स्वयंशिस्तीचे अभिनव ग्रंथालय

पाच विद्यार्र्थ्यांची यशस्वी भरारी

      ग्रंथालयासाठी ना शासनाचे अनुदान; ना पगारी ग्रंथपाल तरीही विद्यार्र्थ्यांच्या स्वयंशिस्तीवर विद्यार्थ्यांनी विद्यार्र्थ्यांसाठी चालविलेले सावंतवाडीतील अनोखे ग्रंथालय म्हणजे “अभिनव ग्रंथालय“ आणि अभ्यासिका. अभिनव अभ्यासिकेत येणारे  सर्वसामान्य कुटुंबातील दोन विद्यार्थी पोलीस, एक विद्यार्थी चार्टड अकाऊंटंट, एक विद्यार्थी राष्ट्रीय बँकेचा विधी अधिकारी आणि एक विद्यार्थी टपाल विभागाचा  अधिकारी झाला आहे.

      अभिनवच्या अभ्यासिकेतील हे पाचही विद्यार्थी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत, हे विशेष. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत शिकणारी सावंतवाडी जिमखाना मैदान येथील सुचिता कांबळे ही अभिनवची विद्यार्थीनी आज पोलीस दलात प्रशिक्षण घेत आहे. घरची अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने तिला महागडे कोचिंग क्लास परवडणारे नव्हते. स्वयंअध्ययनाचा मार्ग दाखविणारी अभिनवची अभ्यासिका गरजू विद्यार्थ्यांसाठी सदैव खुली असायची, याची माहिती तिला मिळाली आणि तिची पावले अभ्यासिकेकडे वळली. तिथे काही विद्यार्थ्यांचा ग्रुप झाला. त्यातून ग्रुप डिस्कशन, शंका समाधान, शैक्षणिक साहित्याचे आदानप्रदान असा संवाद सेतू बनला. वैश्‍यवाडा सावंतवाडीचा आकाश कांबळे हा विद्यार्थी असाच अभिनव अभ्यासिकेत अभ्यास करत होता. कोविडमुळे संपूर्ण जग प्रभावित झाले होते. कोविडमध्ये लॉकडाऊनसारखा कठीण काळ उभा ठाकला;  तरी या विद्यार्थ्यांची जिद्द कायम होती. ते अजिबात डगमगले नाहीत. सोबतीला अभिनवची अभ्यासिका होतीच. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून हे विद्यार्थी अभिनवच्या अभ्यासिकेत येत.

      सुचिता आणि आकाश कांबळे हे दोन्ही विद्यार्थी कुटूंबातील होते. मात्र स्वप्ने बघायला आणि सत्यात उतरविण्यासाठी अपार मेहनत घ्यायला पैसे लागत नाहीत आणि हिच मेहनत घेत दोन्ही विद्यार्थ्यांनी कंबर कसली. अहोरात्र अभिनवच्या अभ्यासिकेत बसून त्यांनी अभ्यास केला. सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवले. लॉकडाऊनसारख्या निराशाजनक आणि खडतर परिस्थितीत देखील दोन्ही विद्यार्थ्यांनी कसोशीने अभ्यास केला. त्यांच्या कष्टाला फळ आले. दोघांचीही पोलीस दलात निवड झाली. आता दोघेही पोलीस खात्या अंतर्गत निवड होऊन प्रशिक्षण घेत आहेत.

      तन्वी रविंद्र प्रभू ही विद्यार्थ्यांनी पुण्यात सी.ए. (चाटँड अकाऊंटंट) चा अभ्यास करत होती. कोरोनातील लॉकडाऊनमुळे तिला पुण्यातून सावंतवाडीत घरी परतावे लागले. सावंतवाडीत पुण्यासारखी अभ्यासिकेची व्यवस्था आहे का, याचा शोध घेताना अभिनव ग्रंथालयाच्या अभ्यासिकेची माहिती मिळाली. आत्मेश्‍वर मंदिराच्या परिसरातील शांत, प्रसन्न अभिनव अभ्यासिकेत तिची ज्ञानसाधना सुरू झाली. पुण्यात सुुरू केलेला अभ्यास अखंड सुरू राहिला. तिच्या या साधनेला यश आले आणि ती सनदी लेखापाल (सी.ए.) झाली.  यशाच्या या वाटचालीत अभिनव अभ्यासिका ही प्रमुख साक्षीदार असल्याचे ती सांगते. पुन्हा ग्रंथालयात येऊन होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मनोदय ही तिने व्यक्त केला आहे.

      अभिनवचे विद्यार्थी चैतन्य विलास दळवी हे वेंगुर्ले येथून खास अभ्यासिका आणि ग्रंथालयासाठी सावंतवाडीत येत. अभिनव ग्रंथालयाशी ते आपसूक जोडले गेले. स्पर्धा परीक्षांची तयारी करता-करता ते एल.एल.बी. (कायदा पदवीधर) झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेची विधी अधिकारी पदाची परीक्षा दिली. या परीक्षेतून त्यांचे सिलेक्शन होऊन ते आज नाशिक येथे विधी अधिकारी या पदावर सेंट्रल बँकेचे कामकाज पहात आहेत.

      अभिनव ग्रंथालयाचा आणखी एक विद्यार्थी मयुर नारायण आळवे कामळेवीर येथून अभ्यासिकेत येत असे. सातत्याने विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जात; त्यांनी लॉकडाऊन पूर्वीच्या दोन अडीच वर्र्षांपासून अभ्यासाची तपश्‍चर्या सुरू ठेवली होती. अभिनवच्या अभ्यासिकेचा ते पुरेपूर उपयोग करून घेत. “कोशीश करेने वालों की कभी हार नही होती….“ हे वाक्य मयुर यांना यथार्थ लागू पडते. सततच्या यशा-अपयशानंतरही मयुर यांनी प्रयत्न सोडले नाहीत. टपाल विभागाच्या अधिकारी पदाच्या परीक्षेत त्यांना यश आले. त्यांच्या कष्टाचे चीज झाले. कमी वयात ते आज टपाल विभागात (पोस्ट) अधिकारी पदी विराजमान झाले आहेत.

