जगण्याची लढाई

       ते हॉटेल तसं प्रसिद्ध!! अनेक प्रसिद्ध व्यक्ती, कॉलेज तरुण तिथे असायचेच! आम्ही सगळे एका टेबलशी बसलो. त्या हॉटेलमधे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष एका कोपऱ्यात बसलेल्या कुटुंबाकडे वारंवार जात होते असं लक्षात आलं. कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी ही त्या कोपऱ्यातून येणारे आवाज लक्ष वेधून घेत होते. सगळेजण त्यांच्याकडे बघून कुजबुजत होते, हसत होते.

      आम्ही कॉलेजला जाणारे, सगळेजण मस्तपैकी गप्पा मारत, समोरच्या पदार्र्थांचा आस्वाद घेत होतो, सगळीजण त्या कोपऱ्याकडे बघताहेत हे आमच्या लक्षात आले होते. म्हणजेच तिकडे काहीतरी ‘खास असणार’ अशा अपेक्षेने राहूल उठला आणि डोळा मारीत म्हणाला, ‘जरा जाऊनच बघतो’ आम्ही ही राहुलला टाळी देऊन “Best of luck लेका कोण दिसतंय ते लगेच सांग,“ असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या. जरासा जपून हं! असाही इशारा दिला.

      ज्या उत्साहाने राहुल गेला तितक्याच त्वरेने परत आला. त्याचा चेहरा काही वेगळाच दिसत होता. “अरे, त्या मुलाची अवस्था हॉरिबल आहे रे, ऐवढा मोठ्ठा मुलगा आणि लाळ गळतेय त्याची, आई त्याला भरवतेय रे! त्याचा चमचाही वेगळाच आहे. बापरे भयंकर आहे सगळं!“ असं मोठ्यांदा म्हणाला ते ऐकून आम्ही उडालोच! “पण असं कसं होऊ शकतं? आणि मग काय नडलंय अशा मुलाला हॉटेलमधे आणायचं? कमाल आहे आईबापाची! त्यांना नको कळायला? अशा मुलाला कशाला बाहेर घेऊन यायचं?” जरा मोठ्यानंच रंजन म्हणाला. “हो ना खरंय तुझं, उगाच टेबल अडवून ठेवलंय कधीचं, अशा लोकांनी ना शांतपणे घरी बसावं!” इति सुनील “अरे काय बोलताय आणि केवढ्यांदा, त्यांना ऐकायला जाईल ना!“ मी म्हणालो. “म्हणजे बोलायचंय तुला, पण फक्त हळू आवाजात असंच ना?“ रंजन म्हणाला. “तसं नाही, पण काहीतरी कारण असेल रे, नाहीतर अशा मुलाला मुद्दाम कोण हॉटेलमधे आणेल? किती अंगावर सांडतंय त्याच्या आणि स्वतःच्या हाताने धड खाताही येत नाहीये त्याला” राहुल म्हणाला. आम्ही हे बोलतच होतो तोवर 3 टाळ्या आणि पाठोपाठ माईकवरून एक ‘अनाउन्समेंट’ कानावर आली. “कृपया आपली पाच मिनिटे मला मिळू शकतील का? मला तुमच्याशी काही बोलायचंय.“

      आम्हीच काय सगळ्याच टेबलवरचे हात आणि तेोंडं दोन्हींचे आवाज थांबले, सगळे उत्सुकतेने ऐकायला लागले.

      “मी मानसी दांडेकर! आज माझ्या मुलाचा, कौस्तुभचा 21 वा वाढदिवस आहे. आमच्या आनंदात तुम्हीही सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि कौस्तुभला शुभेच्छा द्याव्यात अशी माझी इच्छा आहे. व्हाल का आमच्या आनंदात सहभागी? म्हणाल का Happy Birthday माझ्या कौस्तुभला?“

      आम्ही सगळयांनी Happy Birthday चा गजर केला. एखाद्याच्या आनंदात सहभागी व्हायला काय हरकत आहे. या विचाराने असेल किंवा त्या कौस्तुभकडे बघून असेल.

      ‘थॅक यू (थँक्यू)’ असे म्हणाल्यासारखा एक आवाज जेमतेम ऐकू आला. सगळ्यांच्या नजरा कौस्तुभवर स्थिरावल्या. तो तोच होता! व्हिलचेअरवर बसलेला, लाळेरं गळ्यात बांधलेला, दोन्ही हात नमस्कारासाठी जोडण्याचा प्रयत्न करणारा! त्याच्या समोरचा सजवलेला केक त्याच्या बाबांनी त्याच्या हाताला धरून कापला. माझे डोळे कौस्तुभवर खिळले होते, त्याच्या डोळयांतून आनंद ओसांडत होता, खूश दिसत होता तो!

      “थँक्स, माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल! आम्ही हॉटेलमध्येे कौस्तुभला घेऊन आल्यापासून प्रत्येक टेबलवरच्या आमच्याकडे बघणाऱ्या नजरा मला जाणवताहेत, हे आजचंच नाही. कौस्तुभच्या जन्मापासून गेल्या 21 वर्षांचा हा अनुभव आहे.

      आमच्या कौस्तुभला सेलेब्रल पाल्सी म्हणजेच मेंदूचा पक्षाघात झाला आहे. म्हणजे आपल्या मेंदूचा जो भाग हालचालींचं नियंत्रण करतो त्या भागाला इजा झाली आहे आणि म्हणून त्याच्या हालचाली, त्याचा तोल, शरीर स्थिती आणि त्याची वाचा या सर्र्वांवर परिणाम झालाय, ही त्याला जन्माच्यावेळी पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे निर्माण झालेली  स्थिती आहे. ही कोणत्याही औषधांनी बरी होणारी अवस्था नाही. हे कोणाच्याही वाट्याला येऊ शकतं, असो.

