जी आय झेड ही जर्मन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी चालवली जाणारी संस्था आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाद्वारे शहरे स्वच्छ करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. याचाच एक भाग म्हणून जीआयझेड या संस्थेमार्फत कंपोस्टिंग या विषयात सहकार्य केले जाते.
या संस्थेच्या प्रोसॉइल प्रकल्पा अंतर्गत हरित महासिटी कंपोस्ट हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जी आय झेड या संस्थेची कार्यशाळा दिनांक 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान सिंधुदुर्ग येथे संपन्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 फेब्रुवारी 2023 रोजी संस्थेचे 12 सदस्य शिष्ट मंडळांनी वेंगुर्ला नगर परिषदेच्या कंपोस्ट प्रकल्पाला भेट दिली. या शिष्टमंडळात तीन जर्मन प्रतिनिधींचा समावेश होता. या सर्वांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाला भेट देऊन कौतुक केले. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की माहिती, तत्त्वज्ञान, विज्ञान यांचे एकत्रित वापरातून शाश्वत कामातून लोक कल्याणासाठी केलेला एक उत्कृष्ट प्रकल्प. आशा करतो की इतर शहरांनीही अशा प्रकारची सुंदर सुरुवात करून राष्ट्रीय आणि जागतिक उद्दिष्टे साध्य करावी. या शिष्टमंडळात लेवके सोरेन्सन, या संस्थेच्या प्रोसॉईल जागतिक प्रकल्पाच्या उपप्रमुख, राजीव अहल, प्रोसॉइल इंडिया चे संचालक योनास बार्थोलोमे, स्टेफनी कात्सीर, नवीन होरो, इंद्रनील घोष, जितेंद्र यादव, रणजित जाधव, ओमकार शौचे आदींचा समावेश होता.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, न.प.च्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर सुनील नांदोस्कर, खर्डेकर कॉलेजच्या वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. धनश्री पाटील, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, अभियंता सचिन काकड, सीटी कोऑर्डीनेटर पूर्वा मसुरकर, प्रकल्प व्यवस्थापक सागर चौधरी व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.