करून दिला जातो. सासू-सून जोडगोळी मोठ्या जिद्दिने चालवत असलेले हे भोजनालय या लेखाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचल्यास या लेखमालेचे यश म्हणता येईल.
आजकाल विविध वाहिन्या, यु-ट्यूब या सारख्या माध्यमातून विविध भागातील खाद्य पदार्थ फुडीज खवय्यांपर्यंत पोहचवितात. अस्मादिकांनी मात्र या लेखमालेच्या माध्यमातून वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती खवय्यांपर्यंत पोहचविण्याचा विडा साप्ताहिक किरातच्या माध्यमातून घेतला आहे. या पुढेही वेंगुर्ल्याची खाद्य-भ्रमंती अशीच चालू राहणार असून वेंगुर्ल्यात मिळणारे नाना विविध खाद्य पदार्थ, भोजन, त्यांची ठिकाणे, विक्रेते, भोजनालय-उपहारगृह यांचे संचालक, बल्लवाचार्य यांची थोडक्यात माहिती आपल्या समोर रंजक पध्दतीने मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– संजय गोविंद घोगळे, 8655178247