तोटकेकराकडचा कॉकटेल

  वेंगुर्ल्याला गेल्यावर मासे खाणे मस्ट आहे, असे जर तुम्ही म्हणत असाल तर ते अर्धसत्य आहे. वेंगुर्ल्याला भेट देणारा मुंबईकर प्रत्येक ट्रिपला तोटकेकरांच्या ‘क्वालिटी कोल्ड्रींक’ ला कॉकटेल खाण्यासाठी हमखास भेट देणारच हे मात्र नक्की. ‘वेंगुर्ल्याच्या खाद्यभ्रमंती’ला भरभरुन मिळणारा प्रतिसाद बघून अस्मादिकांनी यावेळी तोटकेकरांच्या क्वालिटी कोल्ड्रींकला भेट देण्याचे निश्‍चित केले. मार्च अखेरच्या कामातून उसंत मिळाल्यावर मित्राकडून तोटकेकरांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून घेऊन एका सायंकाळी भेट निश्‍चित केली.

      दुकानात नेहमीप्रमाणे गर्दी होतीच, त्या गर्दीत एका टेबलावर जागा पटकावून अस्मादिकांनी मालकांशी हितगुज सुरू केले. एक मिनिट… या परिच्छेदाच्या सुरुवातीला ‘दुकान’ हा शब्द आलाय, मी चुकीचा शब्द वापरला का? नक्की काय शब्द वापरावा या द्विधा मनस्थितीत मी आहे. कारण आपल्या जिल्ह्याच्या बाहेर अशाप्रकारे कोल्ड्रिंक हाऊस मी पाहिली नाहीत, कुठे असलीच तर तिथे जाण्याचा योग कधी नाही आला. खाण्याचे पदार्थासाठी जशी हॉटेल असतात, तसेच थंड पदार्थ बसून खाण्यासाठी कोल्ड्रींक हाऊस वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ तसेच सिंधुदुर्गातील इतर शहरात आहेत. मुंबई-पुणे शहरासाठी आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ खाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असलेली ठिकाणे बहुदा नसावीत. हॉटेलात खाण्याच्या पदार्थाबरोबरच आईस्क्रीम सारखे पदार्थही मेन्यू कार्डावर असतात आणि ते तिथेच बसून खाण्यासाठी मिळतात. आईसक्रीम सारखे थंड पदार्थ मिळणाऱ्या गाड्या मात्र जागोजागी मोठ्या शहरात आढळून येतात. जेवल्यावर आईस्क्रिमची ऑर्डर देण्याचा योग वेंगुर्ल्यात मात्र येत नाही. त्यासाठी अशा कोल्ड्रींक हाऊसला स्वतंत्रपणे भेट द्यावी लागते. आम्हा वेंगुर्लेकरांना जेवल्यानंतर आईस्क्रीम वगैरे साठी स्वतंत्र वेळ वगैरे काही लागत नाही, सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही ‘थंड खावसा वाटला’ की कोल्ड्रींक हाऊसला भेट देतो.

      कै. हरी सखाराम तोटकेकर यांचा फार पूर्वीपासून पोकळे गल्लीत सोडा वॉटरचा व्यवसाय होता. बाबल तेली या नावाने ते प्रसिध्द, वेंगुर्ला व आसपासच्या परिसरात सोडा वॉटरचे प्रमुख पुरवठदार होते. सन 1982 मध्ये त्यांचे पुत्र सुभाष हरी तोटकेकर यांनी पोकळे गल्लीत कोल्ड्रींक हाऊस सुरु केले. आईसक्रिम, आईस कॅण्डी, वेगवेगळ्या प्रकारचे शेक, दुध कोल्ड्रींक, फालुदा आणि कॉकटेल हे थंड पदार्थ त्याठिकाणी मिळू लागले. हळूहळू त्यांचा या व्यवसायात जम बसू लागला आणि 1987 साली पोकळे गल्लीच्या समोर क्वालिटी कोल्ड्रींक ची स्थापना झाली. मार्केट पासून थोडेसे लांब असले तरी दाभोली नाका सारखे लोकेशन असल्याने दिवसभर गिऱ्हाईकांची गर्दी असायची आणि अजूनही असतेच.

      ‘अजूनही 80% गिऱ्हाईक कॉकटेललाच असते’, तोटकेकर सांगत होते. यापूर्वी सावंतवाडी, कुडाळ येथे कॉकटेल मिळायचे. तोटकेकरांनी ते वेंगुर्ल्यात आणले. अस्मादिकांना कॉकटेलचा इतिहास जाणून घ्यायची जिज्ञासा होतीच. तोटकेकरांकडून ही जिज्ञासा पुरी होत होती. गोवा-कारवार येथून हे कॉकटेल आपल्या जिल्ह्यात आले. तिथे कॉकटेलला ‘गडबड आईस्क्रिम’ म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे आल्यावर त्याला ‘कॉकटेल’ हे नाव पडले, कदाचित त्यामध्ये फळे, ज्यूस, आईस्क्रिम, ड्रायफ्रूटस इ. पदार्थ एकत्र केले जातात म्हणून असावे.

