तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरु करा-डॉ.खांडेकर

 फळे काढणीनंतर त्यापासून नाविन्यपूर्ण टिकावू पदार्थ तयार करणे, शेतक­यांना पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणे, माती व पाने परीक्षण करून त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे, त्या अनुषगाने अशा क्षेत्रात कोणती पिके घेता येतील याचे मार्गदर्शन करणे, कीड व रोग नियंत्रणासाठी विविध जैविक घटकांची निर्मिती करणे, पिकांच्या कीडा व रगयुक्त नमुन्यांवरून कीड रोग ओळखणे व नियंत्रणासाठी उपाय सुचविणे आदी उद्दिष्टे ठेवून वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात चार प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली असून गेल्या दहा वर्षात या प्रयोग शाळांचा जिल्ह्यातील सुमारे हजारो तरूण व शेतक­यांनी लाभ घेतला व काही तरूणांनी स्वतःचे उद्योग सुरू केल्याची माहिती वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.राजन खांडेकर यांनी दिली.

     २०१२-१३ साली महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कोकण पॅकेज अंतर्गत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे चार प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली. या अंतर्गत एकाच इमारतीत काढणी पश्चात फळ प्रक्रिया प्रयोगशाळा, माती व पाने परीक्षण प्रयोगशाळा, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा व कीडा रोगनिदान प्रयोगशाळा अशा चार प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली. अनेक शेतकरी फोनवरुन व व्हॉटसअॅपवरून फोटो पाठवून माहिती घेतात. तसेच आंबा व काजूच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी मेळावे व प्रशिक्षण वर्ग कृषी विभाग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावोगावी मार्गदर्शन करण्यात येते. सध्या या चार प्रयोगशाळेचे नियोजन डॉ.राजेंद्र भिगार्डे, डॉ.अजय मुंज, डॉ.यशवंत गोवेकर व डॉ.स्मिता देशमुख पाहत आहेत. तरूणांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.राजन खांडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu