समाजाभिमुख विकासकामे करणार

                  श्रीदेवी सातेरी कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वेंगुर्ला यांच्यावतीने आयोजित व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत सातेरी मंदिराच्या पटांगणावर भव्य दशावतार नाट्य महोत्सवाच्या आयोजनाचा समारोप २७ फेब्रुवारी रोजी झाला. यावेळी वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.राजन खांडेकर, देवस्थान ट्रस्टचे रविद्र परब, मोरेश्वर द.ना.मंडळाचे संचालक प्रकाश मोर्ये, सातेरी कला क्रीडा मंडळाचे सुनील परब, बाळा परब, रमण परब, प्रकाश परब, अशोक परब, प्रदीप परब, मंगेश परब, नितेश परब, उमेश परब, राजू परब आदी उपस्थित होते. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यासह शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. यापुढेही त्यांच्या माध्यमातून या भागातील समाजाभिमुख विकासकामे अधिक जोमाने करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश येरम यांनी केले.

      या महोत्सवात सहभागी झालेल्या नाट्य मंडळांच्या संचालकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शहरात चांगली सेवा देणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नाली पवार-माने, फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर यांचाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या नाट्य महोत्सवास शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा नाट्यमहोत्सव यशस्वी करण्यासाठी सातेरी कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच देवस्थानचे जेष्ठ मानकरी काका परब यांच्यासह इतर मानकर्‍यांचे यावेळी आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन जयेश परब यांनी केले. या समारोप प्रसंगी मोरेश्वर द.ना. मंडळ मोरे-कुडाळ यांचा अकल्पासूर वधहा नाट्यप्रयोग संपन्न झाला. या नाट्यमहोत्सवासाठी तालुक्यातील नाट्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

 

Leave a Reply

Close Menu