योगी सुरज भाई यांच्या हस्ते सुख, शांती भवनाचे उद्घाटन

वेंगुर्ला माणिक चौक येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय सुख शांती भवनाचे उद्घाटन रविवार 21 मे रोजी माऊंट आबू येथील वरिष्ठ राजयोग शिक्षक राजयोगी, तपस्वीमूर्त ब्रह्माकुमार सुरज भाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मीरा सोसायटीच्या क्षेत्रीय संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी, राजयोगा टीचर ब्रह्माकुमारी गीता बहन, सिंधुदुर्ग-गोवा सेवाकेंद्र प्रमुख ब्रह्माकुमारी शोभा बहन, ब्रह्माकुमारी मंगला बहन (जयपूर), ब्रह्माकुमारी सुलभा बहन (राजस्थान), ब्रह्माकुमारी आशा बहन मिरा सोसायटी पुणे, ब्रह्माकुमार अमोल आईर आदी उपस्थित होते.

       प्रथम सुरज भाई यांच्या हस्ते माणिक चौक येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. फीत कापून, श्रीफळ वाढवून व दीप प्रज्वलन करुन सुख शांती भवनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या अवती भवती अनेक कला शिकविल्या जातात. मात्र प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय सुख, शांती भवनामध्ये अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुख कसे प्राप्त करावे ही कला शिकवली जाते. आज लाखो लोक ही कला शिकून सुखी जीवन जगत आहेत. वेंगुर्लेतील या सुख शांती केंद्रात येणाऱ्यांना ईश्‍वर प्राप्तीचा अनुभव मिळेल. लोकांनी येथे येऊन सात दिवसांचा कोर्स केल्यास त्यांचे जीवन सुखी, समाधानी होईल. हे केंद्र भविष्यात शक्तीशाली केंद्र बनेल असे प्रतिपादन ब्रह्माकुमार सुरज भाई यांनी केले. यावेळी मीरा सोसायटीच्या क्षेत्रीय संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी म्हणाल्या की, पूर्वी ऋषीमुनी अरण्यात जाऊन तपश्‍चर्या करुन सुखशांती मिळवीत. त्यांच्या तपश्‍चर्येतून निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे जंगलातील प्राणी, पक्षी एकमेकांबरोबर गुण्यागोविंदाने राहात. आज माणूस प्राणी बनत चाललाय. आपल्या मनाची स्थिती कशी उत्तम राखायची हे राजयोग शिकवतो. जेथे पवित्रता आहे तेखे सुख, शांती आपोआप येते, असे सुनंदा दीदी म्हणाल्या. मार्गदर्शन करताना सुनंदा दीदी पुढे म्हणाल्या, परिस्थिती कशीही असली तरी सुख कसे प्राप्त करावे याची कला या केंद्रात शिकवली जाते. लोकांनी दिवसातील काही वेळ येथे बसून ही कला शिकावी व या वास्तूचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्माकुमार सुरज भाई यांनी केले तर आभार वंदना बहन यांनी मानले. या कार्यक्रमानंतर  वेंगुर्ले कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात राजयोग भट्टी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सुरज भाई यांनी राजयोगाबाबत मार्गदर्शन केले.

     

Leave a Reply

Close Menu