आनंदयात्री

         ‘वेंगुर्ल्याचा सुपूत्र’ ही मानाची उपाधी कधी माझ्या नावाच्या आधी लागली हे कळलेच नाही. आज याच वेंगुर्ल्याच्या सुपूत्राचा वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात लेखक म्हणून सन्मान करण्यात आला.

      या सन्मानास मी पात्र ठरलो, एवढे माझे कार्य आहे याची खरंतर मला कल्पनाच नव्हती. याच संमेलनात इतर सन्मानार्थींची नावे बघून एवढ्या मोठ्या सन्मानाचा स्विकार करताना प्रथमत: मला फार मोठे दडपण आले. वेंगुर्ल्यात किंवा इतत्र कुठेही बाहेर फिरताना मला अनेक वाचक माझे लिखाण वाचल्याने मला ओळखत दाखवत होते आणि संमेलन स्थळी सुद्धा मला स्वत:हून कुणाला माझी ओळख सांगावी लागली नाही आणि माझे दडपण थोडे कमी झाले. आता मला लिखाण करताना अधिक जबाबदारीने करावे लागेल याचे मात्र भान ठेवावे लागेल.

      मागच्या महिन्यात शासकीय सेवेतील कार्याबद्दल मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे हस्ते पुरस्कार देऊन माझा सत्कार करण्यात आला होता. खरंतर ‘महा आवास अभियान’ हा शासकीय पुरस्कार मला मागच्याच वर्षी जाहिर झाला होता, परंतु काही अडचणींमुळे ता कार्यक्रम लांबला. शिवाय असा काही पुरस्कार मला मिळणार याची मी कुठे वाच्यताही केली नव्हती. दरम्यान गेल्याच महिन्यात मला किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी फोन करुन या साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी निमंत्रीत केले व या सन्मानासाठी माझ्या नावाची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले, परंतु या कार्यक्रमाची भव्यतेची मला अजून कल्पना आली नव्हती. या सन्मानासाठी मला पात्र समजल्याबद्दल आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा सुप्रसिध्द लेखिका मा. श्रीमती वृंदा कांबळी आणि समितीचे इतर सदस्य यांचे मुख्यतः आभार. मुख्यत: माझ्या नावाची शिफारस करणाऱ्या सीमा मराठे यांचे आभार. केवळ 17 ते 18 दिवसांच्या कालावधीत अस्मादिकांना दोन पुरस्कार / सन्मानाने गौरव स्विकारण्याचे भाग्य लाभले.

      लेखक म्हणून त्रैवार्षिक साहित्य संमेलनात करण्यात आलेला हा सन्मान माझा एकट्याचा नसून देश विदेशात पसरलेल्या समस्त वेंगुर्लेकर रसिकांचा आहे. संमेलेनस्थळी गप्पा मारताना पत्रकार आणि माझा जुना सहकारी/मित्र के. जी. गावडे यांने बोललेले वाक्य मी इथे अधोरेखित करतोय ‘वेंगुर्ल्यातील ऐशी टक्के लोकांनी गरिबीचा अनुभव घेतलाय आणि तुझ्या लेखनात त्यांनी स्वत:ला पाहिले’. माझ्या लेखनाला लोकप्रियता मिळण्याचे हेही एक मोठे कारण आहे. लेखनातील माझी शैली मला अशीच पुढे चालू ठेवायची आहे, सध्या मोठा ब्रेक घेतलाय, पुन्हा जोमात तुमच्या समोर येणार आहे. अर्थात लेखनात तोच तोच पणा येवू नये याची दक्षता घेऊनच.

      खरतर माझा स्वभाव खूपच मितभाषी, परंतु संमेलनस्थळी प्रा. आनंद बांदेकर सर आणि डॉ. संजीव लिंगवत हे सर्व सन्माननीय व्यक्तींशी माझी ओळख करुन देत होते. त्यांचे माझ्या बद्दलचे प्रेम बघून मी अचंबित झालो, कारण यापूर्वी मी वैयक्तिक त्यांना कधीच भेटलो नाही. भेटलो असेन तर ते माझ्या लेखनातून आणि व्यंगचित्र यांच्या माध्यमातून. डॉ. लिंगवंत सर आणि सीमा मराठे यांच्या आग्रहाखातर ‘संजयची चावडी’ या माझ्या मालवणी व्यंगचित्रांचे प्रदर्शन ठेवण्यास मी होकार दर्शविला. प्रा. सचिन परुळकर यांनी या प्रदर्शनाची सर्व व्यवस्था पाहिली आणि प्रदर्शन उत्तमरित्या पार पडले. रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तरुणाई या व्यंगचित्रांसोबत सेल्फी काढत होती, ज्येष्ठ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला दाद देत होता.

      एकंदर संमेलनाचा कार्यक्रम दृष्ट लागण्याजोगा अप्रतिम झाला. रसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. रसिक संमेलनाच्या शेवटापर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेखिका वृंदा कांबळी मॅडम, उद्घाटक मा. डॉ. विनोद गायकवाड, स्वागताध्यक्ष मा. रघुवीर उर्फ भाई मंत्री, अध्यक्ष मा. कृष्णात खोत यांचे साहित्यिक विचार आम्हाला ऐकता आले, हा अनुभव स्मृतीच्या कोपऱ्यात कायमच ठेवण्याजोगा होता. शिवाय रंगतरंग कार्यक्रमात मराठी साहित्य व लोकसाहित्य यांचे अनुबंध स्पष्ट करणारा रंजनात्मक कार्यक्रम, ओव्या, वासूदेव, भजन, भारुड, लावणी, पोवाडा आणि वारकरी नृत्य यांचे सादरीकरण याचे वर्णन केवळ उत्तम म्हणता येणार नाही तर दर्जेदार सुध्दा होते. सीमा मराठे यांनी सादर केलेला नाट्यप्रवेश, कवी संमेलन हे एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम रसिकांची दाद घेऊन गेले.

      हे यशस्वी संमेलन करण्यामागे आनंदयात्री वाङ्मय मंडळ तसेच सहयोगी आयोजक सातेरी प्रासादिक संघ, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, वेताळ प्रतिष्ठान, किरात ट्रस्ट आणि माझा वेंगुर्ला यांचे फार मोठे परिश्रम होते. तसेच वर्गणीच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावणारे बहुसंख्य वेंगुर्ला व साहित्यप्रेमी यांचेही आशीर्वाद होतेच.

      माझ्या सन्मानाबद्दल आणि आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल तसेच माझा मित्र वर्ग आणि परिवार यांनी समारंभाला उपस्थित राहून, माझे अभिनंदन केले त्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार.

– संजय गोविंद घोगळे,

8655178247

Leave a Reply

Close Menu