…याची दक्षता घेणे गरजेचे!

              कणकवली कॉलेजच्या ग्राउंडवर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या मुलांच्या क्रीडा स्पर्धा होत्या. छोटी छोटी बच्चे कंपनी अगदी हिरिरीने स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा स्पर्धेतील सहभागाचा आनंद काही औरच वाटत होता. आपल्या संघाच्या विजयाबाबत आयोजक शिक्षक वृंदांकडून काही त्रुटी आढळल्या की प्रमुख शिक्षक वर्गाकडे तक्रार करण्यासाठी धावत होती. शिक्षक मंडळी सुद्धा आपल्या परीने त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे समाधानही होत होते. समाधान झाले की पुन्हा ग्राउंडवर आपल्या इतर मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी जात होती. आमच्या ग्राउंडवरचा बच्चे कंपनीचा माहोल आम्हालाही खूप काही शिकायला लावणारा होता.

      झाले असे, मी कॉलेजमधून घरी यायला निघालो होतो. आमच्या एच.पी.सी.एल. हॉलच्या दारापर्यंत आलो. कलमठ कुंभारवाडी शाळेच्या तीन मुली तेथे उभ्या होत्या. त्यांच्या पाठीमागे हॉलच्या दारावर आमच्या महाविद्यालयाचे सीनियर विभागाचे काही विद्यार्थी उभे होते. मला उत्सुकता म्हणून त्या तीन मुलींशी थोडे बोलावे म्हणून त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली. त्या अगदी माझ्याशी मनमोकळ्या बोलायला लागल्या. त्यातील दोन चौथीच्या वर्गातल्या एक सहावी वर्गातली असावी बहुतेक. मी त्यांना सहज त्यांचे सामान्य ज्ञान चेक करावे म्हणून विचारले, आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कोण आहेत? त्यातली एक म्हणाली, आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत माननीय के. मंजूलक्ष्मी मॅडम. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर त्यातील एक म्हणाली, आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत माननीय प्रजीत नायर साहेब. आश्‍चर्य म्हणजे हेच दोन प्रश्‍न आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विचारले, ते मात्र निरूत्तर झाले.

      मला हे आज येथे मुद्दाम लिहावेसे वाटले ते यासाठी की, मुलांना लहान असताना सामान्य ज्ञान उत्तम असते. पण कॉलेजमध्ये तीच मुले सामान्य ज्ञानात कमी का पडतात? कोण यासाठी कमी पडतो? हा प्रश्‍न मला सातत्याने सतावत असतो. अगदी ग्रामपंचायती विषयी सुद्धा काही माहिती नसते. कॉलेजच्या मुलांचे पालक मात्र माझी मुलगी, माझा मुलगा एम.पी.एससी., यू.पी.एससी करणार म्हणून अभिमानाने सांगत असतात.

      आज या तीन छोट्या मुलींनी आमच्या विद्यार्थ्यांना आणि मलाही अगदी थक्क करून टाकले. त्यांना जिल्ह्याची इत्यंभूत माहिती आहे. मग पुढे हे विद्यार्थी कमी का पडतात, याचा विचार सातत्याने समोर येत राहतो.

      मला प्राथमिक शिक्षकांचा खूप अभिमान आहे. ही मंडळी आपल्या शाळेतील मुलांना आपल्या मुलांसारखा किंबहुना आपल्या मुलांपेक्षा जास्त जिव्हाळा लावतात. त्यांच्यातील गुण हेरून त्या पद्धतीने त्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी प्रयत्न करत असतात. मग त्या क्रीडा स्पर्धा असो, सांस्कृतिक स्पर्धा, सुंदर मी होणार स्पर्धा असे अनेक उपक्रम ही मंडळी शिक्षण विभागाच्या सहकार्याने राबवत असतात.

      गेल्यावर्षी मी कणकवली शाळा नंबर 4 मध्ये आमच्या कॉलेजच्या मुलांना फिल्ड व्हिजीटसाठी घेऊन गेलो होतो. या शाळेच्या शिक्षिका कल्पना मलये मॅडम व त्यांच्या सहकारी आमच्या मुलांना माहिती देत होते. मी त्यांना म्हटले की मी तुमच्या मुलांच्या वर्गावर जातो. मला या मुलांचं मानसशास्त्र बऱ्यापैकी अवगत आहे. मी त्यांच्या मुलांना कोणताही प्रश्‍न विचारला की, उत्तर तयार आणि मॅडमनी आमच्या मुलांना प्रश्‍न विचारला की, आमच्या मुलांची मान खाली!

