माजी विद्यार्थ्यांचे मागे वळून पाहणे हेच शाळांचे यश-मेघा पाटकर

              तालुकास्कूल शाळा वेंगुर्ला नं.१ येथे २९ जुलै रोजी गुरू कृतज्ञता सोहळाआणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनसंपन्न झाले. यावेळी या तालुकास्कूलमध्ये ज्या शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य केले असे सुहासिनी अंधारी, मेघा पाटकर, आनंद पेडणेकर, वि.म.पेडणेकर, आबा खोत, राजेंद्र बेहरे, अरूण परब, सतोष परब या शाळेच्या माजी शिक्षकांसह, विद्यमान मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर व शाळेचे माजी शिपाई दत्ताराम कांदे आणि ज्ञानेश्वर धोंड आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी गुरू कृतज्ञता सोहळा आयोजित करुन पुन्हा एकदा सोनेरी क्षण अनुभवण्याची गुरुदक्षिणा दिली. जि.प.तील शाळेत सस्काराचे धडे घेतलेले विद्यार्थी पुन्हा मागे वळून पाहताहेत हे या शाळांचे यश असल्याचे प्रतिपादन शिक्षिका मेघा पाटकर यांनी केले. तर माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावर माजी विद्यार्थ्यांची अनेक संमेलने होताना दिसतात. परंतु, मराठी शाळेत शिक्षणाचा पाया घडविणा­या ज्ञानमंदिरातील माजी शिक्षकांच्या उपस्थितीत झालेले हे पहिलेच संमेलन असले पाहिजे असे नमूद करीत सर्वच शिक्षकांनी या स्तुत्य उपक्रमाच कौतुक केले.

   यावेळी ३० माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळचे घडलेले किस्से, केलेल्या खोड्या यांसह त्यावेळची वाखणण्याजोगी असलेली शैक्षणिक प्रगती हे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मांडताना जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्यानंतर सर्व शिक्षक, शिपायी आणि मुख्याध्यापक यांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, भेटवस्तू व वृक्ष देऊन सन्मान करताना गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सध्या मोबाईलचे प्रस्थ वाढत आहे. ऑनलाईन अभ्यासानंतरही प्राथमिक शाळेतील मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिसत आहे. मोबाईलचा वाढलेला वापर कमी व्हावा आणि पुन्हा एकदा मुले खेळाकडे वळावीत या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी नेटसह २ व्हॉलीबॉल, ४ बॅडमिटन, २ बुद्धिबळ, बॉलसेट अशाप्रकारचे क्रीडा साहित्य मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर व शाळेचे विद्यार्थी यांच्याकडे सुपूर्द केले. शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Close Menu