      आज आमच्या कौस्तुभने 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण केलीय आणि त्याचा वाढदिवस या दोन्हीचं सेलिब्रेशन म्हणून आम्ही हॉटेलमधे आलोय. तुम्ही सगळे आमच्या आनंदात सामील झालात त्याबद्दल धन्यवाद!“

      आम्ही सगळे ऐकतच राहिलो, मी पटकन त्याच्याकडे गेलो, कौस्तुभला शुभेच्छा दिल्या आणि त्यांना म्हणलं, “मला याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल, तुम्हाला वेळ असला तर बोलू या का?“

      आमच्या टेबलाशी ते तिघेही आले आणि मानसीतार्ईंनी बोलायला सुरूवात केली, “कौस्तुभच्या जन्माच्यावेळी नाळ त्याच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली होती. प्रसुतीला खूप वेळ लागला. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. या सगळ्यांमुळे त्याच्या पक्षाघाताची स्थिती निर्माण झाली. सुरुवातीला खूप वाईट वाटलं, माझ्याच वाट्याला हे का? असेही वाटलं पण मग फिजिओथेरपिस्ट, ऑक्यूपेशनल थेरपिस्टच्या मदतीने आम्ही ठरवलं की आपला वेळ, शक्ति आणि प्रयत्न अधिकाधिक विधायक दिशेने करायचे, कौस्तुभच्या पूर्ण क्षमतेचा, पूर्ण कार्यशक्तिचा उपयोग करता यावा यासाठी वेळ द्यायचा आणि मग आमचे अथक प्रयत्न सुरू झाले.

      त्याला सगळं समजत, तो जे बोलतो तेही दुसऱ्याला सहवासाने कळतं, त्याला बातम्या पहायला आवडतात, तो वाचतो. आता मी सांगितलं तसं तो 12 वी उत्तीर्ण झालाय. त्यासाठी लेखनिकाची (रायटरची) मदत त्याला मिळाली. आमचा हा सगळाच प्रवास खूप खडतर होता. अनेकदा प्रयत्न केल्यावरही प्रगती खूप कमी दिसायची. तेव्हा आम्ही ही हताश व्हायचो, काय करावं ते सुचायचं नाही, तेव्हा कौस्तुभचं हसणं आम्हांला बळ द्यायचं. बाहेर कुठेही गेलो तरी सगळ्या लोकांच्या नजरा आम्हाला अस्वस्थ करायच्या, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की त्या नजरांना घाबरून जर आम्ही गप्प बसलो, कौस्तुभला कुठेच घेऊन गेलो नाही तर त्याचं ही नुकसान होईल, त्याला समाजात कसे वावरायचे हे कळणार नाही, इतरांत मिसळणे जमणार नाही आणि त्याला सभोवतालची जाणीव ही होणार नाही. त्याच्या निमित्ताने आम्हांला समाजाला अपंगत्वाबद्दल सांगता येईल. त्यामुळे गेली 15 वर्ष आम्ही त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला, त्याची छोटी छोटी बक्षिसं सेलिब्रेट करायला असेच बाहेर जातो. सगळ्यांशी या विषयावर बोलतो, हे अपंगत्व असलेली मुलं बौध्दिकदृष्ट्या कमी जास्त असू शकतात, त्यांना कामं करायला वेळ लागतो, त्यांच्या शारीरिक अक्षमता कशी आहे म्हणजे एका हाता/पायावर परिणाम झालाय की दोन्हीवर झालाय? एकाच बाजूच्या हाता पायांवर झालाय की दोन्ही बाजूंच्या किंवा दोन हात एक पाय, दोन पाय एक हात यामुळे विकल झालेत? की संपूर्ण शरीरावर, चेहऱ्यावर परिणाम झालाय त्यावरून त्याची गंभीरता ठरते.”

      बाबा म्हणाले, “जर कौस्तुभला आम्ही जागेत, मैदानावर, हॉटेलात नेलं नसतं तर त्याचा परिणाम त्याच्या वागणुकीवर झाला असता. आम्ही मनापासून त्याचा स्वीकार केलाय. सातत्यपूर्ण, संवेदनशीलतेने त्याच्याबरोबर वागत आलोय. त्यामुळेच तो वातावरणाशी नीट जुळवून घेऊ शकतोय. साधनाच्या वापरामुळे त्याचे कामकाज सुधारते आणि तो बाहेर जुळवून घेतोय. आम्हाला कल्पना आहे की हा प्रवास, ही लढाई अशीच कायम चालू राहणार आहे. यामध्ये इतरांनीही आम्हाला आधार देण्याची गरज आहे. कौस्तुभला स्वतःच्या पायावर उभे करण्याकरिता आम्ही प्रयत्न करतोच आहोत. त्याच्या हातांना जमेल तसे काम मिळविण्यासाठी आता समाजाकडून साथ हवी आहे.

      मी त्यांच्या बोलण्यात एवढा गुंतलो होतो की माझं कौस्तुभकडे लक्ष नव्हतं. आत्ता पाहिलं तर! तो मस्तपैकी राहुल आणि सुनीलशी काहीतरी गप्पा मारत होता आणि त्याचं बोलणं समजून घेतांना त्यांचीच पंचाईत होत होती!! म्हणजे खरे डिसेबल्ड कोण? कौस्तुभ की ते दोघं? माझ्या मनात विचार आला! मी मनोमन त्या कुटुंबाला सॅल्यूट ठोकला! सकारात्मक विचारांचं बळ माझ्या नव्याने लक्षात आलं होतं.

विद्या भागवत,

प्रिझम फौंडेशन संचलित,बेन्यू प्रशिक्षण केंद्र

 020- 25679714 / 09022941108

Leave a Reply

Close Menu