 तोटकेकरांचे वय वार्धक्याकडे झुकल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते. मात्र गिऱ्हाईकांना कॉकटेल, फालुदा, आईस्क्रिम सारखे थंड पदार्थ सर्व्ह करताना त्यांच्या वावरण्यात तरुणांना लाजवेल अशी चपळाई दिसत होती. पाटकर हायस्कूल मध्ये असताना जाता-येता मी त्यांना पहायचो, त्यांचा माझा परिचय तसा नाहीच. नंतर मुंबईहून वेंगुर्ल्याला सुट्टीत आल्यावर हमखास कॉकटेल खाण्यासाठी इथे यायचो, त्यावेळी त्यांची भेट व्हायची. परंतु एक गिऱ्हाईक म्हणून, या व्यतिरीक्त काहीच ओळख नव्हती. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा मात्र होती, ती आज पूर्ण झाली. त्यांच्या बोलण्यातून ते माझे लेख आवर्जुन वाचतात, माझ्या व्यंगचित्रांचे ते चाहते आहेत हेही कळले. या सदरामुळे आम्हा दोघांचा संवाद साधला गेला. त्यातून मिळालेली माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न.

      ‘मुंबईकर वेंगुर्ल्याला आल्यावर आमच्या कोल्ड्रींक हाऊसला भेट दिल्याशिवाय जात नाहीत’, तोटकेकर सांगत होते. पूर्वी त्यांच्याकडे आईसकॅण्डी मिळायची, अलिकडे ती बंद झाली. मला आठवतेय अस्मादिकांकडे कॉकटेल खाण्यासाठी लहाणपणी पैसे नसायचे, पण माझ्या सारखे अनेक असतील त्यांना कधी ना कधी निदान आईसकॅण्डी खाण्यासाठी कुणीतरी नातेवाईक चार आणे द्यायचा. आईस्फ्रूट म्हणायचो आम्ही त्याला. मग तोटकेकराकडे जाऊन चाराण्याचा साधा आईस्फ्रूट खाऊन आम्ही आपला ‘जीव थंड करायचो’. एखाद्याकडे थोडे जास्त पैसे असतील तर दुधाचा आईस्फ्रूट. अजून जास्त पैसे असतील तर कॅडबरी. तोटकेकर स्वत:च बनवायचेत हे सर्व प्रकारचे आईसकॅण्डीचे प्रकार. आमच्या पिढीतील सध्या मुंबई-पुण्यात स्थायिक असलेले चाकरमानी वेंगुर्ल्याला आल्यावर तोटकेकरांकडे आईस्फ्रूटचा आग्रह धरतात. मुंबई-पुण्यात, परदेशात चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी असणारे कॉकटेल सहज परवडत असताना सुध्दा लहाणपणीची आठवण म्हणून तोटकेकरांकडे आईस्फ्रूटची मागणी करत असल्याने कॅडबरी आईस्फ्रूट (हे कुठल्या ब्रॅण्डचे नाव नाही बरं का… चॉकलेट फेवरच्या आईसकॅण्डीला कॅडबरी म्हणतात) ते अजूनही विक्रीस ठेवतात.

      आजकाल ब्रॅण्डेड आईसकॅण्डी बाजारात आल्यात. उन्हाचे निमित्त करून ज्येष्ठ मंडळी आईसकॅण्डी खाण्याची हौस भागवून घेतात. पूर्वी पंचवीस पैशाला साधे, पन्नास पैशाला दुधाचे तर दिड रुपयाला कॅडबरी आईसकॅण्डी क्वालिटी कोल्ड्रींक मध्ये मिळायचीत. दहा रुपये हाफ आणि पंधरा रुपयाला फुल्ल मिळणारे कॉकटेला दर आता सत्तर रुपये हाफ आणि ऐंशी रुपये फुल्ल पर्यंत पोहचलाय. तरी कॉकटेलची लोकप्रियता काही कमी झाली नाही.

      वेंगुर्ल्यात पूर्वी अजूनही काही कोल्ड्रींक हाऊस होती, काही बंद झालीत काही नव्याने सुरू झालीत. तोटकेकरांचे ‘क्वालिटी कोल्ड्रींक’ दाभोली नाक्यावर अजूनही जोमात चालू आहे, वेंगुर्ल्याच्या खाद्यसंस्कृतीत एक मानाचे स्थान म्हणून. सुभाष हरी तोटकेकर यांची पुढची पिढी उपेन्द्र त्यांना मदत करत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अस्मादिक तेथून बाहेर पडलो, अर्थात थंडगार आणि स्वादिष्ट कॉकटेलचा आस्वाद घेऊनच.

(सदर लेख कोणत्याही हॉटेल व्यवसायाची जाहीरात करत नसून वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती करुन खवय्ये आणि वेंगुर्ल्यात मिळणारे खाद्यपदार्थ व ती मिळणारी हॉटेल्स, भोजनालये इ. यांच्यात दुवा साधण्यासाठी हा आमचा प्रपंच आहे. खाली दिलेला लेखकांचा संपर्क क्रमांक हा केवळ या लेखावर आपल्याला व्यक्त व्हायचे असेल तर त्यासाठी माध्यम म्हणून उपलब्ध करुन दिलेला आहे.)

– संजय गोविंद घोगळे, 8655178247

Leave a Reply

Close Menu