गणपतीक येवा तिकीट नाय आसा!

कोकणातील हायवे, कोकणातील रिफायनरी, पर्यटन सेवा, इथल्या नाट्यगृहांची दुरावस्था, कोकणातील अशा प्रश्नांवर अगर सामान्य लोकांच्या कुठल्याच प्रश्नांवर आपल्या नेत्यांना बोलायचे नसते. माध्यमांनी बोललं की, ‘मुंबईत बसून तुम्हाला बोलायला काय जातय?‘ असे सोशल मीडियावर राष्ट्रीय प्रवक्ते ज्ञान शिकवणार! का दरवेळेला तुम्ही सर्वच राजकीय पक्ष राजकीय चष्म्यातून पाहता? लोकांच्या प्रश्नांवर तुम्हाला भूमिका नसते का?

      गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात आहे आणि कोकण रेल्वेचे बुकिग १८ मेलाच दोन मिनिटात हाऊसफुल्ल होते आणि कोणीही एका शब्दाने बोलत नाही. गणेशोत्सव म्हणजे आता गावी जायला काही हजार रुपये वेगळे काढून ठेवा हा आता शिरस्ता झाला आहे. तर मग दोन महिन्यांनी वाढीव ३०० ट्रेन अशी एक हेडलाईन्स येईल आणि मग राजकीय ट्रेन! पुणे मार्गाने टोलमाफी, वाढीव बस अशी अनेक चायनीज तोरण तेव्हा बरोबर पेटत राहतील.

    सदरहू स्पेशल ट्रेन पोहोचतात कधी, निघतात कधी, त्यात असते कोण हे जनतेच्या मनातील प्रश्न सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. सरकार, रेल्वे प्रशासन, त्यांचा आयटी विभाग अस्तित्वात असेल तर मग हे तिकीट लाटणारे दलाल कोण आहेत? का त्यांच्याकडे कानाडोळा केला जातोय? राजकीय पक्षाचे नेते का नाही बोलत दलालांविरुद्ध? नाही म्हणायला रेल्वे प्रशासन तिकिटांचा काळा बाजार करणा­यांवर वर्षातून एकदा कारवाईच्या बातम्या छापून आणतात.

    रस्त्यांनी जाऊ शकत नाही, कारण डोळेझाक! रेल्वेनी जाऊ शकत नाही कारण तोंडबंद! आणि राजकीय नेते, प्रशासनाला आता माहित आहे की, कोकणातील प्रवासी कसेही जाणार आणि यांनी काहीही केलं तरी कोकणवासी जनता निमूटपणे सहन करणार !

    यंदा सोशल मीडिया, वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवर एक मिनिटात रिझर्वेशन फुल झाल्याच्या बातम्या आल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करायला सांगितले आहे. खासदार विनायक राऊत यांनी रेल्वे महाव्यवस्थापक यांच्यासोबत बैठक आयोजित करत नागरिकांना या संदर्भातील तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे. नारायण राणे या प्रश्नी रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

    कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या पाहता या मार्गाचे लवकरात लवकर दुपदरीकरण होणे आवश्यक आहे. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना या दुपदरीकरण प्रकल्पाला गती मिळाली होती. आज मात्र ही प्रक्रिया थांबल्याचे चित्र आहे. आज रोजी रोह्यापर्यंत हा मार्ग दुपदरी आहे. संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणामुळे प्रवास गतिमान झाला असला तरी प्रवाशांची वाढती संख्या, अपु­या नियमित धावणा­या गाड्या आणि तिकीट दलालांचा धुमाकूळ यामुळे सामान्य कोकणवासीयांचे सुखकारक आणि किफायतशीर रेल्वे प्रवास हे स्वप्नच राहिले आहे. आज एजंटला दुप्पट-तिप्पट पैसे मोजून प्रवाशी नाईलाजाने प्रवास करत आहेत.

    एकीकडे कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारतही सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू होणार आहे. सुट्टीच्या काळातही रेल्वेकडून जादा रेल्वे चालविल्या जातात. परंतु एका  मिनिटात रिझर्वेशन रिग्रेट होण्याच्या समस्येवर रेल्वेला जर उपाय सापडत नसेल तर जनतेला कोकणात येवा तिकीट नाय आसा !असेच म्हणावे लागणार आहे.

Leave a Reply

Close Menu