      मला या निमित्ताने हे सांगायचे आहे की, मुले मोठी झाल्यावर असे का होते? ते कुठे कमी पडतात हे पालक, त्यांचे गुरु यांनी समजून घेण्याची आवश्‍यकता आहे.

      कोरोना काळात तर जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या शाळेतील मुलांचे भावविश्‍व अबाधित ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा केलेला वापर शब्दातीत आहे! या काळात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना खूप आनंदी ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. मी त्यावेळी माझे काही विद्यार्थी जे आता शिक्षक आहेत त्यांच्याशी बोललो. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून मला ही माहिती मिळाली.

      आमच्या कल्पना मलये मॅडम म्हणतात की “आमच्या मनावर काही ताण असेल ना तर शाळेत आलो की, तो ताण कुठल्या कुठे पळून जातो!“

      खरंच प्राथमिक शाळा हे मुलांना खऱ्या अर्थाने घडवण्याचं माध्यम आहे. शिक्षक मंडळी यासाठी खूप मेहनत घेतात, ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे.

      मी कुडाळच्या बॅरिस्टर नाथ पै हायस्कूलच्या स्थानिक कमिटीचा चेअरमन आहे. आमच्या प्रशालाचे शिक्षक मुलांच्या विविध स्पर्धा, दहावीचा अभ्यास, क्रीडा स्पर्धा यासाठी एवढी मेहनत घेत असतात की शाळेच्या नियमित वेळेपेक्षा ते कितीतरी जादा वेळ विद्यार्थ्यांना देतात.त्यामुळे त्यांचे विद्यार्थी सुद्धा विविध स्पर्धांमध्ये चमकतात.

      सिंधुदुर्ग ही बौद्धिक व भावनिक बुद्ध्यांक जास्त असलेल्या माणसांची भूमी आहे. मधुभाई कर्णिकांचे ‘माझा गाव माझा मुलुख’ हे पुस्तक वाचताना प्रत्येक ओळीत त्याची प्रचिती येत राहते. परंतु आमच्या सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अलीकडे वाचन नावाच्या गोष्टीकडे पूर्ण पाठ फिरवली आहे, त्यामुळे त्यांच्याबाबत ही स्थिती दिसते. मग हे विद्यार्थी स्पर्धेत कमी पडतात…..

      मला सातत्याने जाणवत राहते की, प्राथमिक शाळेमध्ये असलेली मुलांची मानसिकता शिक्षणाच्या पुढच्या प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक विकसित करण्यासाठी त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक वाढीकडे प्रामुख्याने पालकांनी आणि शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी गांभीर्याने लक्ष देत राहणे महत्त्वाचे आहे. बरीचशी मुलं दहावीत 95,99 टक्के मार्क मिळवतात. आमच्याकडे अकरावीला सहामाही परीक्षेत ते 55 ते 60 टक्के पर्यंत टिकतात. असे का होते, तर दहावीला केवळ घोकंपट्टी केलेली असते. मुलाचा कल कशात आहे, याचा योग्यप्रकारे शोध घेऊन विशेषत: पालक वर्गाने आपल्या मुलाला समजून घेऊन त्याच्या शैक्षणिक वाढीसाठी प्रयत्न करायला हवा.

      आपल्या मुलांच्या अस्तित्वाचा शोध पालकांना घेता यायला हवा. अशा स्वरूपाचे प्रशिक्षण सुरू करण्याची आवश्‍यकता आहे असे मला सातत्याने वाटत राहते.

      आज या कलमठ-कुंभारवाडी शाळेच्या मुलींसोबत काही मिनिटे बोलून मिळालेला आनंद खूप काही शिकवून गेला! मला पून्हा पून्हा सातत्याने वाटत राहते की, आपण प्राथमिक शिक्षक झालो असतो तर या लहान बालकांसोबत खूप आनंदी जीवन जगता आले असते. किती आनंद मिळत असेल ना प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंदाना!

      मला सर्वांना सांगावेसे वाटते की, प्राथमिक शाळेत असलेली मुलांची भावनिकता, बौद्धिकता पुढील त्यांच्या वाढीच्या काळात आपण पालक, शिक्षक, समाज आणि सामाजिक संघटना या सगळ्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केल्यास जे प्राथमिक शाळेमध्ये मुलांचे टॅलेंट असते ते टॅलेंट महाविद्यालयीन जीवनात सुद्धा कायम राहील. त्यांचे पुढील आयुष्य अत्यंत सुंदर जगण्यासाठी त्यांना तो अनुभव अतिशय उपयुक्त ठरेल.

                                                                                                             – प्रा. डॉ.राजेंद्र मुंबरकर,

                                                                                                             कणकवली, 9421144531

Leave a Reply

Close Menu