      ध्येयवेड्या तरुणाईची कोविड काळातील संघर्षाची यशोगाथा म्हणजे अभिनवची अभ्यासिका होय. या यशस्वी विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अभिनवच्या अभ्यासिकेचा नियमीत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. विद्यार्र्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी चालविलेले हे ग्रंथालय आणि त्याची अभ्यासिका यांचे व्यवस्थापनही स्वयंशिस्तीने विद्यार्थीच पहातात.

      अभिनव ग्रंथालयाने अत्यंत शांतपणे आपल्या क्षमता आणि मर्यादांसह विद्यार्थ्यांची साथ संगत केली आहे. आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे होऊन पुढे जाणारे विद्यार्थी हीच अभिनवची कमाई आहे. ज्यांना स्वेच्छेने अभिनव ग्रंथालयाच्या या उपक्रमासाठी आर्थिक वा वस्तू रुपात सहकार्य करायचे असेल त्यांनी अभिनवचे खजिनदार जितेंद्र मोरजकर (9405827577) यांच्याशी संपर्क साधावा. ज्यांना थेट आर्थिक मदत करायची असेल; त्यांना अभिनव ग्रंथालयाच्या बँक खात्यात देणगी देता येईल. स्टेट बँक आँफ इंडिया शाखा सावंतवाडी A/c no. 31784527240 IFSC code:SBIN0000476. देणगी पाठविल्यास श्री. मोरजकर यांच्याशी संपर्क करावा. देणगीदारांना संस्थेकडून रितसर पावती मिळेल. अखेर अशा दात्यांच्या सहकार्यावरच अभिनवची वाटचाल होणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ग्रंथप्रेमींनी, दात्यांनी आर्थिक वा पुस्तक रुपात किंवा वस्तू स्वरुपात सहकार्य करावे, असे आवाहन अभिनव ग्रंथालयाने केले आहे.

-ओेंकार तुळसुलकर, संस्थापक

अभिनव ग्रंथालय सावंतवाडी

अभिनव ग्रंथालयाची अभिनव संकल्पना

      कोणतेही शासकीय अनुदान नसतांना निव्वळ सामाजिक जाणिवेतून आणि अभिनव ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वयंशिस्तीवर चालेले हे बहुदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच ग्रंथालय असेल. स्पर्धा परीक्षांचे ग्रंथालय आणि अभ्यासिका असल्यामुळे या ग्रंथालयाला इतर ग्रंथालयांना असते तशी विशिष्ट दहा ते सहा अशी सरकारी वेळ नाही. विद्यार्थी केव्हाही येऊन ग्रंथालयात बसू शकतात. अर्थात संस्थेस पूर्वकल्पना देऊनच. अगदी झोकून देऊन अभ्यास करणारे काही विद्यार्थी उशिरा पर्र्यंत देखील अभ्यासिकेत अभ्यास करत राहातात. विशिष्ट वेळ नाही, ग्रंथपाल म्हणून विशिष्ट व्यक्तीची नेमणूक नाही. त्यामुळे विशिष्ट साचेबद्ध पध्दतीने काम पहाणारे ग्रंथपाल नाहीत. व्यवस्थापक नाहीत. तरीही ग्रंथालय आणि अभ्यासिकेचे दैनंदिन कामकाज विनाव्यत्यय सुरळीत सुरू आहे.

      इथे येणारा विद्यार्थी हाच ग्रंथालयाचा व्यवस्थापक, ग्रंथपाल आणि विश्‍वस्त ही तोच. त्यामुळे “ग्रंथालय तुमचे आणि ते चालविण्याची जबाबदारी ही तुमचीच“ या सूत्रावर अभिनवच्या अभ्यासिकेची आणि ग्रंथालयाची वाटचाल सुरू आहे.

      मुळात कोविड नंतर पगारी ग्रंथपाल नेमून त्यांचा पगार देण्याएवढी संस्थेची आर्थिक स्थिती राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. माजी ग्रंथपाल तथा निमंत्रित संचालक गितांजली ठाकुर ह्या संस्थेस सेवा देतात. आडेलीच्या पोस्ट विभागातील नोकरी सांभाळून वेळात वेळ काढून विना मोबदला त्या ही सेवा देतात. ग्रंथालयाची आर्थिक पत्रके, अहवाल आणि कार्यालयीन कामकाजाची बाजू त्या जसा वेळ मिळेल तशा सांभाळतात.

      संस्थेला 12A, 80G प्रमाणपत्र आहे. त्यामुळे देणगी देणाऱ्या सर्व दात्यांना अभिनव ग्रंथालयास दिलेल्या देणगीवर कर सवलत मिळू शकेल.

      अभिनव ग्रंथालयाचे आजीव सभासद प्रफुल्ल सांगोडकर हे अभिनव ग्रंथालय व अभ्यासिकेत येणाऱ्या एका विद्यार्थ्यांची विनामूल्य राहण्याची व्यवस्था करतात. सावंतवाडीसारख्या शहरात केवळ शिकण्यासाठी राहणे आणि ग्रामीण भागात रोज ये-जा करणे काही विद्यार्थ्यांना शक्य नसते अशांसाठी श्री. सांगोडकर आधारवड ठरतात.

Leave a Reply

Close Menu